01 January, 2009

माझे जीवनानुभव



( आकाशवाणी मुंबईच्या अस्मीता वाहिनीवरून १ जानेवारी २००९ रोजी प्रसारीत)

मी या जीवनात काय अनुभव घेतले ? किंबहुना या जीवनात मला काय अनुभव आले ? असे प्रश्न मी मलाच विचारले तेव्हा मला शांतपणे अंतरंगात डोकावून पहावं लागलं आणि तेव्हा लक्षात आलं कि एखाद्या प्रवाहा प्रमाणे आयुष्यात आपण फक्त वहात असतो. वाटेत वळणं, अडथळे येतातच त्यामधुन वाट काढत हा जीवनप्रवाह पुढे जात असतो. तेव्हा आलेली संकटं आपण झेलली म्हणण्या पेक्षा त्यावेळी जे घडलं ते घडलं आपण आपल्या परीने त्यातुन बाहेर पडतो एवढच.

नुकताच माझ्या मुबईवर जो प्राणघातक हल्ला झाला त्यावेळी तर मी हतबुद्धच झालो होतो. कसा आलो मी इथे ? कोणत्या प्रेरणेने ? कथा-कवितां मधुन वर्णन करुनही उरणा-या नितांतसुंदर अश्या सिंधुदूर्गात, तळकोकणात जन्मापासुन २२-२३ वर्षे बागडत असताना मला कधीच वाटलं नव्हत कि मी मुंबईत येईन, स्थाईक होईन.

भारतीच्या, माझ्या मोठ्या बहिणीच्या कडेवर बसुन विस्फारीत नेत्रानी मी माझा गाव पहील्यांदा पाहीला तो कालच पाहील्यासारखा मला लख्ख आठवतोय. घाटीवरून खाली दिसणारी कौलारु घरं कालांतराने झालेल्या माझ्या प्रिय मित्रांची होती. ती वाट कोकणातील लालमातीची होती त्याची आता डांबरी सडक झालीय एवढाच कायतो फरक. पायवाटेला खेटुनच असणारा छोटासा तलाव, पुढे वाकडी होत जाणारी वाट, सोबत कानात रुंजी घालणारं ओहोळाचं गाणं, गर्द झाडी आणि पाण्यात पाय धुवून पासष्ठ पाय-या चढल्याकी येणारं रामेश्वर मंदीर. थोडी विश्रांती घेउनच पुढे हाकेच्या अंतरावर असणा-या घरी मी पोहोचलो तेव्हा मला स्वर्गीय आनंद झाला होता. पुढे शाळेत जाताना रोजच त्या वाटेने जायचो, आताही जातो पण ती पहीली गावाची भेट मला अजुनही आठवते. चिं.त्रं. खानोलकर तथा आरती प्रभू, जयवंत दळवी, कविवर्य मंगेश पाडगावकरां पासून मधु मंगेश कर्णीकांपर्यंत, सर्व जेष्ठ श्रेष्ठ साहित्तीकांच्या लेखनात माझं गाव मला नंतर पुन्हा पुन्हा भेटत गेलं, तेव्हा मला त्याच्याकडे बघण्याची सौदर्यद्रृष्टी प्राप्त झाली.

निसर्गाचीही वीस-बावीस वर्षांची सहल करुन मी आत्ताच परततोय असं वाटत. -या-डोंगरात बागडतच आम्ही आमच्या पाटाच्या शाळेत जायचो, ते शाळेतले दिवस मी कधीही विसरणार नाही. पाट हायस्कूलमधे पाचवीत गेलो आणि दहावीची परीक्षा देउन बाहेर पडलो तेव्हा मला पुढे जाण्यासाठी जी पुंजी माझ्या गुरूजनांनी दिली ती मला अजुनही पुरते आहे. शालेयजीवनातच शक्यतेवढे समृद्ध अनुभव देण्याचा प्रयत्न करणा-या माझ्या शिक्षकांचा म्हणुनच मला अभिमान वाटतो. मला अजुन आठवतात ते दिवस जेव्हा आम्हाला एका झाडाखाली बसवून आमच्या नंदा सामंत बाई रवींद्रनाथ टागोर आणि मुन्शी प्रेमचंद यांचे धडे शिकवत असत. माझ्या शिक्षकांनी खरच आमच्यासाठी त्या छोट्याश्या गावात शांतिनीकेतनच ऊभं केलं होतं. शिकण्यासाठी खुपकाही लागत नाही तर योग्य गुरू लागतो ते मला शालेयशिक्षण घेतानाच मिळाले आणि माझे अनुभवविश्व विस्तारत गेलं. शाळेत आपण कोंडले गेलोय असं आम्हाला कधी वाटलच नाही, म्हणुनतर शेवटचे शिक्षक घरी जाई पर्यंत मी शाळेतच रेंगाळत असे. शिक्षकांचा ५२ दिवसांचा प्रदीर्घ संप सुरू असतना मंडपे सरांनी दहावीचं गणित आम्हाला देवळात बसून शिकवलं. परोपकाराचे धडे माझ्या शिक्षकानी आम्हाला आपल्या कृतीतूनच दिले. काहीही करून शक्यतेव्हढं शिका आत्ताच चढती कमान आहे पुढे आयुष्याला पठारावस्ता प्राप्त होते असं सांगणारे नाईकसर मला पुढे मुंबईत यायची प्रेरणा शाळेच्या निरोपसमारंभातच देवून गेले.

युष्यात चांगले अनुभव पाहीजेत तर तश्या वाटेवरुन चालावं लागतं. माझ्या गुरूजनांनी तर मला हमरस्त्यावरच आणुन सोडलं होतं. मित्रहो तुम्ही चांगले वागा देव तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटतच जाईल याच्यावर माझा पुर्ण विश्वास आहे. महाविद्यालयात शिकत असतानाच मला भारतीय डाक विभागात नोकरी लागली आता कॉलेज कसं पुर्ण करू असा मला प्रश्न पडला, पण आमचे प्राचार्य श्री. गुमास्ते सर त्यावेळी देवा सारखे धावून आले आणि सर्व प्रकारची मदत देवून त्यानी पुढे कॉलेज पुर्ण करण्याची मला परवानगी दिली.

हाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करुन पुढे संगणक विषयक अभ्यास करण्यासाठी मी मुबईत आलो तरी गावाकडे जाणारी एस्. टी. परळ स्थानका जवळ पाहिली तरी माझ्या डोळ्यात पाणी यायचं. त्या एस्. टी. ची जागा आता कोकण रेलवेने घेतली तरी माझी अवस्था तीच आहे. पण मुंबईत भरून राहिलेलं कोकण समजत गेलं आणि कामाचा व्याप जसा वाढत गेला तसं मुंबईनेच मला आपलसं केलं. विवीधगी विवीधढंगी मुंबई बघता बघता मी कधी मुंबईकर झालो ते कळलच नाही.२६ जुलैचा पाऊस असो की २६ नोहेंबरचे अतिरेकी हल्ले कोणत्याही परीस्थीतीत सावरून पुढे जायचं हे मुंबईने दिलेले धडे मी इथेच गिरवले. हल्ल्यातून सावरलेला जनसागर मरीनड्राह्युच्या किना-यावर उसळला तेव्हा त्यांच्या आसवांच्या सहृ्‌दय धाराही मी पाहील्या तेव्हासुद्धा त्यात माझे अश्रू कधी मिसळले गेले हे मला समजलच नाही. पराक्रमाच्या ज्योती जिथे जिथे मावळल्या त्या त्या ठिकाणी जावून आपापले गहिवर अर्पण करणारे मुंबईकर पाहुन मी त्यांना सलाम केला. खरच अजून खूप मुंबई पाहायची राहिलीय.

' केल्याने देशाटन पंडीत सभेत संचार ' या उक्ती प्रमाणे काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कामरुप पर्यंत उभ्या आडव्या पसरलेल्या आपल्या भारतभुमीत भ्रमण करताना जो आनंद मला लाभला तो तर शब्दातीत असा आहे. शुभ्र बर्फाच्छादीत अश्या हिमालयाच्या धवलाधर रांगा जेव्हा मी चादण्यात न्हाउन निघालेल्या पाहील्या तेव्हा पासून मी हिमालयाच्या प्रेमात पडलो आहे. हिमालयाचं रुप डोळ्यात कितीही साठवून घेतलं आणि कॅमे-यात बंद केलं तरी तीथे जाण्याची नित्यनवी स्वप्‍ने मी रोजच बघत असतो. विवीधतेने नटलेल्या आणि जगातली सर्वप्रकारची दृष्ये सामावलेल्या या भारतात जन्मल्याचा म्हणुनच मला आनंद होत असतो. काय नाही आपल्या देशात ? सप्तसिंधूंचं पाणी माझ्या कोच-याला घेऊन येणारा अथांग सागर तर मला जन्मापासुनच बघायला मिळाला पण पुढे गगनाशीही स्पर्धा करणारा हिमालय पाहुन मी कृत कृत्य झालो. कृष्णाची द्वारका आणि पुढे बेटद्वारकेला जातानाचा निळाशार समुद्र पुन्हा मला ओळखीचे हस्तांदोलन करून गेला.

भारताची संस्कृती आणि बंधुभाव अखील मानवजातीला अधोरेखीत करून दाखवणा-या स्वामी विवेकानंदांचे कन्याकुमारीचे स्मारक असो की प्रत्यक्ष कालीमातेने त्याना जिथे दर्शन दिले ते काली मंदीर असो दोन्ही ठिकाणे माझ्या साठी तिर्थक्षेत्रेच आहेत. तुम्ही त्या ठिकाणी जा आपल्याला अजुनही विवेकानंद तीथल्या वातावरणात भरुन राहिलेले जाणवतील. देशा प्रती आणि गुरु प्रती असलेली स्वामीजींची निष्ठा स्वामीजींनी बांधलेल्या रामकृष्ण मंदिराला भेट दिल्यावर ध्यानी येते. आपल्या देशाच्या पुर्वेला असलेल्या असम, मेघालय, अरुणाचल प्रदेश बघायला गेलो तेव्हा त्या पुर्ण प्रदेशाची नाळ भारताशी जोडली गेल्याचं आपल्या लक्षात येलं. तिथे गेल्यावर खरचं '' सारे भारतीय माझे बांधव आहेत '' असं मला वाटलं. सरकार, सैकीया, दास हे आजपर्यंत दूरचे वाटणारे माझे मित्र बनुन गेले. असे फिरत असताना आपणाला सतत आपल्यासाठी सदैव सीमेवर तत्पर असणा-या आपल्या भारतीय जवानांचा खुपच आधार वाटतो. अरुणाचल प्रदेशातील तवांगला गेल्यावर आपल्या सातारा - सांगली चे जवान जेव्हा भेटले तेव्हा तर मी भारावून गेलो. अर्थात त्या जवानांनी सुद्धा कडकडून मिठी मारली. १९६२ च्या चिन बरोबरच्या युद्धाच्या आठवणी अजुनही अंगावर बाळगणारा बोमडीला- तवांग चा परीसर नितांत सुंदर आहे. पण तीथल्या युद्धस्मारकात गेल्यावर आपल्या डोळ्यात पाणी आल्याशीवाय रहात नाही, तीच गोष्ट द्रास कारगीलचीही.

या आणि अश्या अनेक ठिकाणी फिरताना मला अनेक जीवलग मित्र भेटले. भ्रमंतीच्या निमीत्ताने जसे अनेक भाग मनात घर करुन राहीले त्या बरोबरच मनात कायम वास्तव्य करुन राहीलेले असे माझे मित्र रत्‍नदिप पाटील आणि आत्माराम परब यांच्याविषयी थोडं सांगितल्या शिवाय पुढे जाता येणार नाही. एखादा माणुस खुपच चांगला वागु लागला की आपणाला त्याचा संशय येतो. पण त्यामागे केवळ चांगुलपणाच आहे हे समजल्यावर आपण जीवाभावाचे होऊन जातो.रत्‍नदिपच्या बाबतीत माझं तसच झालं. ताडोबाच्या जंगलात अगदी दहा फुटांवरुन मला वाघाचा फोटो घेता आला तेव्हा माझ्या पेक्षा जास्त आनंद रत्‍नदिपला झालेला मी पाहीला. हे माझे दोन्ही मित्र दुस-या ला देताना काही हातचं राखत नाहीत, असेल त्या मधुन शंभरटक्के देण्याचा त्यांचा प्रयत्‍न असतो.

संतांचा स्पर्श होउन पावन झाल्याच्या कथा आपण खुप ऎकतो, पण मला जेव्हा बाबा आमटेंच्या चरणस्पर्शाचा लाभ झाला आणि दोन दिवस आनंदवनात राहता आले ते दिवस माझ्या आयुष्यात अनुभुतीचे होते. फक्त दगड धोंडे साप आणि बोरी-बाभळी सोडुन जिथे काहीच नव्हतं तिथे बाबानी माणुसकीचा मळा पिकवला आणि त्याला भरभरून आलेली पीकं पाहून मी नतमस्तक झालो.

प्रत्येक चांगल्या कामातून चांगलेच फळ मिळते, अशी माझी श्रद्धा आहे. फोटोग्राफीच्या छंदातून मला माझ्या आठवणी कॅमे-यात बंद करता आल्याच आणि ते फोटो पुन्हा पुन्हा बघताना, दुस-याना दाखवताना पुनःप्रत्ययाचा आनंदही मिळाला. अश्याच एका प्रदर्शनाच्या वेळी नामवंत छायाचित्रकार अधिक शिरोडकर आणि अर्थतज्ञ गिरीश वासुदेव यांच्याशी समोरासमोर बसून गप्पा मारायची संधीही मिळाली. अश्या अनेकांच्या सान्नीध्यात अनुभव विश्व मोठं होत गेलं.

मुबईसारख्या शहरात, धकाधकीच्या जीवनात आपला व्यवसाय सांभाळून हे सर्व करायचं तर घरातून भक्कम साथ देणारी माणसं लागतात. माझ्या बायकोचे आणि मुलीचे पुर्ण सहकार्य असल्यानेच मी हे करू शकलो. '' जिथे जाशील तिथे तुला चांगलीच माणसं भेटतील '' हा माझ्या आईने दिलेला आशिर्वाद सदोदीत पाठीशी असल्याने मी सतत चांगल्या माणसांच्याच सहवासात राहीलो. कींबहूना जगात जास्त प्रमाणात चांगली सज्जन माणसं असल्यानेच आपण सुखन्नैव वावरू शकतो असा माझा विश्वास आहे.


लेखकः  नरेंद्र प्रभू




3 comments:

  1. konkan vishyi kaahi lekh shodhata shodhata tumcha blog sapadala aani tyatch haaraun gelo. Kuthlya shabdat kautuk karave kalat naahi. Tumchya gavachya paawasache varnan saglyat aawadale.

    Dhananjay

    ReplyDelete
    Replies
    1. धनंजय साहेब,
      आपला अभिप्राय आणखी लिहायला प्रवृत्त करणारा आहे.
      धन्यवाद.

      Delete
  2. धनंजय साहेब,
    आपला अभिप्राय आणखी लिहायला प्रवृत्त करणारा आहे.
    धन्यवाद.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates