आज आम्ही लेहमध्येच फिरणार होतो. सिंधू नदी ( Indus) कित्येक वर्षे फक्त वर्णनातून ऎकलेली, वाचलेली आज प्रत्यक्ष समोर होती. घाटावर जाऊन पाण्याला स्पर्श केला. शांत, थंड जल, काठाला थोडीशीच हिरवाई.
भावनांनी मनात गर्दी केलेली. उत्तर-पुर्वेला काराकोरम रांगा, दक्षिण-पुर्वेला हिमालयाच्या रांगा आणि गाभा ट्रांस हिमालयन रांगांचा, अशा प्रदेशात आता आमचा संचार
सुरू होता. थिकसे गुंफेत आम्ही पोहोचलो तेव्हा अर्ध्यातासात परत फिरु असं वाटलं पण दोन तास कसे संपले ते
समजलच नाही. ही प्राचीन गुंफा नेत्रसुखद तर आहेच पण कोणतही औडंबर न माजवता धार्मिक स्थान कसं असावं त्याचं प्रतिकही आहे. उत्तम मूर्तीकाम, नक्षीकाम, कमानी, रंगसंगती यांचं मिश्रण आणि त्याचाच एक भाग बनलेले लामा जेमतेम चार महिने सोडले तर निसर्गाशी दोन हात करत जगणारी ही माणसं पण त्याची कसलीही खूण चेहरर्यावर न बाळगणारी, अगदी शांतपणे सगळं चाललेलं,
सगळे हसतमुख. प्रार्थना सुध्दा देवासाठी, दिखाव्यासाठी नाही. बुध्दाची भव्य मुर्ती तर बघत रहाण्यासारखी . फोटो काढण्यातच सगळा वेळ जातो खरं तर शांतपणे बसायला हवं होतं. लडाखी स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणूनसुध्दा थिकसे गुंफेकडे पाहिलं जातं. त्यानंतर हेमिस ही लडखमधली सर्वात मोठी गुंफा पाहिली. १६३० मध्ये बांधलेली ही गुंफा इतर गुंफांहून वेगळी आहे.
शे पँलेस, लेहचा बाजार इत्यादी फिरताना लडाखी संस्कृतीचं दर्शन घडत होतं. आमच्यासारखे काही मोजके पर्यटक सोडले तर बहुसंख्य पर्यटक विदेशी होते. शांतीस्तुपाला गेलो, खाली लेह शहराचं विहंगम दृश्य पाहुन मन हरखून गेलं, भारलेल्या वातावरणातच त्या दिवशीचा सूर्य कधी मावळतीला गेला ते समजलच नाही.
(अपुर्ण....) जायचय लडाखला ? चला.....
लेखकः नरेंद्र प्रभू
No comments:
Post a Comment