17 March, 2025

निर्मळ

 

‘निर्मळ’ म्हणजे ‘मळ’ नसलेलं; ‘स्वच्छ’ मग ते जल अथवा मन काहीही असो त्याचा आस्वाद घेणारी किंवा सहवासात आलेली प्रत्येक व्यक्ती पावन होते. म्हणूनच गंगाजलाला या शृष्टीत अनन्यसाधारण महत्व आहे. गंगाजलासारखं स्वच्छ मन असणार्‍या ‘माई’ने (प्रिय मित्र आत्माराम परब यांच्या आईने) आणखी एक सुखद धक्का दिला त्याची ही गोष्ट. १५ मार्च २०२५ रोजी ‘आत्माची डायरी’ या आमच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. प्रकाशन समारंभात व्यासपिठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये माई होतीच (‘माई’ होती म्हणण्यात तिचा उपमर्द करण्याचा हेतू नाही तर आमच्या मालवणी मुलखात आईला गे ‘आवशी’ आणि देवाला रे ‘भावाशी’ असंच म्हणतात आणि समोर जे कुणी असेल ते त्याला ओ... देखील देतं.) तर माईने व्यासपिठावर हातात धरलेलं पुस्तक सोबत नेलं नाही. कार्यक्रम संपला, माई आपल्या नातवंडासोबत बाहेर पडली, दारात गर्दी होती तिथे काही काळ थांबली असताना मला माई दिसली तेव्हा निरोप घेण्याकरता मी पुढे झालो, बोलता बोलता तिची नजर हेड्विग प्रकाशनाच्या स्टॉलवर गेली. मला माईने विचारलं “पुस्तकाची किंमत काय?” मी “२५० रुपये” असं म्हणताच तिने स्वत:च्या पाकीटातले २५० रुपये काढून दिले आणि “माका एक पुस्तक व्हया” असं म्हटलं तेव्हा मी स्तंबीत झालो, ‘स्तंबीत झालो’ हा शब्द अनेक वेळा वापरला आहे पण खरंच तसा अनुभव येतो तेव्हा आपण निर्जीव खांबासारखे झाले आहोत हे जाणवतं. प्रथम मी म्हटलं थांब, पैसे नको, मी पुस्तक आणून देतो. पण माईच्या आग्रह पाहून ते पैसे घेतले, पुन्हा तिच्याच हातात देत तिला स्टॉलपर्यंत नेलं आणि तिने पुस्तक विकत घेतलं. जन्मभराची ठेव हातात धरावी तशी ती पुस्तकाला न्याहाळत होती. आपल्या बाळूला कृथार्थ भावाने पहात होती. (आत्माचा सर्वप्रकारचा विरोध डावलून त्याचं छायाचित्रं असलेलं मुखपृष्ठ मी तयार करायला लावलं होतं.)नंतर फोन करून माईला विचारलं तू ते पुस्तक विकत का घेतलं? तर म्हणाली “आपण सुरवात करून देवक व्हयी मा!, म्हणान कनवटीचे पैसे काढून दिलय. तशे काय ते माझे पैसे नाय तेच्याच वडलांचे, तेंची पेन्शन गावता तेच्यातलेच दिलय, मी खय कमऊक जातय?” हे तीचं ‘इदंनमम’ ऐकून मी पुन्हा अवाक झालो.

स्वत:च्या मुलाची ‘ईशा टुर्स’ ही कंपनी आता देशात नावारूपाला आली आहे. देशाची सिमा उलंघून ‘ईशा टुर्स’ आज घडीला पंचवीस पेक्षा  जास्त विदेशी सहली आयोजित करीत आहे. ‘लडाख... प्रवास अजून सुरू आहे’ आणि ‘हे प्रवासी गीत माझे’ अशी दोन पुस्तकं प्रकाशीत झाली आहेत आणि आता हे तिसरं पुस्तक कालीदास नाट्यगृहात पर्यटकांच्या भरगच्च उपस्थित प्रकाशीत झालं आहे याची पुरे पूर कल्पना असूनही माई आपल्या मुळ भूमिकेत कायम आहे. हे ईश्वराचं देणं आहे, ही तिची मनोधारणा कायम आहे. पुस्तकाला हा असा आशीर्वाद मिळाला, मी धन्य झालो.  

ता.क. माईने “बाळू लडाखाक जावक कीती पैसे लागतत रे...?” असं विचारलं तो किस्सा आमच्या ‘आत्माची डायरी’ या पुस्तकात लिहिला आहे तो जरूर वाचा.                               

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates