12 May, 2025

तिथे नांदे शंभू कैलासाचा पती!

 

(दिनांक ११ मे २०२५ रेजी महराष्ट्र टाईम्समध्ये आलेला माझा लेख)


 

शिव-पार्वतीचं निवासस्थान, गणेशाचं जन्मस्थान आणि म्हणूनच की काय, हिंदूंचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे. आयुष्यात एकदा तरी पाहावीत अशी जगातील कितीतरी ठिकाणं असतील, पण कैलास-मानसरोवरचं स्थान भारतीयांच्या मनात पक्कं घर करून असतं आणि या पवित्र स्थळाचं दर्शन घेण्यासाठी सगळेच आतूर असतात. ‘कैलास’ या शब्दाभोवतीच आध्यात्माचं गूढ वलय आहे. इहलोकाची यात्रा संपवून परलोकात जाणार्‍याला कैलासवासी म्हणून संबोधलं जातं. ऋषी, मुनींचं वास्तव्य ज्या हिमालयात झालं आणि आजही जगभरातून हजारो लोक साधनेसाठी ज्या ठिकाणी धाव घेतात, त्या हिमालयात एका अढळ स्थानावर कैलास पर्वत उभा ठाकला आहे. पायथ्याला सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचा उगम आणि मानसरोवराचं पवित्र जल असलेला विशाल जलसागर आहे. पाहताक्षणी निसर्गाच्या विराट दर्शनानं नतमस्तक व्हावं असं हे ठिकाण आहे. हे विराटरूप म्हणजेच साक्षात शिवशंकर.


असं हे पवित्र स्थान आपल्या शेजारच्या तिबेटमध्ये आहे. तिबेटचा ताबा चीनने घेतल्यानंतर १९५० पासून भारतीयांना कैलासचं दर्शन दुर्लभ झालं होतं. १९८० साली तत्कालीन परराष्ट्र मंत्री श्री. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि पुन्हा एकदा कैलासची यात्रा भारतीयांना करता येवू लागली. भारताच्या उत्तरांचल राज्यातून खडतर पायवाटेने चालत जाऊन तिबेटमध्ये प्रवेश करता येतो आणि पुढे कैलास-मानसरोवरला जाता येतं. भारताच्या परराष्ट्र खात्यामार्फत जी कैलास-मानसरोवर यात्रा आयोजित केली जाते ती या मार्गानेच नेली जाते. या यात्रेचा कालावधी २७ दिवसांचा असतो. या शिवाय नेपाळ-काठमांडू मार्गेही ही यात्रा करता येते. अनेक प्रवासी कंपन्या याच मार्गे यात्रेकरूंना नेतात आणि काठमांडूला थेट पोहोचता आल्याने तिथूनही ही यात्रा १३ दिवसात पूर्ण करता येते. साधारणत: मे ते सप्टेंबर महिन्यात म्हणजेच तिबेटच्या उन्हाळ्याच्या दिवसात ही यात्रा करता येते.


कैलास-मानसरोवर यात्रेसंदर्भात अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत. ही यात्रा अत्यंत खडतर आहे. ठरावीक आजार असलेल्यांना ही यात्रा करताच येणार नाही, आणि आयुष्याच्या उत्तरार्धात ही यात्रा करावी असे अनेक समज आहेत, जे अपुर्या माहितीवर आधारित आहेत. ही यात्रा काठमांडू मार्गे केल्यास, काठमांडू ते मानसरोवर या संपूर्ण प्रवासाला रस्तामार्गे जीप किंवा बसमधून जाता येते. या मार्गात कुठेही चालावे लागत नाही. असं असलं तरी, या यात्रेला जाण्यापूर्वी किमान दोन महिने रोज सकाळी किमान एक तास जलद चालण्याचा व्यायाम करावा लागतो. प्राणायाम करणे, टेकडी चढणे किंवा ट्रेकिंगला जाणे यामुळे आपल्या फुप्फुसाची क्षमता वाढते आणि शरीरातील स्नायू बळकट होण्यास मदत होते. त्यामुळे, यात्रेदरम्यान याचा चांगलाच फायदा होतो.

मानसरोवरची उंची समुद्रसपाटीपासून १५,६०० फुटांच्या जवळपास असल्याने, त्याठिकाणी हाय अल्टीट्यूड सिकनेसचा त्रास होऊ शकतो. साधारणपणे, माणूस दहा हजार फुट उंचीवर गेल्यावर हाय अल्टीट्यूड सिकनेस (HAS) किंवा ऍक्यूट माऊंटन सिकनेस (AMS) चा त्रास होऊ शकतो. एवढ्या उंचीवर असलेली विरळ हवा आणि त्यामुळे असलेला कमी दाब असलेला ऑक्सिजन यामुळे हा त्रास होतो.


अशा विरळ हवेत शरीरातील पाणी वेगाने कमी होत आहे आणि फुप्पूसातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्याने त्रास होऊ शकतो. अचानक जास्त उंचाईवरून प्रवास झाल्याने हा त्रास उद्भवू शकतो. असं असलं तरी हा त्रास तात्कालिक स्वरूपाचा असतो. जर हळू हळू वर चढत गेल्यास असा त्रास कमी होतो. डोकं दुखणं, थकवा जाणवणं, पोटदुखी, नीट झोप न येणं अशी त्रासाची लक्षणं असतात आणि त्यामुळे चिडचिड होणं, मळमळल्यासारखं होणं, उलटी येणं, चक्कर येणं असे त्रास होऊ शकतात. यावर हळू हळू उंचीवर जाणे हा सर्वात चांगला उपाय आहे. असं केल्याने विरळ हवेची शरीराला सवय होते. अशा उंच ठिकाणी जोरदार हालचाल न करणं (उदाहरणार्थ जलद चालणं, धावणं हे टाळावं), आल्कोहोलिक पदार्थ टाळणं, धूम्रपान न करणं अशा प्रकारची काळजी घेतल्यास त्रास कमी होतो. उंचावरच्या वातावरणाशी जुळून घेण्यासाठी हळू हळू उंचीवर गेल्यावर तिथे काही काळ विश्रांती घ्यावी. थोडं अधिक उंचीवर जाऊन पुन्हा कमी उंचीवर यावं. यामुळे शरीराला त्या वातावरणाची सवय होते (Altitude acclimatization). भरपूर प्रमाणात पाणी पिणे, जास्त उंचावर न थांबता लवकर खाली येणे अशा गोष्टी जाणीवपूर्वक केल्यास यात्रा सुखद होऊ शकते. यात्रेच्या कालखंडात, तिबेटमध्ये उन्हाळा चालू असला तरीही तिथली हवा महाराष्ट्राच्या विचारात खूपच थंड असते आणि जोरदार बोचरे वारे वाहत असल्याने पूर्ण यात्रेदरम्यान उबदार कपडे अंगावर असणे आवश्यक आहे.


नेपाळमध्ये दाखल झाल्यावर तिथल्या पशुपतीनाथासह अनेक उत्तम आणि प्राचिन मंदीरांचा परिसर फिरून पाहताना यात्रेला जाण्यासाठी योग्य वातावरणाची निर्मिती होते आणि पावलं आपसूकच मानसरोवरला प्रस्थान करण्यासाठी उतावीळ होतात. काठमांडू शहर सोडल्यावर लगेचच हिरव्यागार निसर्गाचा आनंद लुटत आपला प्रवास सुरू होतो. मनोहारी धबधबे आणि नदीचा खळखळता प्रवाह याचा रम्य देखावा पाहात हा प्रवास काही ठिकाणी रस्ता खराब असला तरी सुखद होतो. काठमांडू शहरापासून जस-जसे आपण दूर येऊ लागतो तसतशी थंडी आपली जाणीव करून देते. काठमांडूपासून रस्ते मार्गाने कोदारी या नेपाळ-तिबेटच्या सीमेलगतच्या गावात गेल्यावर पारपत्र आणि प्रवेश विषयक बाबींची पूर्तता केल्यावर आपण तिबेटमध्ये येऊन दाखल होतो. तिबेटमधले रस्ते हिमालयातले असूनही उत्तम असल्याने पुढचा प्रवास चांगला होतो आणि गाडीबाहेरच्या देखाव्यांचा आनंद मनोसोक्त लुटता येतो. घनदाट पर्वतराजींमधून नागमोडी वळणं घेत जाणारे रस्ते, खळाळते प्रवाह, आल्हाददायक हवा, बौद्ध धर्मीयांनी ठिकठिकाणी बांधलेल्या प्रार्थनेच्या पताका या सर्वांचं धावतं दर्श घेत गाडी तिबेटच्या निर्जन प्रदेशातून जात असते आणि क्षितिजापर्यंत पसरलेला पठारी प्रदेश सुरू होतो. आता झाडा-झुडुपांची दाटी कमी होते आणि थोडासा वैराण प्रदेश सुरू होतो. हवेतला गारवा वाढतच जातो आणि त्याच बरोबर समुद्र सपाटीपासून वाढत जाणारी उंची एका वेगळ्याच प्रदेशात आल्याची जाणीव आपल्याला करून देते. सूर्य कलतीला जात असतानाच आपलं मुक्कामाचं गाव येते, मंडळी गाड्यांमधून पाय उतार होतात, वाफाळता चहा आणि शेरपा लोकांचं आतिथ्य याची मजा घेताना प्रसन्न मोकळ्या हवेत दिवसभराच्या प्रवासाचा शीण नगण्यच वाटतो.

मानसरोवरला १५,६०० फुटांच्या उंचीवर जाण्याच्या आधी, वाटेतल्या एखाद्या गावात एखादी टेकडी चढण्याचा सराव केल्यास, आपल्याला आपली क्षमता समजते. शिवाय, अशा उंचीवर वावरण्याची सवयही लागते. मानसरोवरच्या पुढे कैलासच्या परिक्रमेच्या तयारीसाठी या सरावाचा नक्कीच फायदा होतो, आणि या भागात कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी, याची उजळणी होते.

तिबेटमधील डोंगराळ आणि मागास भागातून आपला प्रवास सुरू असला, तरी निसर्ग आणि बदलत जाणारा प्रदेश पाहात असताना मानसरोवरला पोहोचण्याची ओढ आणखीच वाढत जाते. निसर्गाच्या अफाट आणि बदलत्या रुपामुळे आपली जिज्ञासा वाढते. आपलं धावणारं वाहन, वाटेत लागणारं एखादं छोटं गाव, आणि मेंढ्या हाकणारे मेंढपाळ, एवढा काय तो चर सृष्टीचा संपर्क; बाकी सगळं कॅनव्हासवरचे चित्र वाटावं असंच दिसतं. मुक्कामाचं ठिकाणही नेहमीपेक्षा वेगळं आहे, चार भिंती आणि झोपण्या-जेवण्याची सोय. आधुनिक युगापासून चार पावलं दूर असण्यातली मजा इथेच अनुभवावी लागते. सर्व सुविधांपासून वंचित असलेल्या या ठिकाणांनी आपलं लक्ष कैलासकडे केंद्रित करणं अत्यावश्यक असतं. सभोवताली विशाल पसरलेला निसर्ग अनुभवताना आपसूकच मन विरक्त होत जातं.

मैलोनमैल पसरलेल्या प्रदेशावर नजर फिरवत असतानाच अचानक मानसरोवराची पहिली झलक नजरेस पडते. आणि आजवर केलेल्या तपश्चर्येचं फलित मिळाल्याचा आगळा आनंद नसानसातून प्रवाहीत होऊ लागतो. मग तो क्षण जवळ येतो, आपण मानसरोवराच्या काठावर उभे आहोत, समोर दूरवर पसरलेलं निळ्याशार जलाने भरून वाहणारं मानसरोवर आहे. सूर्यप्रकाशात चमचमणारे पाणी, त्याचे बदलते रंग, अंगावर रोमांच उभा करणारा गार-गार स्पर्श, पवित्र तीर्थाची याची देही याची डोळ्यासमोर आलेली पहिली भेट. आकाशातील अनंत रंग, पिंजारलेल्या ढगांच्या क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या आकृती आणि त्या सर्वांच्या समोर उभं असणारं साक्षात कैलास शिखर. हे बाहेर तसंच, मनात उचंबळून आलेला भावभावनांचा कल्लोळ. अतिप्रियतेने सहलसाथींची घेतलेली गळाभेट. एका दर्शनाने सारं कसं क्षणात बदलून जातं. सारा शीण, सारा भार सत्वर नाहीसा होतो, मन भारावून जातं. आपण भानावर येतो तेव्हा आता एकच ध्यास लागलेला असतो तो कैलासाच्या परिक्रमेचा. मानसरोवरच्या दर्शनाने पावन झालेलं मन-शरीर आता त्या एकाच विचाराने प्रेरीत झालेलं असतं. परिक्रमा.....! परिक्रमा.....!

कोदारी, न्यालम, सागा, होरचू, चूई गुंफा आणि दारचेन असा काठमांडू पासून सुरू झालेला मोटार प्रवास आता संपून पायी किंवा घोड्यावरून परिक्रमा करण्याचा दिवस येऊन ठेपतो. मनात एक आगळीच हुरहुर साठून राहाते. तासाने तासाला, काही वेळा मिनिटागणिक बदलत जाणारं वातावरण. बोचरे अतीशीत वारे, काळंकुट्ट आभाळ आणि त्या वातावरणाला साजेशी बर्फ वृष्टी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, परिक्रमेत आपला तग लागणार का? हा प्रश्न आणि परिक्रमा करायची लागलेली अनिवार ओढ इथे कस लागतो आपल्या मानसिक तयारीचा आणि आपल्या बरोबर असलेल्या सहलसाथीच्या नेतृत्व गुणांचा. मनाची पूर्ण तयारी करत आपण परिक्रमेसाठी सिद्ध होतो. स्वत:च्या पायांनी आणि मर्जीने यमद्वारापाशी येऊन उभं राहिल्यावर मनात जे भाव जागृत होतात ते वर्णनातीत असतात. जणू इहलोकीची यात्रा इथे संपते आणि यमद्वाराकडून पावलं पुढे पडतात ती कैलासाच्या प्रदक्षिणेसाठीच.

यमद्वार मागे टाकून आपण जणू परलोकातच प्रवेश करीत असतो. दमछाक करणारा चढा रस्ता, कोरडं आणि शुष्क वातावरण, उन्हाचा चटका, थंडीचा शहारा, पायांना ओढ, पण हे सगळं मागे टाकून मन मात्र पुढेच धावत असतं. त्या विराट रुपाच्या दर्शनासाठी. खरं तर, एव्हाना आपणही त्याचाच एक भाग बनलेले असतो. तो निळकंठ, कैलासपती आपल्याला आत सामावून घेत असतो. जय भोले! या नादात निनादत असताना पुन्हा एकदा बळ एकवटून आपण चालत राहातो. वाटेत उमेद वाढवणारं कैलास शिखराचं दर्शन होत राहातं. मजल दर मजल करत करत पहिल्या दिवसाच्या चालीनंतर रात्रीच्या मुक्कामाचा पडाव येतो.... दिरापूक. कैलास शिखराचं दर्शन इथे अगदी जवळून होतं. आता त्याच्या आणि आपणामध्ये कुणीच नसतं. त्या अनादी अनंताच्या दर्शनाने मन तृप्त होतं. दिवसभराचा १२ किलोमीटरच्या प्रवासाचा शीण पळून जातो आणि दुसऱ्या दिवशीच्या २२ किलोमीटरच्या प्रवासासाठी मन सज्ज होतं.

दोन रात्री आणि तीन दिवसांत पूर्ण होणारी परिक्रमा या प्रक्रियेचा महत्वाचा भाग म्हणजे दुसऱ्या दिवशी असलेला प्रवास. या प्रवासात १८,६०० फुट उंचीवरचा डोलमा पास पार करणे फार महत्वाचे आहे आणि याच्यावर बऱ्याच चर्चा होत असते. पाठीवरचे ओझे (तिथे वजन खूप नसले तरी थोडं वजन आवश्यक असते), पाण्याची उपयुक्तता, ताकद वाढवणारा सुकामेवा या सर्वांचा महत्व पहिल्याच दिवशी स्पष्ट होतो, तसंच हातातली आधाराची काठी जीवनसाथीच्या रूपात वाटते.

दिरापूकचा मुक्काम हलवल्यावर लगेचच डोलमा पासची उंची खुणावू लागते. जय भोलेनाथचा गजर करीत प्रत्येकजण आपल्या ताकदीप्रमाणे अंतर कापत जातो. चहू बाजूंला पसरलेला बर्फ आणि आकाशाला गवसणी घालायला निघालेले यात्रेकरू. एका वळणावर ही रांग दिशेनाशीत होते, प्रत्येकाला जी जागा खुणावत असते तिथे डोलमा पास सामोरा येतो. विजयी वीराप्रमाणे एकेका करत यात्रेकरू तिथे पोहोचतो. आपल्या श्रद्धेप्रमाणे पूजा करीत आहेत. हाच तो यात्रेतला परमोच्च बिंदू. थोडा वेळ थांबून यात्री उताराला लागतात, तोच समोर खाली गौरी कुंडाचे दर्शन घडते. इथेच गणेशाचं जन्मस्थान असल्याचं मानलं जातं. पुराणात वाचलेली ठिकाणं प्रत्यक्ष पाहताना मन उल्हसित होतं. आता त्या खिंडीतून उताराला लागलेले यात्रेकरू महत्त्वाचा टप्पा पार केल्याच्या आनंदात आणि बाजी मारल्याच्या ऐटीत मार्गक्रमण करीत जातात. पुन्हा कैलासाचं दर्शन होतं. हात आपसूकच जोडले जातात. संध्याकाळपर्यंत लांबलेला प्रवास झुथूलपूक या गावात संपतो. आजचा पडाव इथेच आहे. यात्रेतला महत्त्वाचा भाग पार झाल्याने सर्वांचीच कृतकृत्य झाल्याची भावना असते.


तिसऱ्या दिवशीचा आठ किलोमीटरचा प्रवास हा परिक्रमा पूर्ण होणार या आनंदातच सोपा वाटू लागतो. प्रवासादरम्यानची बर्फवृष्टी आणि पाऊस यांची तमा न बाळगता, आधीच केलेल्या पूर्ण तयारीमुळे हा प्रवासही सुखरूप पार पडतो. पुन्हा लांबून मानसरोवराचं दर्शन होतं. परिक्रमेच्या आधी तिथे केलेलं होम हवन आठवतं. मंडळी परतीच्या प्रवासाला लागतात. काही लोकांना वाटतं की माणसं असा खडतर प्रवास का करतात? याचं उत्तर म्हणून एक प्रश्नच विचारावा लागेल; की गिर्यारोहक एव्हरेस्ट का चढतात? किंवा विक्रमवीर नायगारा का ओलांडतात? मित्रहो, यालाच जगणं म्हणावं नाही का? अशा ठिकाणी गेल्यावर जगण्यातली मजा आणखी वाढते आणि उर्वरित आयुष्याला ही काही अर्थ प्राप्त होतो. आज आपल्या घरात ज्या सोयी-सुविधा हात जोडून उभ्या असतात, त्याचं एरवी आपल्याला काहीच कौतुक वाटत नसतं.

पण अशा ठिकाणी प्रवास करून आल्यावर आपणाला आपलं किती आरामदायी जीवन जगत आहोत याचा साक्षात्कार होतो. या अशा प्रवासांमधून आपण जगण्याची कला शिकत असतो. त्या विराट दर्शनाने आपलं मनही विशाल होतं. जगण्याचा दृष्टीकोन बदलून जातो.

 

नरेंद्र प्रभू

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates