Showing posts with label त्यांच्या स्वप्नांचा प्रवास..... Show all posts
Showing posts with label त्यांच्या स्वप्नांचा प्रवास..... Show all posts

11 July, 2026

गाजलेली मैफिल आणि निळाईची गाज



थबकल्या झिम्माड धारा, स्तब्ध ही उनाड वारा

नाविकाचे गीत माझ्या, ऐकती करिती किनारा

लोक भेटायास आले, निशब्द होऊन गेले

शब्द-शब्द कवितेतला अन् भावही वेचून गेले

सागराचे गुज त्याच्या, साठले गीतात होते   

वादळाची स्पंदने, धडकून कापरे भरीते

 आदळे हदयात माझ्या, आंधळा अफाट दर्या

स्वार तो झाला तयावर, पेलले आकाश लिलया  

सचैल न्हाली सांज होती, हरपलेले भान होते

कोण कोणाला मिळाले? का कुणा ठाऊक होते?  

                                                 नरेंद्र प्रभू

काल प्रभादेवी मुंबईत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या पु. ल. कट्ट्यावर लेखक, कवी कॅप्टन वैभव दळवी यांचा निळाईची गाज हा बहारदार कार्यक्रम सादर झाला आणि गेले आठ दिवस मुंबईत बरसणारा पाऊस दोन तासात रसिक मनावर कोसळून गेला. तुडुंब भरलेल्या नॅनोसभागृहात गर्दी ओसंडून वहायला लागली आणि आयोजकांना रसिकांसाठी दुसरं दालन खुलं करावं लागलं. निळाईची गाज ऐकायला सागराला उधाण यावं तशीच गर्दी लोटली होती आणि जमलेल्या श्रोत्यांना कॅप्टन वैभव दळवी यांनी तृप्त करून सोडलं. त्यांच्या कवितेचा भावार्थ, अत्यंत नेटकं आणि प्रभावी सादरीकरण, त्याला लाभलेली दृकश्राव्य माध्यमाची साथ आणि टाळ्यांचा कडकडाट मैफिलीला सातवे आसमान पार घेऊन गेला.

·         कविता आणि आयुष्याची लय: संवादाची सुरुवात कवितेच्या सामर्थ्याबद्दल झाली. कॅप्टन दळवी यांनी स्पष्ट केले की, आपल्या दैनंदिन जीवनातील साध्या गोष्टींपासून ते विश्वाच्या विशालतेपर्यंत सगळीकडे कवीचे मन आणि गाणे दडलेले असते.

·         लहानपणीचे संस्कार: कॅप्टन दळवी यांनी शिवडी-लालबाग येथील गिरणगावातील त्यांच्या बालपणाबद्दल सांगितले. त्यांचे वडील, जे स्वतः एक कवी होते, त्यांनी त्यांना अनेक नामवंत साहित्यिक व्यक्तींशी ओळख करून दिली, ज्यामुळे त्यांची साहित्यातील आवड निर्माण झाली.

·         समुद्र आणि वादळाचे अनुभव: समुद्राशी त्यांचे नाते खूप घट्ट आहे. त्यांनी 'भरून आलं आभाळ' आणि 'जहाज बुडता बुडता' या कवितांद्वारे समुद्राचे सौंदर्य आणि वादळातील त्याचे रौद्र रूप यावर भाष्य केले आहे.

·         शिस्त आणि सर्जनशीलता: गणवेशातील शिस्त आणि कवितेतील मुक्त अभिव्यक्ती यांचा मेळ कसा साधता, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, युनिफॉर्म हे त्यांचे कर्तव्य आहे, तर कविता ही त्यांची आत्माभिव्यक्ती आहे .

·         जीवघेणा प्रसंग: त्यांच्या कारकिर्दीतील एक अत्यंत थरारक प्रसंगाचे वर्णन त्यांनी केले, जेव्हा अटलांटिक महासागरात त्यांचे जहाज बुडत होते. त्यांनी आणि त्यांच्या टीमने धैर्याने आणि युक्तीने त्या संकटावर कशी मात केली, हा प्रसंग अतिशय प्रेरणादायी मुळापासून ऐकण्यासारखा आहे.

·         भारतीय सैनिकांना आदरांजली: कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी त्यांची गाजलेली कविता 'कोण लागतो रे तो तुमचा?' सादर केली. आपल्या भारत देशाच्या सियाचीन सारख्या दुर्गम सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या त्यागाचे आणि त्यांच्या संघर्षाचे मर्म या कवितेतून त्यांनी मांडले आहे.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी च्या पु. ल. कट्ट्यावरदर शुक्रवारी अशी मैफिल जमत असते, जमलं तर नव्हे जमवून याच.

ता. क. या कार्यक्रमाचा दुसरा भाग इथेच सादर व्हावा अशी मागणी रसिकांमधून कार्यक्रम संपता संपता केली गेली हेच या कार्यक्रमाचं फलित आहे.      



19 May, 2022

एका व्रताची सांगता

संपादक श्री.पुरुषोत्तम रानडे

एप्रिल २०२२ पासून ईशान्य वार्ताचं प्रकाशन बंद केलं असं वाचलं आणि का कोण जाणे हायसं वाटलं. घरात एकुलता एक माणूस कमावता असताना महानगर टेलिफोन निगमच्या नोकरीला रामराम करून ईशान्येकडच्या जनतेला देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी सिद्ध होणं हिच एक कर्म कठीण घटना होती. १४-१५ वर्षांपुर्वी पुरुषोत्तम रानडेंनी हे शिवधन्युष्य हाती घेतलं आणि एप्रिल २०२२ पर्यंत अव्याहतपणे ईशान्य वार्ताचं संपादन, प्रकाशन, वितरण, लेखन..... (ही यादी कितीही वाढवता येईल) हा माणूस करीत राहिला. ध्येयनिष्ठा आणि अंगचे उत्तम गुण सोडून कसलंच पाठबळ नसतना राष्ट्रधर्मासाठी सतत कार्यरत राहिलेल्या या उत्तम पुरूषाची तळमळ मी जवळून पहात होतो. एखादं मासिक वेळच्यावेळी प्रकाशित करणं या मागे किती व्याप असतात हे त्यात काम केल्याशिवाय कळणार नाही. बरं महाराष्ट्रापासून हजारोमैल दूर असलेल्या ईशान्य भारतातील सात राज्यांचा लेखाजोखा आणि वार्तांकन एवढाच या मागचा उद्देश्य नव्हता तर तिथलं समाजमन मुख्यभूमीशी जोडलं गेलं पाहिजे अशी तळमळ होती आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची तयारी रानडे सतत करीत होते.

करोनाचा भयाण काळ आला आणि सगळ्यांच्याच जगण्याला संघर्षाची धार आली आणि कदाचीत त्यातच ईशान्य वार्ताचं प्रकाशन बंद करण्याचा समयोचीत निर्णय घ्यावा लागला. शिवाय आत्ताच्या आधुनिक प्रसारमाध्यमाच्या युगात प्रिंट मिडीया मागे पडत आहेच. कुठलीही बातमी सांगितली तरी नवीन काहीतरी सांगा असा समोरच्याचा भाव असतो. ते नव्या स्वरुपात येईलही, तुर्तास छपाई बंद आहे.

मासिक छापण्याच्या ताणातून संपादक श्री.पुरुषोत्तम रानडे सध्यातरी मोकळे झाले आहेत. अपवाद सोडता सगळीच प्रसार माध्यमं नकारात्मक घटनांचा रतीब घालत असल्याने येवढं सगळंवाईट घडत असताना, हे जग चालतं तरी कसं? असा प्रश्न पडतो, तेव्हा रानडेंसारखे अनेकजण सकारात्मक कामं निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे करीत असतात म्हणून; असं त्याचं उत्तर मिळतं.  गेलं एक तप हा यज्ञ चालू होता. एवढा काळ एखादं काम सातत्याने करीत रहाणं यालाच व्रत म्हणतात, रानडेंनी या एका व्रताची नुकतीच सांगता केली म्हणायचं.  

नरेंद्र प्रभू

या विषयी आणखी वाचा:

भारत जोडो

समर्पीत पत्रकार, संपादक : पुरुषोत्तम रानडे

ईशान्य वार्ता

ईशान्य वार्ताचं दमदार पुनरागमन

मिशन मणिपूर - एकांडय़ा देशभक्ताची वीरगाथा

राष्ट्रप्रेम शिकवावं का लागतं?

 


27 February, 2022

Memoir

 


फुल फुलल्यानंतर त्याचा सुगंध सर्वदूर पसरतो पण ते उमलताना पहीलं म्हणजे स्वर्गीय आनंद म्हणजे काय त्याची प्रचिती येते. कला विकसीत होताना पहायला मिळणं ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. सौ. रेखाताई भिवंडीकर या त्यापैकी एक आहेत. त्याच्या कलेची परीपक्वता न्याहाळायची असेल तर अशी संधी आपणाला उद्याच चालून येणार आहे. 


सुप्रसिद्ध चित्रकर्त्या सौ. रेखाताई भिवंडीकर यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या 

चित्रांचं
मेमोयरहे एकल चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, हिरजी जहांगीर कलादान,१६१ बी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई ४०० ००१ येथे मांडण्यात येणार आहे.  सदर प्रदर्शन दि. २८ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२२ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील.


सौ. रेखाताई भिवंडीकर या उत्तम छायाचित्रकार आहेत. उत्तम निसर्ग छायाचित्रं टिपणं हा त्यांचा छंद आहे. पण कुंचल्यातून चित्र साकार करताना कॅनव्हासवर जे उमटतं त्यांची रचना त्यांच्या स्मृतीपटलावर कितीरती आधीच झालेली दिसते. त्यांच्या संस्मरणातून साकार झालेली चित्रं पहाताना आपण आपल्याच बालपणातील जगात कधी पोचतो हे समजत देखील नाही. विविध माध्यमातील आणि शैलीमधील चित्रं साकारताना त्याना नकळत त्यांची स्वता:ची अशी एक शैली सापडली आणि मग रंग-कुंचल्याचा जो अविष्कार कॅनव्हासवर झाला त्यातून ही चित्रमालीका कला रसिकांच्या भेटीला येत आहे.   

आई आणि मुलीचं साधेपणात व्यतीत झालेलं जीवन, त्यालील बारकावे, प्रेम, जिव्हाळा, निखळ मैत्री, ममता अशी सौदर्य स्थळं,आणि उमदेपणा, भावूकपणा  यथार्थवादी शैलीमध्ये रेखातांईंच्या चित्रांमधून प्रतिबिंबित झाला आहे. मानवी जीवनाची ही लड त्यानी किती हळूवारपणे कॅनव्हासवर उतरवली आहे ते अनुभवण्याची सुवर्णसंधी मुंबईकर कला रसिकांनी मिळणार आहे याचा जरूर लाभ घ्यावा.

नरेंद्र प्रभू

       


09 February, 2022

हिम्मतवान



कितीही मोठं संकट आलं तरी हार न मानता त्याला सामोरं जात प्रयत्नांची पराकाष्ठा करत यशस्वी होणारी माणसं आपल्याला सतत प्रेरणा देतात. मित्रवर्य आत्माराम परब यांच्यामुळे सौ. स्मिता बापट-जोशी यांच्याशी परिचय झाला आणि त्यांचा चिरंजीव सिद्धार्थ याच्याशी दोस्ती झाली. जसं सिद्धार्थ हा स्मिता बापट-जोशी यांचा मुलगा एवढीच त्याची ओळख सांगाता येणार नाही तशीच सौ. स्मिता बापट-जोशी या सिद्धार्थची आई एवढीच त्यांची ओळख सांगता येणार नाही. ही दोन्ही व्यक्तिमत्व जाणून घ्यायची तर राजहंस प्रकाशनाचं आयुष्याचं जिगसॉ पझल सोडवणारा सिद्धार्थ हे पुस्तक वाचलं पाहिजे.



ईशाटूर्सच्या नुकत्याच पार पडलेल्या वाराणसी-प्रयागराज-अयोध्या-लखनौ या सहलीत या दोन्ही मायलेकाला जवळून वाचता आलं आणि जीवनाचे अनेक पैलू पुन्हा एकदा समजून घेता आले. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस, २०१९ मध्ये चमकाणारा सिद्धार्थ स्वत:ला सिद्ध करतोच पण हे घडताना त्याला स्मिता ताईंनी कसे पैलू पाडले असतील याचा अचंबा वाटतो. उव्दिगनेती खोल खाई याचा अर्थ खुप खोल आहे. स्वत:चा गुंता सोडवताना माणसांना आपल्यात गुंतवणारा सिद्धार्थ आज आपल्या पायावर उभा रहात आहे, आईवर खुप माया करणारा सिध्दार्थ आपल्याही मनात घर करतोच पण घराबाहेर पडून अनेक समाजोपयोगी उपक्रमात आनंदाने भाग घेतो हे ऐकून स्तिमित व्हायला होतं.

कोरोना काळात अनेकांनी हात-पाय गाळले पण याही काळात यांनी मन-मानी करून आणखी एक पाऊल पुढे टाकलंच. आईने डिझाईन केलेले टी-शर्टस सिद्धार्थने वितरीत करायला सुरूवात केली, केल्याने होत आहे रे हे सिद्ध केलं. खरं तर स्मिता ताई रोज जिगसॉ पझल सोडवत आहेत, एक एक भाग जोडत आहेत.


09 March, 2020

वसंतासवे खेळू होळी


मित्रवर्य आत्माराम परब यांनी टिपलेलं हे चित्र पाहून सुचलेली ही कविता.



रंग उषेचे लेऊन तरुवर लाल तांबडे झाले हो 
सुस्वर गाती खगवर सारे नभी भरारी घेती हो

रंग घेवूनी आकाशाचे सजली धरती आता हो 
कोण रेखितो चित्र अंबरी क्षणा-क्षणाला आता हो 

निसर्ग निर्मित रंगोत्सव हा सृजन घेऊनी आला हो 
चराचराला नवं संजीवन आनंदाचा ठेवा हो

वसंतासवे खेळू होळी रंग उसळूदे आता हो 
रंगातच राहूदे रंगूनी दंग होऊनी जाऊ हो 


25 January, 2020

समर्पीत पत्रकार, संपादक : पुरुषोत्तम रानडे


सुखासीन नोकरी आणि चौकटीतलं जगणं याला देश सेवेसाठी तिलांजली देणारा समर्पीत पत्रकार, इशान्य भारतातील जनता देशाच्या मुख्य भागाशी जोडण्यासाठी अविरत प्रयत्नशील असलेला सव्यसाची संपादक आणि मनमिळावू सच्चा माणूस म्हणून पत्रकार पुरुषोत्तम रानडे यांना महाराष्ट्रातील जनता गेली कित्येक वर्षं ओळखते. गेली अकरा वर्षं ईशान्य वार्ताचे संपादक पद भुषवणारे पुरुषोत्तम रानडे दर महिन्याला हा अंक प्रसिद्ध करण्यासाठी जी धडपड करीत असतात त्याला तोड नाही. ईशान्य वार्तासारखं पुर्वांचलातील राज्यांच्या समस्या, प्रश्न आणि प्रगती या विषयांना वाहिलेलं मासिक महाराष्टात तेही मराठीतून यशश्वीरित्या चालावणं हे खरोखरच मोठ्या जिकिरीचं काम आहे. संपादक पदाबरोबरच पडेल ते काम करण्याची वृती, अनेक संकटांवर जिद्दीने मात करायची हातोटी, प्रसंगानुरूप मासिकातील लेख, त्याचा दरवेळी उंचावत जाणारा दर्जा या सगळ्यासाठी सतत झटणारे रानडे साहेब ईशान्य वार्ताच्या परिवाराला आणि जवळच्या मित्रांना नवे नाहीत. यांच्या या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्याना या वर्षीचा उत्तम पत्रकारीता पुरस्कार जाहिर केला आहे, त्याबद्दल  या समर्पीत पत्रकार, संपादकाचं मनापासून अभिनंदन.

पत्रकारीता आणि माध्यमं याना लोकशाहीचा चौथा खांब म्हटलं जातं. समाजाच्या स्वास्थ्यासाठी, प्रगतीसाठी आणि उज्वल भविष्यासाठी सदैव सतर्क असणारा सच्चा पत्रकार हा खरोखरच पाशवी सत्तेलाही खाली खेचू शकतो. नमवू शकतो. पण आजच्या काळातील बहुतेक प्रत्रकारीता ही कुठलातरी अजेंडा नक्की करून, सनसनाटी बातम्या देण्याच्या अहारी जावून, देश विघातक शक्तींना मदत करताना आढळते. समाज प्रबोधन करण्यापेक्षा समाजात दरी निर्माण करण्याचं काम करते. दहशतावादी, बलात्कारी आणि देशाच्या शत्रूची बाजू लढवू पहाणार्‍या अशा लोकांना पत्रकर कसं म्हणायचं असा प्रश्न निर्माण झाला असताना पुरुषोत्तम रानडेंसारखं व्यक्तिमत्व हा एक आशेचा किरण नक्कीच आहे असं आवर्जून म्हणावसं वाटतं. महाराष्ट्र साहित्य परिषदेने जाहिर केलेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि उज्वल पत्रकारीतेसाठी मन:पुर्वक शुभेच्छा!

26 November, 2019

चित्रपटगृहात लडाख


ईशा टुर्सचा सहभाग असलेला कुलकर्णी चौकातला देशपांडे हा चित्रपट  विषयाची उत्कृष्ट मांडणीकुठेही न भरकटलेला आणि विचारा करायला प्रवृत्त करणारा चित्रपट तुमच्या जवळच्या सिनेमागृहात नक्की बघा.

गोंधळलेल्या अवस्थेकडून स्थिर अवस्थेकडे जाणारा जया देशपांडेच्या प्रवास... कुलकर्णी चौकातला देशपांडे, नक्की बघा तुमच्या जवळच्या सिनेमागृहात.

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित आणि सई ताम्हणकर यांची प्रमुख भूमिका असलेला "कुलकर्णी चौकातला देशपांडे" हा मराठी सिनेमा २२ नोव्हेंबर ला प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचे वैशिष्ट म्हणजे या चित्रपटाचं ४०% चित्रीकरण लडाखमध्ये झालं आहे आणि लडाख मधील या चित्रीकरणासाठी सर्व logistic support  ईशा टुर्सचा आहे. मराठी सिनेमाचं चित्रीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणावर लडाखमध्ये होण्याची ही पहिलीच वेळ असेल.




या सिनेमात ईशा टुर्सचा मोलाचा सहभाग आहे. या सिनेमामधील ३ गाणी शंकर महादेवन, श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांनी गायली आहेत. सिनेमामध्ये सई ताम्हणकर यांच्या सोबत निखिल रत्नपारखी, राजेश शृंगारपुरे, नीना कुलकर्णी आणि २ बालकलाकारांचा समावेश आहे. त्याचसोबत ईशा टुर्स ची स्मिता रेगे आणि आमचे अनेक लडाखी सहकारी या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळतील. आपण पाहिलेल्या लडाखच्या आठवणी ताज्या करायची सिनेमाच्या माध्यमातून ही उत्तम संधी आहे तेव्हा हा सिनेमा चुकवू नका.
जगभर अनेकजण काहितरी वेड घेऊन जगत असतात. झपाटून जाऊन येणार्या दिवसाला आव्हानं देत, जगण्याची नवी आव्हानं स्वीकारत झोकून देऊन जगण्यातच त्यांना रस असतो. पण असं जगण्याचं वेड जर एखाद्या बाईत असेल तर मात्र परिस्थिती वेगळी असते. मर्यादा वेगळ्या असतात.
कुलकर्णी चौकातला देशपांडे या गजेंद्र अहिरेंच्या सिनेमातली जया कालपासून अशाच वेडामुळे मनात रेंगाळत राहिली आहे. सगळं काही सुरळीतचालू असताना असमाधानी वाटणं, बेचैन वाटणं हे जगाच्या दृष्टीने वेडेपणाचंच लक्षण आहे. पिढीजात श्रीमंती असलेला नवरा, आठ वर्षांचा गुणी मुलगा आणि निवांत जगण्याची मुभा असलेलं चाकोरीतलं आयुष्य ती नाकारते. नवर्‍याच्या नावाने हळदिकुन्कवाचे समारंभ करण्यापेक्षा तिला हवी असतात ऊर फुटेपर्यंत झोकून देऊन पूर्ण करता येणारी आव्हानं. स्वतःच्या सगळ्या क्षमता आजमावून पाहायच्या असतात तिला. आणि मग जगण्यासाठी ती चौकटी मोडते. चाकोरितनं बाहेर पडते.
बोलायला सहज सोपी वाटणारी, फार प्रेरणादायी वाटणारी ही वाक्यं असतात.. चौकटी मोडणे वगैरे.. पण प्रत्यक्ष जगताना छातीत जी हिम्मत लागते ती सगळ्यांमधे असतेचा असं नाही. कुलकर्णी चौकातला देशपांडे चित्रपटातली मधली जया बघताना आपल्याला आसपासची अनेक माणसं आठवत रहातात. घटस्फ़ोट ही गोष्ट आजही आपल्याकडे तोंडावर हात ठेवूनच बोलतात. नवरा मारझोड करतो, सासरचा छळ, विवाहबाह्य संबंध वगैरे कारणं असतील तर घटस्फ़ोटही ग्राह्य धरला जातो पण माझा नवरा महत्वाकांशीच नाही, त्याला आयुष्य भरभरून जगण्यात रसच नाही म्हणून मला घटस्फ़ोट हवा असं जेव्हा जया जाहिर करते तेव्हा तिची आई सुद्धा तिला समाजून घ्यायला कमी पडते. संसारात तडजोडी कराव्याच लागतात बाईला..हे वाक्य जे जयासारख्या मुलींना सतत ऐकावं लागतं. पण अशा मुली म्हणजे एक वेगळं रसायन असतात. ते जे वेड असतं त्यांच्यात ते त्यांना एका दगडावरून उडी मारायला शिकवतं जेव्हा की त्यांच्या समोर त्या क्षणी असा एकही दुसरा दगड नसतो ज्यावर त्या जाऊन उभ्या राहू शकतील. हवेत झोकून देत त्या फक्त सावरायलाच शिकत नाहित तर एक अख्खं साम्राज्य ऊभं करायला शिकतात जिथे त्या त्यांच्या आयुष्याच्या, स्वप्नांच्या सम्राज्ञी असतात.

घटस्फोटासारख्या एका अत्यंत शुल्लक पण आपल्या समाजाने ज्याचा ब्रह्मराक्षस करून ठेवला आहे अशा गोष्टितनं पार जाताना बायकांची आणि त्यांच्या मुलांच्या मनांची जी आंदोलनं होत असतात ती कुणालाही समजू शकत नाहित. परिपूर्ण होण्यासाठी स्वतःच्या स्वप्नांना जिवंत करता आलं पाहिजे. आणि कुलकर्णी चौकातला देशपांडे मधली जया हेच परत परत सांगते. तिला हे कळतं की तिच्याकडे असलेली उत्तम बुद्धिमत्ता, उत्तम मन, उत्तम शरीर या सगळ्याचे लाड करायला हवेत..आणि तिथंच तिचा संघर्ष सुरू होतो.

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित आणि सई ताम्हणकर यांची मुख्य भुमिका असलेला "कुलकर्णी चौकातला देशपांडे" हा मराठी चित्रपट उत्तम भट्टी जमलेला भावनाप्रधान, समस्येची उकल करून दाखवणारा, उत्तम चित्रीकरण असलेला आणि लडाखचं सौदर्य खुलऊन दाखवणारा एक उत्तम चित्रपट पहाच.        


09 November, 2019

तेजाची आरती





गीत रामायण हा मराठी गीत, गायन आणि सादरीकरणाचा मुकूटमणी. गीत रामायण हे एप्रिल १९५५ ते एप्रिल १९५६ या कालावधीत ग. दि. माडगूळकर यांनी वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊन रचलेलं, सुधीर फडके यांनी संगीत दिलेलं आणि गायीलेलं महाकाव्य आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झालं होतं. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या 'गीतरामायणा'स भरीव लोकप्रतिसाद मिळाला होता.

अनघा मोडक
या वर्षी आकाशवाणीने ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्या दोघांच्याही कारकिर्दीवर आधारित मालिका २५ जुलै २०१९ पासून प्रत्येक गुरूवारी सकाळी प्रसारीत केली होती. १३ भागातली ही मालिका श्रोत्यांना आनंदाचा खजिनाच रिता करून गेली आहे. अतिशय तरल, भावमय आणि ओजस्वी वाणी असलेल्या अनघा मोडक यांनी त्या मालिकेचं लेखन आणि निवेदन केलं आहे. आकाशवाणीच्या सुजाता परांजपे (क्रेंद संचालक) आणि नेहा खरे (कार्यक्रम अधिकारी) यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या मालिकेला चेतना झांजे यानी निर्मिती सहाय्य केलं आहे.       

गदिमा आणि बाबूजी या दोन महान व्यक्तीमत्वांच्या एकुणच जीवनाचा आणि कारकिर्दीचा अतीशय रंजक असा अभ्यासपूर्ण आढावा या तेरा भागात घेतला गेला आहे. अनेक रंजक किस्से, डोळ्यात पाणी आणणारे प्रसंग आणि उद्बोधक माहिती या प्रसारणातून मिळाली. हे तेरा भाग प्रसारित झाल्यानंतर गेल्या गुरूवारी या चमूने श्रोत्यांशी संवाद साधण्याचाही कार्यक्रम प्रसारीत केला तेव्हा त्याला जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला, श्रोत्यांनी आपले सद्गदीत करणारे अभिप्राय दिले. गदिमा आणि बाबूजींच्या जीवन कार्याचा अभ्यास करून तो अल्प वेळात सादर करण्याचं शिवधनुष्य या कार्यक्रमाच्या लेखिका आणि निवेदिका अनघा मोडक यांनी लिलया पेललं आहे. 

नेहा खरे

लहानपणापासून दर्जेदार कार्यक्रम देणार्‍या आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत आलोय. माहिती आणि मनोरंजना बरोबर विश्वासार्हता हे आकाशवाणीचं वैशिष्ट्य. बदलत्या युगात नवनव्या प्रसिध्दी माध्यमात मध्यंतरी आकाशवाणी काहिशी झाकोळून गेली होती. पण एफएम वाहिन्या आणि मुख्य म्हणजे मोबाईल अ‍ॅप (NewsOnAir)  या नव्या तंत्रज्ञानाचा वापर आकाशवाणीने सुरू केला आणि जगभरात पसरलेल्या आकाशवाणीच्या श्रोत्यांना पुन्हा एकदा जुने दिवस, जुनी गोडी आपल्या मुठीत आल्याचा आनंद झाला. मोबाईल अ‍ॅपमुळे तर कुठेही असलं तरी कार्यक्रम ऐकता येतात किंवा महत्वाच्या बातम्या कधीही ऐकता, पहाता, वाचता येतात.                   

हे भाग ऐकताना ते पुन्हा पुन्हा ऐकावे असं वाटत होतं, नेहा खरे आणि त्यांच्या चमूने ही बाब लक्षात घेऊन पहिले दोन भाग YouTube वर कधीही ऐकण्यासाठी उपलब्ध  करून दिले आहेत (पुढचे भागही लवकरच उपलब्ध होतील अशी आशा आहे)रसिकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. एवढा सुश्राव्य कार्यक्रम सादर केल्याबद्दल आकाशवाणीचे धन्यवाद.   




02 May, 2019

अखिल ऑस्ट्रेलिया मराठी सम्मेलन २०१९



ऑस्ट्रेलियामधील सिडनी इथे १९ ते २१ एप्रिल २०१९ हे तीन दिवस अखिल ऑस्ट्रेलिया मराठी सम्मेलन २०१९ साजरं झालं. संपूर्ण ऑस्ट्रेलिया खंडातल्या एक हजारावर मराठी रसिकांनी यात भाग घेतला होता. यात ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड येथील मराठी बांधव तर होतेच पण ज्या महाराष्ट्रातून ही मंडळी हजारो मैलांवर जाऊन स्थाईक झाली त्या महाराष्ट्रामधून, मुंबईमधून अनेक मान्यवर या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर विचारवंत डॉ. रघुनाथ माशेलकर, तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते अच्युत गोडबोले, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू, ईशा टुर्सचे संचालक आणि या कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक श्री. आत्माराम परब, चितळे बंधू मिठाईवालेचे श्री.केदार चितळे या मान्यवरांबरोबरच 'आम्ही आणि आमचे बाप'चे निर्माता मयूर रानडे, अभिनेता अतुल पारचुरे, आनंद इंगळे, पुष्कर स्त्रोत्री, अजित परब, 'लडाख.. प्रवास अजून सुरु आहे' चे लेखक नरेंद्र प्रभू, गायक कलाकार अनिरुद्ध जोशी, विश्वजीत बोरवणकर, शरयू दाते आणि प्रसन्नजीत कोसंबी सिडनीमध्ये दाखल झाले होते.

१९ एप्रिल २०१९ रोजी दुपारी ठिक दोन वाजता दिप प्रज्वलन करून या रंगारंग सोहळ्याला टाळ्यांच्या गजरात सुरूवात झाली. त्यानंतर आत्माराम परब यांच्या पहिल्या मुंबई-लडाख-मुंबई अशा मोटरसायकलवच्या प्रवासाची चित्तथरारक कथा असलेल्या ग्रंथाली प्रकाशनाच्या 'लडाख.. प्रवास अजून सुरु आहे' या वाचकप्रिय पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचं प्रकाशन जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झालं. त्यानंतर लगेचच डॉ. रघुनाथ माशेलकर यांची प्रेरणादायी मुलाखत झाली. गिरगावतल्या गरिबांच्या शाळेत डॉ. माशेलकर यांचं शिक्षण झालं, पण त्याचे शिक्षक विचारांनी श्रीमंत होते. हळद आणि बासमतीचं पेटंट, रिलायंस Jio ची भरारी, Making impossible  possible, आयुष्यातल्या प्रयोगशाळेतलं ज्ञान, जुन्या नव्याचा संगम अशा अनेक विषयांना त्यानी आपल्या मुलाखतीत स्पर्श केला. संपूच नये असं वाटणारी ही मुलाखत जेव्हा संपली तेव्हा संपूर्ण स्त्रोतृवर्गाने उभं राहून टाळ्यांच्या प्रचंड गजरात डॉ. माशेलकरांना मनावंदना दिली.

भारलेल्या या वातावरणतच संमेलनात "आम्ही आणि आमचे बाप" या नाटकाचा प्रयोग साजरा झाला. महाराष्ट्राची दोन लाडकी व्यक्तिमत्व प्रल्हाद केशव अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांच्या अष्टपैलू जीवाप्रवासावर आणि कलाजीवनावर आधारित हा अफलातून प्रयोग फारच रंगला आणि सर्वच कलाकारांनी वाहवा मिळवली.  महाराष्ट्राचं, मराठी मातीचं हे गतवैभव न्याहाळताना आपल्या मातीपासून दूर देशात स्थाईक झालेला नाट्यागारातील प्रत्येक मराठी रसिक आपापल्या स्मृतीरंजनात न्हाऊन निघाला होता. आचार्य अत्रे आणि पुल यांच्या कलागुणांचा हा गोफ म्हणजे एक अफलातून कलाकृती आहे. मयुर रानडे निर्माता असलेल्या या नाटकाचे तरुण दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी अत्रे आणि पु.ल. या दोन्ही महान कलाकारांना थोडक्या वेळात प्रभावीपणे रंगमंचावर सादर केलं आहे.

दुसर्‍या दिवशी प्रचिती लिमये दिग्दर्शित महाराष्ट्राची गोष्ट’, वैजयंती मोने दिग्दर्शितनाटक मेरी जान’, योगेश पोफळे दिग्दर्शितप्रतिक्षा आणि फ्लाईंग क्विन’, शलाका माळगावकर दिग्दर्शितरुजवा असे मनोरंजनाचे  रंगारंग कार्यक्रम सिडनीमधल्या मराठी कलाकारांनी सादर केले. शलाका माळगावकर यांनी सादर केलेला रुजवा हा नाट्य-नृत्य-गायनाचा-वादनाचा कार्यक्रम सगळ्यांच्याच दीर्घ स्मरणात राहील असा होता. आपल्या माती, संकृती आणि माणसांपासून हजारो मैलावर येऊन स्थाईक झालेल्या अखिल ऑस्ट्रेलियातील मराठी मनाची होणारी घालमेल आणि त्यावर दिलासा देणारी फुंकर या सादरीकरणाने घातली तेव्हा नाट्यगृह सद्गदीत झालं होतं. सिडनीमधल्या हौशी कलाकारांनी सादर केलेला हा कार्यक्रम व्यावसायीक कलाकारांच्या तोडीचा होता हे नक्की. दरम्यान चितळे बंधू मिठाईवालेचे श्री. केदार चितळे यांची मुलाखत इवलेसे रोप लावीयले व्दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी या काव्य पंगतींची आठवण करून देणारी होती. मुळ सांगलीकर असलेले चितळे पुण्यात येऊन स्थाईक झाले आणि आजच्या उंचीला पोचले त्याची खुसखुशीत कहाणी खुद्द केदार चितळे यांच्या तोडून ऐकण्यात वेगळीच मजा होती.

तिसर्‍या दिवशी प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू आणि किमयागार अच्युत गोडबोले यांच्या मुलाखतींनी कार्यक्रमाची सुरूवात झाली. डॉ. मीना प्रभूंच्या भ्रमंतीची कहाणी आणि अच्युत गोडबोले यांचा जीवनाचा प्रवास यांचं कथन प्रेरणादायी होतं. अच्युत गोडबोले यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व, त्यांच्या शिक्षण, संगणक आणि लेखनाचा प्रवास स्त्रोत्यांना जीवनाकडे पहाण्याचा सखोल दृष्टीकोन देऊन गेला. एक माणूस अर्थशास्त्र, संगीत, जीवनगाथा, संगणक, विज्ञान, कलाकौशल्य, गणित, समिक्षा, वैचारिक, मानसशास्त्र, आत्मकथन         अशा विविध विषयातील तज्ज्ञ असू शकतो याचं कौतूक तर होतंच पण त्यांना जवळून ऐकता पाहाता आलं म्हणून रसिक धन्य पावले होते. त्यानंतर भांडा सौख्य भरे ही प्रांजली पळनिटकर दिग्दर्शित नाटीका आणि मनोरंजनाचे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी रंग स्वरांचे हा लोकप्रिय मराठी गीतांचा कार्यक्रम गायक कलाकार अनिरुद्ध जोशी, विश्वजीत बोरवणकर, शरयू दाते, प्रसन्नजीत कोसंबी आणि निहीरा जोशी-देशपांडे या भारतातून आलेल्या गायक कलाकारांनी सादर केला. संपूर्ण नाट्यगृहाने त्यांच्याबरोबर ताल धरला होता. लोकप्रिय गाण्यांवर थिरकताना सगळेच रसिक संमेलनाच्या रंगात न्हाऊन निघाले होते.

आपली मराठी माती, माणसं, भारत देश एवढंच नव्हे तर आशियाखंडही सोडून दूर खंडप्राय ऑस्ट्रेलियात स्थायीक झालेली सिडनी, मेलबर्न, कैर्न, गोल्डकोस्ट आदी ठिकाणची मराठी माणसं या तिन दिवसात मनानेही एकत्र नांदताना दिसली. आपली मराठी संकृती जपताना आणि ती ऑस्ट्रेलियातही वाढवताना दिसली. संमेलनातला उत्साह तर एखाद्या लग्न सोहळ्याला लाजवणारा होता. २०२२ साली मेलबर्न इथे होणार्‍या संमेलनात नक्की भेटायचं असं एकमेकांना सांगत हस्तांदोलनं झाली, निरोपाचे हात हलले आणि दूर देशातही मराठी संकृती जिवंत आहे याचा सार्थ अभिमान वाटला.                             
 
  
                 

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates