खंडप्राय भारत देश एकसंघ राहावा अशी प्रत्येक देशप्रेमीची इच्छा असतेच. सरकारी पातळीवर अनेक धोरणे आखली जातात, पण ती बहुतेक वेळा कागदावरच राहातात. काही समाज धुरीण मात्र हा वसा घेतात आणि जन्मभर त्या साठी झटत असतात. शंकर दिनकर उर्फ भय्याजी काणे हे त्या पैकी एक. आत्यंतीक देशप्रेमाने प्रेरीत होऊन भय्याजीनी आपली मुख्याध्यापकाची नोकरी सोडून थेट म्यानमारच्या (ब्रम्हदेश) सिमेलत असलेले मणिपूर हे राज्य गाठले आणि तेथील जनता मुख्यप्रवाहात यावी यासाठी आपले पुर्ण आयुष्य वेचले. त्यांचे शिष्योत्तम जयवंत कोंडवीलकर यानी हा वसा खांद्यावर घेऊन भय्याजींचं कार्य आजही पुढे चालू ठेवलं आहे.
वर लिहिलेल्या चार ओळीत या गुरू-शिष्याच्या कार्याचा आवाका लक्षात येणार नाही. मणिपूर सारख्या राज्यात आजही सामान्य भारतीय पाय ठेवायला कचरतात त्या ठिकाणी चाळीस वर्षांपूर्वी वास्तव्य करून या गुरू-शिष्याने तेथील लोकांना आपलेसे केले. मणिपूरच्या खारासोम, जिल्हा उखुल येथे शाळा स्थापन केली. (सहा वर्षा पुर्वी असम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये फिरताना त्या प्रदेशाची दुर्गमता माझ्या लक्षात आली होती.) तसच ईशान्येतील विद्यार्थ्यांची सोय व्हावी आणि त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणता यावं म्हणून महाराष्ट्रात चौदा वसतीगृहे सुरू केली.
पुरुषोत्तम रानडे (संपादक ईशान्य वार्ता) |
भय्याजी काणे आणि जयवंत कोंडवीलकर या गुरू-शिष्याच्या कार्याने भारावून गेलेल्या एका पुरुषोत्तमाची नुकतीच भेट घडली. या वल्लीने या कार्याला वाहून घेण्यासाठी आपली महानगर टेलीफोन निगम मधली नोकरी सोडली. पुरुषोत्तम रानडे ‘ईशान्य वार्ता’ हे मासिक या कार्याची माहिती व्हावी आणि लोक जोडले जावेत म्हणून संपादीत करतात. (या विषयीचा लेख या ब्लॉगवरून लवकरच प्रसिद्ध केला जाईल.) माझे परम मित्र आत्माराम परब यांच्यामुळे रानडे साहेबांची भेट झाली. इशा टुर्सच्या माध्यमातून आत्माराम परब ‘पुर्वांचल’ (ईशान्य भारत), लडाख, अंदमान सारख्या दूरवरच्या आणि पर्यटकांपासून वंचीत असलेल्या क्षेत्रात सहली आयोजित करतात. ‘गोठलेलं लडाख’ या त्यांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने गेलो असता आत्मारामनी रानडे यांची भेट घडवून आणली.
देशप्रेमासाठी नोकरीला तिलांजली देणारा रानडें सारखा पुरुषोत्तम विरळाच. (अर्थात सौ. रानडे वहिनींना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत.) त्या दिवशी झालेल्या तोंड ओळखीत जी माहिती झाली ती आपणा समोर मांडली. त्यांच्या कार्याची माहिती होत जाईल तशी माडण्याचा प्रयत्न करीन. तुर्तास एवढेच.
श्री. पुरुषोत्तम रानडे यांच्याशी आपण friendsofne@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधू शकता.
श्री. पुरुषोत्तम रानडे यांच्याशी आपण friendsofne@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधू शकता.
No comments:
Post a Comment