18 February, 2010

काळ्यापाण्याची शताब्दी


ब्रिटिश सरकार ज्यांना खर्‍या अर्थाने घाबरत होतं, इंग्रजांवर ज्यांचा वचक होता अशा भारतमातेच्या सुपूत्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाव अग्रणी होतं. लोकमान्यानी जो वन्ही पेटवला होता त्यात अनेक ब्रिटिश नराधम अधिकारी मारले जात होते, त्याच बरोवर चाफेकर बंधूंसारख्या वीरात्म्यांचीही आहूती दिली जात होती. या देशाने मोगलांचा जुलूम सहन केला होता, पण त्या मोगलांना सळो की पळो करून सोडणार्‍या छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारा हा महाराष्ट्र परकीयांचं जोखड मानेवर घ्यायला कदापी तयार नव्हता. ‘शिवाजी’ या तीन अक्षरात अशी काही जादू होती की तो शब्द उच्चारताच तमाम महाराष्ट्राला नवसंजीवनी प्राप्त होत होती. मराठ्याच्या नसानसा मधूनच नव्हे तर कृष्णा, गोदावरी सारख्या नद्यांमधूनही विद्युल्लता प्रवाहीत होत असे. केसरी मधून लिहीलेल्या अग्रलेखांमधून, लोकमान्य टिळकांच्या भाषणांमधून संदेश घेवून उभा महाराष्ट्र जसा पेटून उठत होता, तसा फासावर जाणार्‍या हुतात्म्यांची जागा घ्यायला नवीन योद्धा पुढे येत होता. चाफेकर बंधूंना फासावर लटकवले हे ऎकून केवळ सोळा वर्षे वयाचा विनायक दामोदर सावरकर हा तरूण देवघरात कुलदेवता दुर्गेसमोर जावून उभा ठाकला. आणि ती कठोर प्रतिज्ञा केली मी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मारीता मारीता मरेतो झुंजेन, ब्रिटिशांना माझ्या मातृभूमीमधून हुसकावून लावीन आणि देशाला श्रेष्ठत्व प्राप्त करून देईन.काय योगायोग आहे पहा, बाल शिवाजीने रोहीडेश्वरी घेतलेली स्वराज्याची शपथ आणि सावरकरांनी भुगूर या आपल्या गावी घेतलेली शपथ यात विलक्षण साम्य होतं. स्वातंत्र्याची उर्मी तीच, देशाबद्द्लची प्रिती तीच, परकीयांबद्द्लचा त्वेश तोच आणि मनगटातला जोशही तोच.

सावरकरांचे वडील आणि चुलते प्लेगला बळी पडले. सावरकर बंधू पोरके झाले. पण या घरच्या दुःखात बुडून न रहाता सावरकर सतत देशाचाच विचार करत होते. क्रांतिची स्वप्ने पहात होते. सन १९०४ मध्ये त्यानी ‘अभिनव भारत संघटना’ ही संस्था स्थापन केली. टिळकांचा स्वदेशीचा आग्रह सावरकरांना मनोमन पटला होता. लोकमान्यानी स्वदेशीचा आग्रह धरला होता त्याच वेळी सावरकरानी विदेशी मालावर बहीष्कार घालण्याचं आवाहन केलं. पुण्यात विदेशी कपड्यांची होळी करण्याचा त्यांनी घाट घातला. लोकमांन्यानी त्याला सहमती दर्शवली. एक गाडीभरून विलायती कपडे जमा केले गेले आणि मिरवणूकीने ते आणून त्यांची होळी करण्यात आली. ही नुसती संपत्तीची नासाडी नसून या होळीने क्रांतिचा वणवा पेटेल असा विचार त्यामागे होता. विदेशी कपड्यांच्या होळीच्या साक्षीने जाळजळीत विचार मांडणारी भाषणं केली गेली. या क्रांतिकारक घटनेचं नेतृत्व सावरकरानी केलं. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असतानाच सावरकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली होती. महाविद्यालयाकडून सावरकरांना दहा रुपये दंड आणि वसतीगृहातून काढून टाकणे या शिक्षा करण्यात आल्या पण असल्या शिक्षेला सावरकर थोडेच भिक घालणार होते. त्यांचे शिक्षण आणि क्रांतिकार्य जोमाने सुरू होते. फर्ग्युसन महाविद्यालयाचा निषेध म्हणून टिळकांनी ‘हे आमचे गुरूच नव्हत’ या मथळ्याचा लेख लिहीला. १९०५ साली सावरकरानी बी.ए. परिक्षा उत्तीर्ण केली, कायद्याचा अभ्यासही सुरू होता. पण हे करत असताना सावरकर पुण्या-मुंबईच्या विद्यार्थ्यात स्वातंत्र्यासाठीचे क्रांतिकारक विचार पेरत होते.

आता सावरकरांना देशविदेशीचे क्रांतिकारक, त्याचे कार्यपद्धती, हिंदूस्थानच्या स्वातंत्र्यासाठी त्याचा वापर या गोष्टींची आवश्यकता भासू लागली. लंडनच्या इंडीया हाऊसचे पं. शामजी कृष्णवर्मा यांच्याकडे ‘शिवाजी’ शिष्यवृत्तीसाठी त्यानी प्रयत्न सुरू केले. लो. टिळक आणि शिवरामपंत परांजपे यांनी दिलेली शिफारस पत्रे अर्जासोबत जोडलेली होती. सावरकरंना शिष्यवृत्ती मिळाली. पं. शामजी कृष्णवर्मा यांनी सावरकराना एक करार करायला सांगितले. ब्रिटिशांची नोकरी करणार नाही सावरकरांची उद्दिष्ट्ये वेगळीच होती. देशासाठीच्या कामगिरीसाठी सावरकर विदेशी रवाना होण्याच्या तयारीला लागले. ९ जुन १९०६ रोजी हा क्रांतिकारकांचा मुकुटमणी पुर्णिमा या बेटीवर चढला तेव्हा एकच स्वप्न, एकच ध्यास होता ‘स्वातंत्र्य’. प्रवासात मनातल्या मनात आखणी चाललेली, ब्रिटनमध्ये जावून क्रांतिकारकांची संघटना बांधावी. बुद्धिमान भारतीय विद्यार्थी जे इंग्लंडला आय्.सी.एस्., बॅरिस्टर व्हायला गेलेत त्यांच्या मनात क्रांतिचे विचार भरवावेत. स्वातंत्र्याचा लढा खुद्द इंग्रजांच्या भूमीतच उभारावा. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लंडनला पोहचल्या नंतर सावरकरानी लगेचच आपल्या क्रांतिकार्याला सुरूवात केली. लंडन मध्ये ‘स्वतंत्र भारत समाज’ या संस्थेची स्थापना केली.

इंग्लंड मध्ये त्या वेळी असलेले भारतीय विद्यार्थी हे वर्णाने आणि रक्ताने भारतीय असले तरी त्यांच्या आवडीनिवडी, मते, नितीच्या कल्पना या पुर्णपणे विलायती होत्या. सावरकराना त्या मधूनच भारतीय आशा आकांक्षांचे समर्थन करणारा गट तयार करायचा होता. सावरकरांच्या क्रांतिकार्याची व्याप्ती जसजशी वाढत गेली तसतशी इंग्रजी लोक आणि वृत्तपत्रे याना ती खुपू लागली. सावरकरांच्या प्रभावाखाली सेनापती बापटांसारखे युवक एकत्र जमू लागले. सशस्त्र क्रांतिचे सावरकरांचे विचार सर्वानाच भारून टाकत होते. सेनापती बापटांनी ‘होमरूल’ची मागणी करणारी पुस्तिका प्रसिद्ध केली. त्याची शिक्षा म्हणून मुंबई विद्यापिठाने त्यांची शिष्यवृत्ती बंद केली. पण क्रांतियज्ञात उडी घेतलेल्या सेनापती बापटांना त्याची पर्वा नव्हती. पॅरिस मध्ये जावून बॉम्ब बनवण्याचे तंत्र त्यानी शिकून घेतले.

इटलीचा क्रांतिकारक योद्धा मॅझिनीने सावरकराना मोहिनी घातली होती. त्याच्या कार्याची माहिती आपल्या देशबाधवांना मिळाली तर हिंदूस्थानचा तरूण पेटून उठेल या प्रेरणेतून सावरकरांनी मॅझिनीचं चरित्रा लिहीलं आणि गुप्त पणे भारतात पाठवून दिलं. सावरकरांचे जेष्ठ बंधू बाबाराव सावरकर यांनी ते पुण्यातून प्रसिद्ध केलं. ब्रिटिशाना आता सावरकरांच्या प्रत्येक कृतीची भीतीच वाटत होती. सरकारने तो ग्रंथ जप्त केला आणि त्यावर बंदी घातली. तिकडे १८५७ च्या बंडाला ५० वर्षे झाली म्हणून ब्रिटनमध्ये ब्रिटिशांनी ‘विजयाचा अर्धशताब्दी समारंभ’ साजरा केला. सावरकर आणि त्यांच्या मित्रानी ब्रिटनमध्येच भारतीय शुरवीरांच्या स्मृतीनिमित्ताने रौप्यमहोत्सवी समारंभ साजरा केला. आणि १८५७ साली झालेलं ते बंड नसून स्वातंत्र्यसंग्राम होता आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे हे वीराग्रणी होते. तो लढा आपणाला पुर्ण करायचा आहे. भारताला स्वातंत्र्या मिळेपर्यंत झुजायचे आहे असा संदेश दिला. १८५७ च्या क्रांतिचा इतिहास तमाम भारतीयांना कळावा म्हणून ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ लिहीला. शांततामय प्रतिकारामागे जर लष्करी सामर्थ्य नसेल तर अखेर त्याचा पराजयच होतो, असा सावरकरांचा विचार होता. ब्रिटीशाना जर भारतातून हाकलून लावायचे असेल तर सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नाही हा विचार रुजवण्यासाठी अभिनव भारत संघटनेचे परदेशात प्रचार कार्य जोमाने सुरू होते. जर्मनीत स्टटगार्ड येथे आंतरराष्ट्रीय सोशालिस्ट कॉग्रेसमध्ये मॅडम कामांनी हिंदूस्थान चा राष्ट्रध्वज फडकावला. इकडे भारतात स्वदेशीचा पुरस्कार, परदेशीचा बहिष्कार आणि परकीय सत्तेचा तिरस्कार ही त्रिसुत्री बनली होती.

क्रांतिकारकांचा आणि राष्ट्रवादाचा ब्रिटिश सरकारने धसका घेतला होता. अभिनव भारत संघटनेच्या क्रांतिकारकांनी रशिया, आयर्लंड, इजिप्त आणि चीन या देशांमधल्या क्रांतिकारकांशी संबंध प्रस्थापित केले होते. त्याच वेळी सावरकरांचे प्रभावी लिखाण भारतातील क्रांतिकारकांच्या मनातील अग्नी भडकवत होतं. ब्रिटिश सरकारचं सावरकरांवर बारीक लक्ष होतच. ब्रिटिशांच दमन सत्र सुरू झालं होतं. २३ जुलै १९०८ रोजी लोकमान्य टिळकाना काळ्यापाण्याची शिक्षा झाली आणि त्यांची मंडालेला रवानगी करण्यात आली. सावरकरांच्या विचारांनी प्रेरीत झालेले मदनलाल धिंग्रासारखे तरूण हौतात्म्याला सिद्ध झाले होते. खुद्द इंग्लंडमध्ये मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीवर गोळ्या झाडल्या आणि त्याला निजधमाला धाडले. मदनलाल धिंग्रांचा निषेध करण्यासाठी इंग्लंड मधल्या नेमस्तांची एक सभा भरली होती. ‘ही सभा मदनलाल धिंग्राचा एकमताने निषेध करते’ असा ठराव येताच नाही एकमताने नाही असा आवाज सभेनधूनच घुमला. सगळे जण इकडे तिकडे पाहू लागले. हा मी इथे उभा आहे, असं सांगत त्या तरूणाने माझं नाव सावरकर असं म्हणताच उपस्थितांचा थरकाप उडाला. सगळे गर्भगळीत झाले. एका संतप्त युरेशीयन इसमाने सावरकरांच्या कपाळावर फटका मारला. सावरकरांचा चेहरा रक्ताने लाल झाला. तरी ते म्हणाले इतके झाले तरी मी त्या प्रस्तावाच्या विरूद्धच आहे. सावरकरांच्या शेजारी उभ्या असलेल्या सावरकरांच्या मित्राने तिरूमलाचार्याने सावरकरांवर हल्ला करणार्‍या त्या पामर नावाच्या इसमाच्या डोक्यावर प्रहार केला आणि त्याला क्षणार्धात खाली लोळवला. अय्यर नावाचा दुसरा मित्र त्याच्यावर गोळी झाडण्याच्या तयारीत होता, त्याला सावरकरांनी ‘नको’ म्हणून नजरेनेच खुणावलं. सभेची पांगापांग झाली. मदनलाल धिंग्रांवर खटला चालवला गेला आणि अपेक्षे प्रमाणे त्यांना देहांताची शिक्षा झाली. मदनलाल धिंग्रा हसत हसत फासावर गेले.

या सगळ्या घटनांचा उगम सावरकर हेच आहेत अशी वृत्तपत्रानी झोड उठवली. भारतातील त्यांच्या आप्तेष्टांचा छळ सुरू झाला. कर्झन वायली प्रकरणानंतर भारत निवासाला (India House) टाळे ठोकण्यात आले. सावरकरांच्या डोक्यावरचं लंडनमधलं छप्परही हिरावलं गेलं. सततच्या धावपळीने आणि त्रासाने सावरकरांची प्रकृती बिघडली. रहायला घर नाही, खायला अन्न नाही, बोलायला मित्र नाही अशी अवस्था झालेले सावरकर आपल्या एका मित्रा सोबत ब्रायटन या गावात रहायला गेले. मातृभूमीच्या विरहाने भावनाविवश होवून तिथल्या सागर किनारी सावरकरांच्या तोंडून ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ हे अप्रतिम विरहगीत बाहेर पडलं.

अभिनव भारत संघटनेच्या ग्वाल्हेर सातारा इत्यादी ठिकाणी शाखा सुरू झाल्या होत्या. बॉम्ब तयार करण्याचे कारखाने आणि साहित्य यांचे साठे महाराष्ट्रात हुडकून काढण्यात आले. तशातच सावरकरांचे जेष्ठ बंधू बाबाराव सावरकर यांनी कवी गोविंदांच्या क्रांतिकारी कविता छापल्या म्हणून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती ती आता कायम करण्यात आली. क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनचा गोळ्या झाडून वध केला. त्या पाठोपाठ सावरकरांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकरांना अटक झाली. आपल्या भावाच्या अटकेची बातमी सावरकराना समजली. आता ब्रिटिशांचा रोख सावरकरांकडेच होता हे ओळखून सावरकरांच्या मित्रांनी त्याना लंडन सोडण्याचा सल्ला दिला. काही काळासाठी सावरकर पॅरीसला निघून गेले. मॅडम कामांच्या घरी ते राहू लागले.

जॅक्सन खुन प्रकरणात अभिनव भारत संघटनेचा हात स्पष्ट झाला होता. सावरकरांनी पाठवलेल्या ब्राउनिंग पिस्तूलांपैकीच एकाने जॅक्सनला निजधामाला पाठवले होते. सावरकरांवर अभियोगाची तयारी झाली. पॅरीसला असलेले सावरकर इंग्लंडला जायला निघाले. आपण इंग्लंडला गेलात तर आपणाला अटक झाल्याशिवाय रहाणार नाही, आपण नेतृत्व करण्यासाठी आम्हाला हवे अहात असे सांगूनही सावरकर थांबले नाहीत. माझ्य सहकार्‍यांचा आणि अनुयायांचा छ्ळ मला पाहवणार नाही, ओढवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी नेता म्हणून मला सामोरे गेलेच पाहीजे म्हणून सावरकर लंडनला परतले. १३ मार्च १९१० रोजी त्याना लंडनच्या व्हिक्टोरिया स्थानकात अटक झाली. सावरकरांवर अभियोग चालवण्यासाठी त्यांना भारतात नेण्यात यावे असा निकाल लंडन येथील न्यायालयाने दिला.

सावरकरांचे अनुयायी आणि स्वतः सावरकरांना आता ब्रिटिश सरकारच्या हेतू विषयी शंका वाटू लागली. देहांताची शिक्षा देवून सावरकरांचा काटा काढायचा असा इग्रजांचा उद्देश्य असेल तर हाती घेतलेलं क्रांतिकार्य अर्धवट राहील. सावरकर क्रंतिकारकांचे मुकूटमणी होते, नेते होते. एवढ्या सहज ब्रिटीशांची मनिषा पुर्ण होवू द्यायची नाही. औरंगजेबाच्या तावडीतून शिवाजी महाराज जसे आग्र्याहून सुटकाकरून सहीसलामत सुटले होते तसेच आता आपल्याला निसटून गेले पाहीजे हे सवरकरांच्या मनाने पक्के केले. ’मोरिया’ नावाच्या आगबोटीवर सावरकरांना चढवण्यात आलं आणि हे आगबोट ७ जुलै १९१० रोजी फ्रांस मधल्या मार्सेलिस या बंदरात आली. आठ जुलै १९१० च्या पहाटे सावरकरांनी शौचास जायचे आहे म्हणून पहारेकर्‍यास सांगितले. दोन पहारेकरी सोबत असताना सावरकर शौचकुपात शिरले. आतून कडी लावली. बरोबर मुद्दाम आणलेला नाईट गाऊन पारदर्शक दारावर अडकवला. संडासावरच्या वाटोळ्या खिडकीचा त्यानी आधीच अंदाज घेतला होता. क्षणाचाही विलंब न लावता चपळाईने ते त्या पोर्टहोल जवळ पोहोचले. आपली कृश देहयष्टी खिडकिच्या बाहेर काढली आणि ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय’ म्हणत समुद्रात उडी घेतली. त्या खिडकीतून सावरकर अर्धवट बाहेर पडले असतानाच पहारेकर्‍यांची धावपळ उडाली. पळाला, पळालाचा एकच कोलाहल झाला. दार फोडण्याचा प्रयत्न झाला. पण सावरकर निसटले होते. पोहत किनारा गाठण्याचा प्रयत्न करत असताना वरून गोळ्यांचा वर्षाव होत होता. पण सावरकरांनी किनारा गाठला. किनार्‍यावर येताच ते पळत सुटले पण तोपर्यंत शिपाई किनार्‍यावर येऊन पोहोचले होते. सावरकरानी फ्रेंच पोलिसाला आपल्याला जवळच्या पोलिस ठाण्यावर घेऊन चल असा आग्रह धरला, पण तोपर्यंत तिथे आलेल्या ब्रिटिश पहारेकर्‍याने त्याच्या मुठीत नोट कोंबताच त्याने सावरकराना त्याच्या हवाली केले. सावरकराना धक्के देत ओढत पुन्हा बोटीवर आणण्यात आले.

ब्रिटिशानी आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग केला होता. फ्रांसच्या भुमीत ते सावरकराना अटक करू शकत नव्हते. सावरकरांचे मित्र त्या ठिकाणी उशिरा येवून पोहोचले त्यामुळे हा क्रांतिसिंह गजाआड गेला. पण सावरकरांची ती उडी त्रिखंडात गाजली. युरोपातील वृत्तपत्रांनी त्या घटनेला ठळक प्रसिद्धी दिली. सावरकरांवर दोन अभियोग चालवले गेले आणि त्यांना न भुतो न भविष्यती अशा दोन काळ्यापाण्याच्या शिक्षा सुनावण्यात आल्या. पन्नास वषे काळे पाणी, जगाच्या इतिहासातली कठोरतम शिक्षा. या घटनेला आता शंभर वर्ष पुर्ण होणार आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक असाधारण व्यक्तीमत्व अंदमान येथील सेल्यलर कारागृहात बंदीवासात होतं. तो बंदिवास आणि ती उडी संपूर्ण जागातील क्रांतिकारकांना प्रेरणा देणारी ठरली, अजरामर झाली.

1 comment:

  1. वा प्रशांत आपण खुप छान माहिती पुरवलीत. धन्यवाद.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates