आज सकाळी चर्चगेटला उतरलो आणि हुतात्मा चौकाच्या दिशेने चालू लागलो तर एक गृहस्थ शासकीय तंत्रनिकेतनाचा पत्ता विचारू लागले. पत्ता सांगितला. “येतो मी तसा पण आज जरा चुकल्या सारखं वाटलं म्हणून विचारतो” असं म्हणाले. “गावाहून आलोय देवरूखहून. दर महिन्याला पगाराची बिलं घेऊन इकडे यावं लागतं. शिक्षण संचालक पुणे पुण्याहून येतात. त्याना बिलं सादर करायची, मग ते चेक देणार. तो सुद्धा महाराष्ट्र बँकेचा. देवरूखात महाराष्ट्र बँक नाही. अर्धा महिना संपला तरी लोकांना पगार मिळत नाही. कर्मभोग आहेत दुसरं काय...!” त्या गृहस्थांनी आपलं मन मोकळं केलं. मी विचारात पडलो. बघा कॉलेज देवरूखला, तिथला क्लार्क मुंबईला येणार, त्याचा पगार घालायला पुण्याहून शिक्षण संचालक मुंबईला येणार, देवरूखला नसणार्या बँकेचा चेक देणार, तो घेऊन जायचं. वेळाचा, पैशाचा किती हा अपव्यय. जगाच्या कुठल्याही टोकाहून कुठेही एका दिवसात पैसे पाठवता येतात, पण कोकणातल्या कोकणात (मुंबई कोकणातच आहे, राहूल गांधीला वाईट नाही ना वाटणार? ) पाठवण्यासाठी काय हा द्रविडी प्राणायाम?
‘अमेरीका चाललीय चंद्रावरी नी आपण राहीलो डोंगरावरी’ असं एक गाणं अशोक हांडेंच्या आवाजात आहे. पंचवीस तीस वर्षांपुर्वीच्या परिस्थितीवर आधारीत ते गाणं होतं. पण आता आपल्या देशातही प्रगतीचे वारे चांगलेच जोरात आहेत. निदान तसा भास तरी होत आहे. कोअर बँकींग, एटीएम् मुळे पैसे कुठेही जमा करा आणि कुठेही काढा. राज्याचं मुख्यालय जिल्हा तालुक्याच्या ठिकाणांना संगणकानी जोडलं गेलं असं वर्तमान पत्रात वाचायला मिळतं. (वीज नसते, तेव्हा संगणक कसे चालतात विचारू नका) असं असलं तरी आपण अजूनही डोंगरावरच राहीलो. तंत्रज्ञानाचा फायदा सामान्याना कधी होणार?
No comments:
Post a Comment