संपूर्णपणे वाचनीय असे ‘ईशान्य वार्ता’ हे मासिक हाती पडलं आणि अखेरच्या पृष्ठापर्यंत वाचून काढलं. ईशान्य भारता विषयीची उपेक्षेची भावना नाहीशी होवून औत्सुक्य आणि जिज्ञासा जागृत व्हावी हा या मासिक काढण्याबद्दलचा उद्देश साध्य व्हावा असाच हा अंक आहे. या मासिकाचे संपादक पुरुषोत्तम रानडे आणि त्यांच्या चमूने परिश्रम घेवून हा अंक सिद्ध केला आहे. ईशान्य भारतातील जनता देशाच्या प्रमुख प्रवाहात यावी या मुख्य उद्देशाने सुरू असलेल्या उपक्रमाचाच हा एक भाग आहे.
- गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या देशप्रेमाच्या अनेक हृद्य आठवणी ‘संवाद’ या सदरात आहेत.
- मकरंद केतकर यांचा ‘नागालॅंड: आदिमतेकडून आधुनिकतेकडे’ या लेखात तेथील लोक विशेषत: तरूण ‘अतिरेकी फॅशनकडे’ आकृष्ठ होत आहेत आणि ‘हम हम है, बाकी पानी कम है’ अशी मनोवृत्ती बाळगत आहेत हे वाचून मन विषण्ण होतं.
- ‘नातं मैत्री आणि विश्वासाचं” या लेखात अभिनय बोरकर यांनी डोंबिवलीच्या नागालॅंड वसतीगृहातील अलेले अनोखे अनुभव खुमासदार शैलीत मांडले आहेत. विशेषत: नागालॅंड मधील जेवणाच्या सवयीत हळूहळू बदल होत महाराष्ट्रीय जेवण जेवण्याची आवड निर्माण झाली त्याचा आलेख छानपणे मांडला आहे.
- प्रा. चारुचंद्र उपासनी यांचा ‘एका विकतच्या श्राद्धाची पन्नाशी’ हा लेख विशेष उल्लेखनीय असाच आहे. दोन-तीन हजार वर्षांपासून भारत चीन संबंध सौहार्दाचे होते पण ते बिघडून अचानक युद्ध करण्याचा पवित्रा चीन ने का घेतला आणि आपल्याच प्रेमात पडलेल्या नेहरू आणि पार्टीला ते कसे उमजले नाही याचा उत्तम परामर्श या लेखात घेण्यात आला आहे. दलाईलामांना गेली पन्नास वर्षे आंदण दिलेला धरमशाळा सारखा भाग, त्यांचा अनिर्बंध संचार याचा ही योग्य शब्दात समाचार घेण्यात आला आहे. प्रदिर्घ काळ दुसर्या देशात राहून सर्व सुखपभोग घेत तिबेट बद्दल केवळ बोलत राहायचं, पोकळ वल्गना करायच्या हे कसं चूक आहे ते समजून घेण्यासाठी हा लेख मुळातूनच वाचला पाहिजे.
- चाळीस वर्षाहून जास्त काळ पूर्वाचलशी निगडीत राहून कार्य करणार्या अविनाश बिनीवाले यांचा ‘पूर्वाचलातील खाद्यसंकृति’ हा लेख आपल्याला शाकाहारी आणि मांसाहारी या मधला भेदाभेद स्थानपरत्वे कसा बदलत जातो हे सांगतो.
- दुसर्या महायुद्धातील प्रसंग ‘बॅटल ऑफ कोहिमा’ या लेखात सांगितले आहेत. जपानी सैनिकांचं देशप्रेम आणि परस्परांविषयी वाटणारा प्रेमभाव हृदयस्पर्शी असाच आहे.
- ‘पश्चिमेचा देवदूत: कै. भय्याजी काणे’ हा लेख आपणाला अंतरमुख करणार आहे. पेशाने शिक्षक पण वृत्तीने सैनिकीबाणा जपणारे खरे ‘भारतरत्न’ म्हणजे भय्याजी काणे. चाळीस वर्षांपूर्वी ईशान्येची हाक ऎकून त्यानी केलेल्या कार्याला तोड नाही. सरकार कोट्यावधी रुपये ओतूनही जे करू शकत नाही ते भय्याजीनी आंतरीक ओढीने करून दाखवलं आणि त्यांचेच शिष्योत्तम जयवंत कोंडविलकर हे पुढे हा वारसा चालवत आहे.
- स्वर्गिय भूपेन हजारिका यांचं नुकतच निधन झालं. त्यांच्या निधना पूर्वी लिहिलेला ‘भूपेन हजारिका: ईशान्य भारताचे सांकृतिक सम्राट’ हा लेख भूपेनादां विषयी बरच काही सांगून जातो. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले तरी राजकारण्यांची लागण त्यांना झाली नव्हती. आपल्या उच्च शिक्षणाचा आणि संगीत तसेच सिनेमा विषयक ज्ञानाचा उपयोग त्यानी आसामी जनतेसाठी अखेर पर्यंत केला.
वरील अनेक लेखांमधून ईशान्या भारताचं आजचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. हा अंक वाचनिय तर आहेच, पण संपादक पुरुषोत्तम रानडे आणि जयवंत कोंडविलकर हे ज्या आत्मियतेने हे काम करीत आहेत त्याला तोड नाही. प्रसंगी पदरमोड करून समाजासेवेचा हा वसा ते पुढे नेत आहे.
(सदर कार्यासाठी फार मोठ्या प्रमाणात निधिची आकश्यकता आहे तरी इच्छूकांनी कृपया जयवंत कोंडविलकर यांच्याशी 9619720212 किंवा पुरुषोत्तम रानडे 9969038759 या नंबरवर संपर्क साधावा अशी विनंती आहे.)
‘ईशान्य वार्ता’ या मासिक अंकाची वार्षिक वर्गणी फक्त रुपये १५० असून त्यासाठीही वरील नंबरवर किंवा friendsofne@gmail.com या मेल आयडीवर आपण जरूर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment