19 May, 2022

एका व्रताची सांगता

संपादक श्री.पुरुषोत्तम रानडे

एप्रिल २०२२ पासून ईशान्य वार्ताचं प्रकाशन बंद केलं असं वाचलं आणि का कोण जाणे हायसं वाटलं. घरात एकुलता एक माणूस कमावता असताना महानगर टेलिफोन निगमच्या नोकरीला रामराम करून ईशान्येकडच्या जनतेला देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी सिद्ध होणं हिच एक कर्म कठीण घटना होती. १४-१५ वर्षांपुर्वी पुरुषोत्तम रानडेंनी हे शिवधन्युष्य हाती घेतलं आणि एप्रिल २०२२ पर्यंत अव्याहतपणे ईशान्य वार्ताचं संपादन, प्रकाशन, वितरण, लेखन..... (ही यादी कितीही वाढवता येईल) हा माणूस करीत राहिला. ध्येयनिष्ठा आणि अंगचे उत्तम गुण सोडून कसलंच पाठबळ नसतना राष्ट्रधर्मासाठी सतत कार्यरत राहिलेल्या या उत्तम पुरूषाची तळमळ मी जवळून पहात होतो. एखादं मासिक वेळच्यावेळी प्रकाशित करणं या मागे किती व्याप असतात हे त्यात काम केल्याशिवाय कळणार नाही. बरं महाराष्ट्रापासून हजारोमैल दूर असलेल्या ईशान्य भारतातील सात राज्यांचा लेखाजोखा आणि वार्तांकन एवढाच या मागचा उद्देश्य नव्हता तर तिथलं समाजमन मुख्यभूमीशी जोडलं गेलं पाहिजे अशी तळमळ होती आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची तयारी रानडे सतत करीत होते.

करोनाचा भयाण काळ आला आणि सगळ्यांच्याच जगण्याला संघर्षाची धार आली आणि कदाचीत त्यातच ईशान्य वार्ताचं प्रकाशन बंद करण्याचा समयोचीत निर्णय घ्यावा लागला. शिवाय आत्ताच्या आधुनिक प्रसारमाध्यमाच्या युगात प्रिंट मिडीया मागे पडत आहेच. कुठलीही बातमी सांगितली तरी नवीन काहीतरी सांगा असा समोरच्याचा भाव असतो. ते नव्या स्वरुपात येईलही, तुर्तास छपाई बंद आहे.

मासिक छापण्याच्या ताणातून संपादक श्री.पुरुषोत्तम रानडे सध्यातरी मोकळे झाले आहेत. अपवाद सोडता सगळीच प्रसार माध्यमं नकारात्मक घटनांचा रतीब घालत असल्याने येवढं सगळंवाईट घडत असताना, हे जग चालतं तरी कसं? असा प्रश्न पडतो, तेव्हा रानडेंसारखे अनेकजण सकारात्मक कामं निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे करीत असतात म्हणून; असं त्याचं उत्तर मिळतं.  गेलं एक तप हा यज्ञ चालू होता. एवढा काळ एखादं काम सातत्याने करीत रहाणं यालाच व्रत म्हणतात, रानडेंनी या एका व्रताची नुकतीच सांगता केली म्हणायचं.  

नरेंद्र प्रभू

या विषयी आणखी वाचा:

भारत जोडो

समर्पीत पत्रकार, संपादक : पुरुषोत्तम रानडे

ईशान्य वार्ता

ईशान्य वार्ताचं दमदार पुनरागमन

मिशन मणिपूर - एकांडय़ा देशभक्ताची वीरगाथा

राष्ट्रप्रेम शिकवावं का लागतं?

 


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates