सदाफुलीचं फुलझाड मला नेहमीच आवडत आलंय. एखाद्या हसतमुख माणसासारखी सदाफुली रोजच फुलत असते. दोन रंगांची ही फुलं लहानपणापासून पहाता आली तरी आता अनेक रंगी सदाफुलीची फुलझाडं हे नाविन्य राहिलेलं नाही. नर्ससरीतल्या रक्तवर्ण रंगांच्या छोट्याश्या सदाफुलीने माझं लक्ष वेधून घेतलं आणि इतर झाडांबरोबर ती गॅलरीत दाखलही झाली. झुपकेदार फुलांनी रोज स्वागत करणारं हे झाड एक दिवशी सकाळी जरा नाराज दिसलं. सध्याच्या गरमीत सकाळ-संध्याकाळ पाणी देवूनही एका फांदीने मान टाकली होती आणि तिच्यावरील फुलं कोमेजून गेली होती. जवळ जावून पाहिलंतर त्या फांदीला किड लागलेली. माहित असलेले उपाय करूनही एक-एक फांदी सुकत गेली आणि आता ही एकच राहिली, पण आज तीच्यावर हे बहारदार फुल उमललं, हे निसर्गाचं देणं...!
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वधर्म न सोडता
आनंद देत रहायचं हा मंत्र निसर्ग आपल्या अशा कृतींमधून सतत देत असतो. आपल्या अर्ध्याअधिक
फांद्या गमाऊनही उरलेला देह घेऊन हे फुलझाड असं तजेलदार फुल मिरवतय...., हे किती दिवस टिकणार
माहित नाही पण त्याने दिलेला हा आनंद मात्र दिर्घकाळ स्मरणात राहील. असं एक तरी सदाफुलीचं
झाड नजरेसमोर असावं; जे सदोदीत आनंदीत रहायला
शिकवेल, सदाच्या कटकटीतही फुलत
राहील.
No comments:
Post a Comment