केवळ वीस रुपये जमवता आले नाहीत म्हणून जे शिक्षण चार वर्षात पुर्ण झालं असतं ते करायला आणि पदवी मिळवायला सोळा वर्ष झगडावं लागलं, त्याच माणसाने सामाजिक शैक्षणिक संस्थांना दोन कोटी रुपयांहून जास्त निधी गोळा करून दिला असा एक्याण्णव वर्षांचा तरूण मुलगा काल पहाण्याचा योग आला. निमीत्त होतं त्रिमिती या संस्थेने आयोजित केलेली सानेगुरूजींचा मानसपुत्र असलेले मा. प्रकाशभाई मोहाडीकर यांची एक हृद्य मुलाखत. साने गुरूजी, म. गांधीजी यांची तत्व आजच्या युगातही प्राणपणाने जपणारी आणि प्रत्यक्ष कृतीने अमलात आणणारी जीती-जागती माणसं आजही आहेत हे पाहून धन्य व्हायला झालं. अतिशय खडतर आयुष्य जगूनही कसलाच कटूपणा मागे न ठेवणारं प्रकाशभाईंसारखं व्यक्तिमत्व पाहून मान आणि मन आदराने खाली झुकतच.
प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
ही सानेगुरूजींची शिकवण तंतोतंत पाळणारे प्रकाशभाईंचे हात सतत देतच राहीले. १९७२ च्या दुष्काळात महाराष्ट्रातील जनता होरपळत असताना, लोकांकडून फार मोठी अपेक्षा न ठेवता शाळांमधल्या विद्यार्थ्याकडून प्रकाशभाईंनी एक-एक मुठ धान्य आणि रद्दी जमा केली. गांधी जयंतीच्या दिवशी एक वेळचं जेवण न जेवता मुलांनी ही मदत आपल्याच देशबांधवांसाठी प्रकाशभाईंच्या हवाली केली. त्यातून तब्बल ५५० पोती धान्य जमा झालं. ही मदत दुष्काळात देशोधडीला लागलेल्या गरीब जनतेला वाटण्यात आली आणि जमा रद्दी विकून जमा झालेली रक्कम मुख्यमंत्रीनिधीला देण्यात आली. बाबा आमटेंच्या आनंदवनात ते गेले असता तिथल्या लोकांकरीता मदत देण्याचं आश्वासन दिलं आणि तीन ऎवजी ४.५० लाख रुपये जमा करून ते पुर्ण केलं. त्या पैशांचं महत्व तर होतच पण आनंदवन प्रकल्पाचा प्रचार विद्यार्थात झाला म्हणून बाबाआमट्यांनी प्रकाशभाईंकडे कृतज्ञता व्य्कत केली. सामान्य लोकांच्या सहभागातून मोठं काम कसं करावं याचा हा वस्तूपाठच आहे. चार खोल्यांमधे सुरू केलेलं सानेगुरूजी विद्यालय आता आठ मजली इमारतीत आहे. ही किमया आजच्या शिक्षणसम्रांटांच्या वाटेने न जाता घामाचा पैसा उभारून त्यानी करून दाखवली.
समाजसेवा हे सतीचं वाण आहे. निवडणूकीच्या राजकारणात आजचे राजकारणी सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग कसा करतात आणि निवडून येण्यासाठी कमरेचं सोडून कपाळाला कसं बांधतात त्याचे प्रयोग आपण सध्या पहात आहोतच. प्रकाशभाईंनी मात्र निवडणूक लढवली आणि जिंकली ती सेवाभावाच्या जोरावर. इमारतीची भिंत रंगवण्यासाठी तिच्या मालकाची परवानगी तर घेतलीच पण निवडणूकीच्याच रात्री भिंतीला रंग काढून ती पुर्ववत करून दिली. देशाच्या राजकारणाच्या इतिहासात असा प्रसंग विरळाच. त्या इमारतीच्या मालकाची परवानगी घ्यायला गेले तेव्हा तो मालक म्हणाला सुद्धा “तुम्ही विचारायला तरी आलात” हे वागणं रजकारण्यांना दिशादर्शक आहे. प्रत्यक्ष कृतीने घालून दिलेले हे आदर्श ही काळाची गरज आहे.
एक्याण्णवव्या वर्षातही उत्साही असलेले प्रकाशभाई आपल्या त्या चिरतारूण्याचं रहस्य उघड करताना म्हाणाले “न लादलेलं काम करतो म्हणून मी सतत उत्साही आहे.” पण जनसेवेच हे काम म्हणजे सुळावरची पोळी आहे हे सर्वांनाच माहीत आहे. चीन बरोबरच्या युद्धानंतर आलेली दिवाळी..., आपण फराळ खातो पण सीमेवरच्या सैनिकाना फराळ कोण देणार या भावनेतून त्यानी फराळ बनवण्यासाठी मदत मागितली आणि शेकडो हात पुढे आले. पन्नास हजार मोतीचूर लाडू, दोनशे-दोनशे डबे चकल्या, चिवडा आठ दिवसात तयार झाला. या वरून प्रकाशभाईचा प्रामाणिकपणा आणि कार्याविषयीची तळमळ पाहूनच लोक त्याना साथ देतात हे आपल्या लक्षात येतं.
आताच्या काळात दोन शिक्षणसंस्थांच्या चालकांमध्ये अभावानेच दिसणारं सहकार्य बालमोहनचे दादासाहेब रेगे आणि प्रकाशभाईंमध्ये होतं. सानेगुरूजीं नंतर विद्यार्थ्यांवर मनापासून प्रेम करणारे दादसाहेब रेगेच होत असा उल्लेख प्रकाशभाई करतात. ७५ व्या वर्षी सर्व पदांचा त्याग करून त्यानी एक उत्तम आदर्श घालून दिला. चालता येत नाही पण पदाचा लोभही सुटत नाही असे आताचे मंत्री, पदाधिकारी पाहीले की या गोष्टीचं महत्व आपणाला पटतं. फैजपूर कॉंग्रेसच्या वेळी गांधीजींच्या कुटीवर स्वयंसेवक म्हणून झालेली नेमणूक हा आयुष्यातला ठेवा आहे असा उल्लेख ते करतात. “अलीकडे हक्कासाठी झगडण चालू आहे पण कर्तव्याकडे दुर्लक्ष होतं. असा जन्म कुस्करून टाकू नका, लोकांच्या उपयोगी पडा” असा संदेश ते देतात तेव्हा ‘बोले तैसा चाले’ म्हणून त्यांची पावलं वंदावी असं खर्या अर्थाने वाटतं. खरच ‘जीवन त्याना कळले हो आणि जीवन ते जगले हो.’
‘त्रिमिती’ने मनाला भिडणारा हा मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करून आताच्या जमान्यातही अशी माणसं आहेत याची जाणीव करून दिली आणि ‘त्यांच्या स्वप्नांच्या प्रवासाचे’ आम्ही दोन तास तरी साक्षीदार झलो या बद्दल त्रिमितीचेही मनापासून आभार. सिंधूताई सकपाळ, रेणूताई गावस्कर आता प्रकाशभाई मोहाडीकर आणि पोपटराव पवार या मालेत आणखीही अनेक पुष्प गुंफली जातील. अशी प्रेरणास्थानं बघायची, ऎकायची असतील तर ‘त्रिमिती’च्या कार्यक्रमांना जरूर हजरी लावली पाहीजे.
divyatwachi jethe prachiti, tethe kar majhe julati.
ReplyDeletehi mahiti sangitalya baddal khup khup abhar.
पतिक्रीये बद्दल धन्यावाद. आज पोपटराव पवारांवर आणखी एक लेख टाकला आहे, तुम्हाला नक्की आवडेल.
ReplyDeleteअशी माणसं आपल्या कृती तून समाजाला धडे घालून देत असतात.
ReplyDeleteत्यांना त्रिवार वंदन .