25 October, 2009

विचारांची आतषबाजी – प्रा.प्रविण दवणे

रात्री-बे-रात्री वाजवले जाणारे फटाके, त्या मुळे झोपेचं खोबरं झालेलं. त्यामुळे सकाळची झोप जरा जास्त घेऊन दिवाळीत पहाटे नाही पण दहा वाजता दामोदर नाट्यगृहात मंडळीनी गर्दी केली होती. त्रिमिती आयोजित स्वप्न बघा, स्वप्न जगा’ हा कार्यक्रम बघायला, नव्हे नव्हे ऎकायला रविवार सकाळ आणि ऎन दिवाळी सुरू असूनही सभागृह तुडूंब भरलं होतं. दवणे सरांचे मृदू मुलायम नवनीतासारखे शब्द मनाचा ठाव घेत होते. मग सुमारे दिड पावणेदोन तास केवळ मंतरलेले होते. दवणे सर म्हणाले हा मनोरंजनाचा नव्हे तर ‘मनोअंजनाचा’ कार्यक्रम आहे. समोर जमलेल्या होतकरू युवकांमध्ये आपल्याला बिजात दडलेला वृक्ष दिसतो आहे. त्याला आकाशचं निमंत्रण, पावसाची साथ आणि वार्‍याची साद मिळली ना म्हणजे त्याचं वृक्षात रुपांतर व्हायला वेळ लागणार नाही. पण असे मोठे झाल्यावर केवळ पैशाचा हव्यास नको. पैसा मिळवा पण तो साध्य म्हणून नव्हे तर साघन म्हणून. कसं ते स्पष्ट करताना त्यांनी एक गोष्ट सांगितली. एक माणूस तहानेने व्याकूळ होवून मेला. पाण्याचा एकही थेंब पिऊ न शकल्याने अखेर त्याचा अंत झाला. तो असं काय करत होता ? तर तो आपल्या घरातच पाणी भरत होता. मोठ मोठी भांडी भरून झाली. कळशी, टोप, पातेली, वाट्या, पेले, चमचे सरते शेवटी चाळण आणि गाळणीसुद्धा भरण्याचा प्रयत्न झाला. त्या एवढ्या धावपळीत त्याला स्वतःला तहान लागली पण पाण्याच्या हव्यासापोटी तो भरलेल्या पाण्यापैकी पाणी प्यायला तयार नव्हता आणि त्याची अखेर झाली. असा पैशाचा हव्यास नको.

उतूंग शिखरावर जायचं स्वप्न बघा. उद्याचं सत्य हे आजचं स्वपनच असतं. ते पहायला शिका. पांघरूण घेऊन झोपला असाल तर ते दूर करा. खिडकी उघडा. परवासाठी आजच पेरूया. माध्यामांचा क्लोरोफॉर्म घेऊन मी कसा दिसेन ही काळजी नको तर मी कसा असेन याची काळजी घ्या. अभिरूचीचं अमृत प्या आणि खरेच अ-मृत व्हा. देवाने माणसं ही झेरॉक्स प्रमाणे एकसारखी जन्माला घातलेली नाहीत. पं. रवी शंकर, डॉ.अब्दूल कालाम हे जसे एकमेवाद्वीतीय तसेच आपल्या सारखे आपणच. प्रत्येक माणूस हा युनिक आहे आणि म्हणूनच एकमेव आहे. तीच खरी ताकद आहे. दुसर्‍या पासून प्रेरणा घ्या मात्र भरारी घेणारे पंख तुमचेच असू द्या. जो पोहायला शिकवतो त्याने हात पाय मारून तुम्हाला पोहता येणार नाही. त्याला मिठी मारू नका दोघेही बुडण्याची शक्यता असते. काहीही शक्य आहे. एका पथ्थराला स्वप्न पडलं आपण सागर व्हावं. त्याला दाटून आलं. पाझर फुटला, त्याचा ओहळ झाला, तो नदीला मिळाला, नदी सागराला मिळाली तेव्हाच तो पथ्थर सागर झालाच ना? एक पथ्थर पर्वतावरून असा उतरतो मग तुम्ही आम्ही तर चालती बोलती माणसं. प्रतिकूल असं विणकाम करत गेलं की प्रविण काम होतंच. अडथळा आला म्हणजे समजावं आपल्याला गती प्राप्त झाली आहे. एका जागेवर थांबणार्‍याला अडथळा कसा येणार ? सरपटणार्‍या माणसांना कोसळण्याची भिती नसते. तेव्हा आपण का कोसळत नाही याचा विचार करा.


शिशिरात पानगळ होते ती नवी पालवी फुटण्यासाठी, नव्या आशेसारखी. आता समाजात पुर्वीसारखे महापुरूष नाहीत म्हणण्या पेक्षा तुम्ही व्हा ना महापुरूष. विचार हरवलाय तो शोधूया. जगण्याची कला आत्मसाथ करूया. खाणं आहे पण कसं खावं हे समजत नाही तो कर्मदरिद्री. जिवन आहे कसं जगावं हे समजत नाही तो कर्मदरिद्री. धनोरूग्ण आणि मनोरोग्ण यात काय फरक आहे ? त्यांच्या जवळ पक्वांन्न आहेत पण डायबेटीस झाला त्याला काय करणार ? पेढा नव्हता, त्या पेक्षा आता तो असूनही खाता येत नाही हे दुःख जास्त मोठं आहे. जाणार्‍या वेळाचं महत्व जो जाणतो तो त्याच्या प्रत्येक क्षणाची दिवाळी करतो. तेव्हा ‘घड्याळ माझा गुरू, घड्याळ कल्पतरू’ हा मंत्र जपा. आजच्या यशामध्ये एवढे गुंतू नका उद्याच्या स्वप्नांची काळजी घ्या. स्वप्न जगून ती सत्यात आणणारी माणसं आपल्यातच आहेत आपणही ते करू शकता.


7 comments:

  1. खरंय स्वप्नच तर आपल्या आशेला पालवतं ।

    ReplyDelete
  2. आशाताई, खुप छान कार्यक्रम होता. कवीवर्य प्रा. प्रविण दवणे छानच बोलले. दिवाळीचा तो दिवस मंतरलेला होता.

    ReplyDelete
  3. Hello,

    I like your blogs especially 'Trimiti' related ones.

    Do these programs get recorded? If so, how can I get copy of the same.

    Thanks,
    Shivanand Tendulker

    ReplyDelete
  4. शिवानेंद, त्रिमिती लवकरच या कार्यक्रमाच्या सिडी प्रकाशीत करेल असं वाटतं.

    ReplyDelete
  5. blog aawadala khup sunder aahe inspire zalo. Girish Patil NSK

    ReplyDelete
  6. blog aawadala khup sunder aahe inspire zalo. Girish Patil NSK

    ReplyDelete
  7. गिरीश नमस्कार,
    अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates