‘ज्ञातव्य’ हे सुलेखनकार सुभाष गोंधळे यांचं चित्रप्रदर्शन
आर्टीस्ट सेंटर गॅलरीत सध्या सुरू आहे. कालच हे चित्र प्रदर्शन पाहाण्याचा योग आला
आणि वाट वाकडी करून आर्टीस्ट सेंटर गॅलरीत गेल्याचं समाधान वाटलं. नुसती अक्षरं, शब्द
पण ते सुलेखनाच्या माध्यमातून समोर आले की स्तिमीत व्हायला होतं. देवनागरी लिपीतील
स्वर आणि व्यंजनं, त्यांच्या उच्चारणातील सुलभता आणि काठीण्य चित्रांच्या माध्यमातून
किती सहजतेने हाताळलेलं आहे ते ती चित्र पाहाताच लक्षात येतं.
![]() |
सुलेखनकार सुभाष गोंधळे (सुगो) |
‘हे अक्षरांनो मंत्र व्हा’ असं जर म्हटलं आणि खरोखरच ती अक्षरं मंत्र झाली आणि आपल्याशी बोलू लागली तर?
अक्षरं, शब्द आपल्या अर्थ, भावासहीत आपल्याला सामोरी आली तर काय बहार येईल? सुगो
अर्थात सुभाष गोंधळे हे सुलेखनकार ‘ज्ञातव्य’ (समजण्यास सोपे) या आपल्या प्रदर्शनाव्दारे आपल्याला
ही संधी उपलब्ध करून देत आहेत. सुलेखनाच्या माध्यमातून त्यांनी शब्दांना असे आकार
दिले आहेत की ते शब्द आपल्याशी त्यांच्या अर्थासहीत बोलू लागतात. आपल्याला
मंत्रमुग्ध करून टाकतात.
केवळ अक्षरांना आकार देऊन पाहाणार्याला आध्यात्मिक अनुभवाचा प्रत्यय देण्याचं काम सुगो करतात ते पाहून अचंबीत व्हायला होतं. ‘ॐ’, ‘स्वस्तिक’ अशा चिन्हांना सुगोंनी ज्या रंगसंगतीत सादर केलं आहे ती पाहाताना ध्यान धारणेची प्रभावळ पाहिल्याचा आनंद मिळाला तर नवल वाटू नये.

No comments:
Post a Comment