कवी विष्णू सुर्या वाघ/छायाचित्र उमेश साळगावकर |
उमेश साळगावकर |
विष्णू सुर्या वाघ या गोमंतक पुत्राला ही सुंदर कविता सुचली ती माझे मित्र उमेश साळगावकरांची छायाचित्रं
पाहून. जिथे सागरा धरणी मिळते... तिथे.... अनेकांनी अनेकदा आपली सकाळ विशेषत: सायंकाळ
नक्कीच रमणीय केली असेल. वाळूचे किल्ले बांधले असतील किंवा आपल्या नावाची अक्षरं
कोरली असतील, पण अशा सागर वेळेवर जेव्हा उमेश साळगावकरांसारखा जातीवंत कलाकार
जातो तेव्हा ती त्यांच्या कॅमेर्यामागच्या डोळ्याला अधिकच देखणी दिसते. सागर आणि
रुपेरी वाळू यांच जे अतूट नातं आहे त्याचं तितकंच विलोभनीय चित्रण साळगावकरांनी
आपल्या कॅमेर्याव्दारे केलं आहे. सागर किनारा, त्यावरची हळवी झालेली वाळू, कधी
लाटांनी तर कधी दवबिदूंनी. कधी तिथल्याच उभयचरांनी केलेली कशीदा आणि नैसर्गिक कलाकुसर
यांचं प्रत्ययकारी दर्शन आपल्याला साळगावकरांच्या छायाचित्रांमधून पाहायला मिळतं
आणि ते पाहून आपण स्तिमित होतो. आपण नेहमीच पाहिलेला किनारा काय सौदर्य ल्यालेला
असतो त्याची प्रचिती येते.
गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ छायाचित्रणात कौशल्य
दाखवून अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणार्या उमेश
साळगावकरांनी छायाचित्र प्रदर्शनातून रसिकांना आनंद दिला आहे. आजवर
निसर्गाची अदाकारी नेहमीच आपल्याला भुलवीत आली आहे. पण ती अधिक डोळसपणे पाहायला
लावणारं छाया, प्रकाश आणि वाळू यांच्या सुरेख आकृतीचं छायाचित्रांचं प्रदर्शन मुंबईत
आयोजित करण्यात येत आहे. ‘सॅन्डस्केप’ या शिर्षकाखाली होणारं हे त्यांचं चौथं
प्रदर्शन आहे. सदर प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम गुरूवार दिनांक १८ ऑक्टोबर सायंकाळी ५ वा. मुंबई क्रिकेट असोसियेशन चे अध्यक्ष मा. रवी सावंत यांच्या शुभहस्ते होणार असून १९ ते २४ ऑक्टोबर २०१२ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत, जहांगीर आर्ट गॅलरी, महात्मा गांधी रोड, काळाघोडा मुंबई ४०० ००१ या ठिकाणी प्रदर्शन सर्व रसिकांसाठी विनामुल्य खुले राहील. हे प्रदर्शन पुन्हा एकदा आपल्याला सागरतीरी जायला नक्कीच
उद्युक्त करील.
No comments:
Post a Comment