20 October, 2009

गगन सदन तेजोमय


दिवाळी पहाट हा आता महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा होत आहे. दिवाळीच्या दिवसात भल्या पहाटे उठून मंडळी जेव्हा अशा एखाद्या कार्यक्रमाला जातात तेव्हा ती दिवाळी नक्कीच संस्मरणीय ठरते. अशीच एक पहाट दिवाळीची उत्तम सुरवात करून गेली. ‘गगन सदन तेजोमय’ या आकर्षक शिर्षकाने सुरू झालेला ही पहाट उत्तरोत्तर रंगत गेली आणि तिचा कळसोध्याय होता तो म्हणजे सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे श्रीसिद्धिविनायक पुरस्कारांचा वितरण सोहळा. गार्गी पुरस्कार प्रदान करण्यात आला तो आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक असणार्‍या चंदा कोचर याना. फॉच्र्युनतर्फे जाहीर करण्यात आलेल्या सर्वात प्रभावी महिलांच्या यादीत गेली पाच वर्षे त्या आहेत. फोर्ब्सतर्फे जाहीर करण्यात आलेल्या १०० प्रभावशाली महिलांच्या यादीतही त्यांचे नाव विसाव्या क्रमांकावर आहे. कौटिल्य पुरस्कार देण्यात आला दिलीप नाचणे यांना. अर्थतज्ज्ञ डॉ. दिलीप नाचणे सध्या इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च या शैक्षणिक संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पूर्वी मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे संचालक असलेल्या नाचणेंनी रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, स्टेट बँक ऑफ इंडिया इत्यादी संस्थांनी स्थापन केलेल्या समित्यांचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. वाल्मिकी पुरस्काराचे मानकरी होते दिनकर गांगल. ग्रंथाली आणि वाचकाचं अतूट नातं आहे. गांगलानी १९७४ साली ग्रंथालीही वाचक चळवळ सुरू केली. लेखक घडविणारा वाल्मिकीया शब्दांत त्यांचा गौरवपुर्ण उल्लेख केला गेला तो सार्थच आहे. ग्रंथालीचं पुस्तक वाचनीय असणारच याची वाचकांना खात्री असते. उत्तमोत्तम पुस्तके किफायतशीर किमतीत वाचकांना देणार्‍या गंथालीचे आभार मानावेत तेवढे थोडेच. पुढचा होता सुश्रूत पुरस्कार. तो डॉ. संजय ओक यांना प्रदान करण्यात आला. जीएस वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संजय ओकांनी शासकीय रुग्णालयांमधील पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता असताना त्या संस्थेला आयएसओ प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे भारतात सयामी जुळ्यांवरील यशस्वी शस्त्रक्रिया असे अनेक विक्रम केले आहेत. एकलव्य पुरस्कार हा मानाचा पुरस्कार उदय देशपांडे यांना देण्यात आला. मल्लखांब या भारतीय खेळाचा प्रसार आणि प्रचार देश विदेशात करून त्यांनी या खेळाला वैभव प्राप्त करून दिलं आहे. त्यांनी शिकवलेल्या मुलांनी व्यासपीठावर मल्लखांबाच्या अप्रतिम कसरती करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात आपल्या असामान्य कर्तृत्वाने माहाराष्ट्राच्या आकाशात तळपणार्‍या या तेजस्वी सुर्यांचं दर्शन घेवून दर्शक जेव्हा निघाले तेव्हा त्यांच्या वाटा अधिक प्रकाशमान झाल्या असतील.

3 comments:

  1. कुणाल ब्लॉगवर आपलं स्वागत.

    ReplyDelete
  2. फारच छान वर्णन केलंय तुम्ही गगन सदन तेजोमय कार्यक्रमाच.
    asha-joglekar.blogspot.com

    ReplyDelete
  3. आशाताई धन्यवाद! आपल्या सारख्यांच्या प्रतिक्रीयेमुळे लिहायचा उत्साह वाढतो. हे लिखाण आपल्यासारख्यांसाठीच.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates