01 October, 2009

आणि सावरकरानी सशस्त्रक्रांतीचा पुरस्कार केला

प्लेगच्या साथीला प्रतिबंध करण्याच्या निमित्ताने ब्रिटीश सरकारने जनतेचा जो असह्य छळ चालवला होता, स्त्रियांवर अत्याचार केले ते पाहून चाफेकर बंधू खवळले. चाफेकर बंधूंनी रँडला गोळ्या घालून ठार केलं. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. १८ एप्रिल १८९८ रोजी दामोदरपंत चाफेकर हातात गीता घेऊन फासावर चढले. वासुदेव आणि बाळकृष्ण हे चाफेकर बंधू मे १८९९ मध्ये फाशी गेले. भगूर मध्ये ही बातमी बाल सावरकरांच्या कानी पडताच ते अस्वस्थ झाले. रक्त गरम झालं, हे तरूण देशाच्या स्वातंत्र्यासाठी जर हसत ह्सत फासावर जाणार असतील तर आपण गप्प बसून चालणार नाही. ते तडक देवघरात गेले आणि कुलदेवता दुर्गेच्या चरणापाशी बसून प्रार्थना केली की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मारीता मारीता मरेतो झुंजेन, पण आई तुझ्या मस्तकावर स्वातंत्र्याचा सुवर्ण किरीट चढवल्याशिवाय रहाणार नाही. सावरकर त्यावेळी वयाचं पंधरावं वर्ष पुर्ण करत होते. बाल शिवाजीने रोहीडेश्वरी घेतलेली शपथ आणि सावरकरानी घेतलेली ही शपथ यात विलक्षण साम्य होतं. वीर सावरकरानी आयुष्याच्या अंतापर्यंत या प्रतिज्ञेचा पठपुरावा केला. सशस्त्रक्रांतीचा पुरस्कार केला पण सावरकर हिंसावादाचे पुरस्कर्ते होते असं नाही. पण इंग्रजांच्या दमनकारी राजवटीला धडाशिकवायचा असेल तर त्याना घटनात्मक मार्गाने विरोध करता येणार नाही कारण हिंदुस्थानच्या भल्याची तेव्हा घटनाच नव्हती, जे काही कायदे होते ते ब्रिटीश सत्तेचा पाया मजबूत करणारेच होते. ही राजवट उलथून टाकायची असेल तर क्रांती शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही हे सावरकराना त्या बाल वयातही चांगलच कळलं होतं आणि त्या दिशेने त्यांची पावलं पडत होती.


1 comment:

  1. तुमचा ब्लॉग नेहेमी वाचतो पण कॉमेंट टाकली नाही कधी. आजचा लेख पण नेहेमी प्रमाणेच छान आहे.. आवडला.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates