शाळंना सुट्ट्या पडल्या आणि दिवसभर हातात पिस्तूलं घेऊन फट्... फट्... आवाज करत एकमेकांच्या मागे धावणारी मुलं दिसू लागली. जसजशी दिवाळी जवळ येईल तसतसे फटाक्यांचे आवाज वाढत जातील. करमणूकीची अनेक साधनं उपलब्ध असतानाही आणि या फटाक्यांमुळे पर्यावरणाला किती हानी पोहोचते ते माहीत असतानासुद्धा शिकलेली पालक मंडळी असं का वागतात हा खरच मोठा प्रश्न आहे. ‘फटाक्याचे तोटे’ हा प्रोजेक्ट पुर्ण करून एक अभ्यास हातावेगळा झाला म्हणून आनंदाने फटाके वाजवणारी मुलं जेव्हा मी पाहीली तेव्हा मात्र कपाळावर फटाके मारून घ्यावेसे वाटले. ‘सगळे वाजवतात, त्यात आपले’ असं म्हणून त्यात भर घालण्यापेक्षा फटाके न वाजवता प्रदूषणाला आळा घालणं किती महत्वाचं आहे हे आता तरी समजलं पाहीजे.
फटाक्यांमुळे प्रचंड प्रमाणात ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण होतं. रक्तदाब वाढणे, बहीरेपण येणे, दमा, खोकला असे विकार बळावणे, स्वसनक्रियेचे आजार होणे असे अनेक त्रास फटाक्यांमुळे उद्भवतात. आगी लागण्याचा संभव असतो. फटाक्यांच्या कारखान्यात लहानमुलं काम करतात. त्यांच्या शरिरावर फटाक्यांच्या दारूचा वाईट परीणाम होवून ती प्राणाला मुकतात. कालच मतपेट्या बंद झाल्या, दिवाळीनंतर त्या उघडतील तेव्हा निवडणूकांचा निकाल लागल्यावर राज्यकारभार हातात घेवू इच्छिणारेही फटाके लावून प्रदूषणात भर घालतील.
आपण एकच करू शकतो ‘फटाके वाजवू नका’ असं आवाहन करू शकतो.
सहमत
ReplyDelete