09 November, 2010

गंगापुत्र श्री.विजय मुडशिंगीकर
दिवाळी सारखे सण आले की हल्ली मुंबईत रहावत नाही. फटाक्यांचा अतिरेक आणि कानठळ्या बसवणारा आवाज याने जीव हैराण होतो. आवाज, हवा यांच्या प्रदुषणात कमालीची वाढ होते. या वर्षी ऎन दिवाळीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा मुंबईत होते. त्यांची सुरक्षा व्यवस्था चोख असली तरी त्यांच्यापर्यंत हे प्रदूषित हवा नक्कीच पोहोचली असणार. आपण प्रगत राष्टाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. ओबामानी तर भारत प्रगतीशील नव्हे तर प्रगत देश आहे असे म्हटले आहे. पण त्यानी तसं म्हणून काय उपयोग. ते इथल्या प्रत्येक कृतीतून दिसून आलं पाहिजे. मुंबईवरून ओबामा उडत असताना त्यानी शहराचा झालेला उकिरडा नक्कीच बघितला असणार. विमानतळाजवळची मिठी नदी ओबामांच्या नजरेस पडली असती तरी त्याना भारत अजून किती मागे आहे हे समजलं असतं. हे आपणच असं का करतोय?  एकेकाळी मिसिसिपी गंगेसारखीच होती. पण अमेरिकेने तीला तीचं मुळ रूप प्राप्त करून दिलं. गंगेला ते कधी प्राप्त होणार?

ओबामांनी भाराताबाद्दल आशावादी विचार मांडले. इथली मुलं, तरूण यांना पाहून ते प्रभावीतही झाले. एकप्रकारची ताकद आणि इच्छाशक्ती इथल्या वातावरणात त्यांना दिसून आली. खरच एक दिवस भारत सामर्थ्यवान देश बनेल अशी आशा त्यांना, तुम्हा आम्हा सर्वांना आहे त्याचं कारण एक ध्येय्य घेऊन झटणारी माणसं अजून या देशात आहेत. ओबामा भारतात यायला निघाले आणि सर्वच वृत्तपत्रात त्यांच्याबद्दल लिहून यायला लागलं. लोकसत्तामध्ये याच दरम्यान मिसिसिपी ते गंगा! हा अग्रलेख आला होता. मनात आणलं तर एक सामान्य माणूस काय करू शकतो हे त्या नमूद केलं होतं. गेल्या काही वर्षांत विजय मुडशिंगीकर या महाराष्ट्रातील एका एकांडय़ा शिलेदाराने गंगेच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. निवृत्तीनंतरची पुंजी म्हणून जमा करून ठेवलेला भविष्य निर्वाह निधी त्यांनी पूर्णपणे या मोहिमेत ओतला आहे. असा उल्लेख त्या अग्रलेखात होता. श्री. मुडशिंगीकरानी केलेलं काम नक्कीच दाद देण्यासारखं आहे, विचार करायला लावणारं आहे.

आदर्श सारखे घोटाळे, सत्ताधिश, नोकरशहा, बिल्डर, दलाल हे सगळे देश विकून खात असताना हा देश अजून तगून आहे तो मुडशिंगीकरांसारख्या प्रामाणिक लोकांमुळेच. एक सोडून दोन वेळा मणक्याची ऑपरेशन झाली तरी त्यानी त्या आजारपणात ध्यास घेतला तो गंगा शुद्धीकरणाचा. ते आपल्या या भुमिकेशी एवढे प्रामाणिक राहिले की या भ्रमणयात्रे दरम्यान काढलेल्या छायाचित्रांना चांगली किंमत येत असतानाही त्यांनी ती विकली नाहीत. सगळ्याच क्षेत्रात होणारं प्रदुषण रोखण्याच्या बाबतीत ते आग्रही असतात.

गंगोत्री 
गंगा ते आदर्श सगळीकडेच भ्रष्टाचार, प्रदुषण. सगळ्या देशाचाच चेहरामोहरा विद्रूप होत असताना अशी काही माणसं (अण्णा हजारे, पोपटराव पवार) आपलं काम निष्ठेने करत रहातात म्हणून काही अंशी आपण हे विष पचवू शकतो. मुडशिंगीकरांसारख्यांच्या प्रयत्नाला हातभार लावला तर आणि तरच गंगाजल पुन्हा शुद्ध होईल. पवित्र होईल.    
   

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates