19 August, 2010

लडाख मधला पर्यटकांचा ओघ कमी होता नये


लडाखच्या दिशेने जाताना आत्माराम परब सृष्टीसौदर्याची माहिती करून देताना
नितांत सुंदर अशा लडाखमध्ये ढगफुटी झाली आणि काही कळायच्या आतच तिथलं सगळं पालटून गेलं. गाव, घरं वाहून गेली. दोनशेवर माणसं प्राणास मुकली. सरकार आणि सामाजीक संस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. (माझा मित्र आत्माराम परब कालच इशा टुर्स तर्फे मदत घेऊन लडाखला रवाना झाला आहे.)  काल अभिनेता अमिर खान लेहला जाऊन आला. हा एक माणूसकी असलेला आणि पाय जमिनीवर असलेला अभिनेता. त्याने आपण मदत जाहिर केली आणि बॉलिवूडलाही आवाहन केलय. पंतप्रधानांनी मदतीचं आश्वासन दिलय, तरीही तिथली जनता हवालदील झालीय. होणारच, देशातली इतर ठिकाणं आणि लडाख मध्ये फरक आहे तो मुख्य वातावरणातला. जवळ जवळ सात महिने कडाक्याची थंडी (वजा १० ते वजा १५) तपमान. या वातावरणात घराबाहेर पडण्याची कुणाची शामत होत नसते. त्या दरम्यान तिथले सर्व व्यवहार थंडावलेलेच असतात. लडाखला जे जावून आलेले आहेत त्यांना या परिस्थितीची पुर्ण कल्पना आहे. पुर्ण लडाख प्रांत या दरम्यान देशाच्या इतर भागापासून तुटलेला असतो. अशा विषम वातावरणात राहायचं असल्याने वर्षातल्या जेमतेम चार-पाच महिन्यातच तिथल्या लोकांना वर्षाची बेगमी करावी लागते. या चार महिन्यात जी कमाई होईल तीच्यातच पुर्ण वर्षभर गुजारा करावा लागतो.

हॉटेल बिजू मधली एक प्रसन्न सकाळ 
आजच आमचे मित्र (आमचे म्हणजे माझे आणि आम्हा लडाखवर प्रेम करणार्‍या मंडळींचे) लडाखच्या बिजू हॉटेल चे मालक आशिकभाईचा फोन होता. ते खुपच व्यथित झाले आहेत. ती ढगफुटी झाल्या पासून तिथले सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. तिथले आर्थिक व्यवहार मुख्यतः पर्यटनावर अवलंबून असतात आणि तोच व्यवसाय आता धोक्यात आला आहे. सहा ऑगस्ट नंतरची सगळी हॉटेल आरक्षणं पर्यटकांनी रद्द केल्याने आता पुढच्या हिवाळ्यात खायचं काय हा प्रश्न तिथल्या लोकांना सतावतो आहे.

अभिनेता अमिर खानची लेह भेट 
काल अभिनेता अमिर खानने नेमकं याच मुद्द्यावर बोट ठेवलं आणि तमाम भारतीयांना आवाहन केलं की त्यानी लडाखच्या पर्यटनाकडे सकारात्मक दृष्टीने पहावं. तिथला पर्यटनाचा ओघ कमी पडू देऊ नये. लडाख आता पुर्व पदावर आलं आहे. जेव्हा ही घटना घडली त्यानंतर लगेचच माझे मित्र आत्माराम परब यांनी लोकसत्ता मध्ये लेख लिहून पर्यटकांनी घाबरून जावू नये आणि लडाखसारख्या स्वर्गिय सौदर्याकडे पाठ फिरवू नये असं आवाहन केलं होतं. गेली पंधरा वर्ष सातत्याने लडाखला जाऊन तिथला निसर्ग लोकांच्या समोर आणलेल्या या जिप्सीच्या सूरात आपला सूर मिसळला पाहिजे.                

2 comments:

  1. मला नाही वाटत ओघ कमी होईल.. मात्र या वर्षीचा ओघ नक्की संपला.. अगदीच मोजके लोक जाऊन येतील. मी स्वतः पुढच्या वर्षी पुन्हा जातोय.. जून ते सप्टेंबर शिवाय परब काका तिकडे जातात ना.. जायला जमेल?

    ReplyDelete
  2. रोहन तुम्ही नक्की जा. मी स्वतः २९ ऑगस्टला जाणार आहे.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates