08 January, 2015

किरण पुरंदरेंची धम्माल शीळ


Kika profile
दिवसभराच्या कामाचा थकवा क्षणार्धात दूर करणारी शीळ काल ऎकली आणि एरवी या आनंदाला आपण का मुकतो असा प्रश्नही पडला. मुळात निसर्गाचाच एक भाग असलेले आपण त्याच्यापासून एवढे दूर जातो की मग अरे! हे रोज आपणाला साद घालत असतं हे ही विसरून जातो. मॅजेस्टिक गप्पांमध्ये काल किरण पुरंदरेंची मुलाखत होती. ‘सखा नागझिरा’ पासूनची त्यांची ओळख काल आणखी दृढ झाली. हा माणूस पक्षांशी बोलतो एवढं माहित होतं पण काल त्यांची सुभग, नाचण, गरूड, पोपट यांच्या आवाजातली शीळ ऎकली आणि थक्क झालो.



वानरांच्या नेत्याचा 'भद्या' चा आवाज 

जंगल, पक्षी, प्राणी हे तर आपणाला नातेवाईकांहून ही प्रिय आहेत असं सांगताना लहनपणापासून आपण त्यांच्या प्रेमात कसे पडलो याचा सगळा पट किरण पुरंदरेंनी काल उलगडवून दाखवला आणि निसर्ग प्रेम म्हणजे काय याचा साक्षात्कार घडवला. नागझिर्‍याचे चारशे दिवस, तिथे घडलेले वाघीणीचे दर्शन, मग थरकाप उडवून देणारा जंगलचा माहोल,  भल्यामोठ्या अस्वलीणीचं तीच्या पिलावळीसह घडलेलं दर्शन, यांचं प्रत्ययकारी वर्णन ऎकताना अंगावर रोमांच उभे राहिले. खरंच हा माणूस आपल्याला  आवडेल त्या प्रकारेच आपलं आयुष्य जगला. किती वेगळे अनुभव त्यांनी घेतले. व्यंकटेश माडगूळकरांपासून सालीम अली पर्यंत निसर्ग प्रेमींचा त्यांना लाभलेला सहवास सगळंच जाणून घेताना प्रथमच गाव सोडून मुंबईला आल्याचं वैशम्य वाटलं.


अस्वलाचा आवाज

भूतदया दाखवण्यासाठी पक्षांना खावू घालू नये, त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम तर होतोच पण कबूतरासारख्या पक्षांचा त्रासच माणसाला जास्त होतो आणि कबूतरांच्या विष्ठेत वीस हून जास्त विषाणू असतात, जे दम्यासारख्या रोगाला आमंत्रण देतात. अशोकासारखी निरुपयोगी झाडं लावण्यापेक्षा काटेसावर, पळस आणि पांगारा ही झाडं लावावीत. काटेसावर ज्याला शाल्मली असंही नाव आहे त्या झाडावर साठ पेक्षा जास्त पक्षी येतात. भारतीय झाडं लावल्यानेच इथल्या पर्यावरणाला त्याचा फायदा होणार आहे.

सुभगाशी केलेला संवाद





  
 

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates