मुंबईत निसर्गाचं दर्शन होणं तसं मुश्कील म्हणण्यापेक्षा तिकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नसतो. तरी बरं अजून बोरिवलीचं नॅशनल पार्क अतिक्रमीत होवूनसुद्धा शाबूत आहे. निसर्गप्रेमी मंडळी मुद्दाम वेळ काढून तिकडे जातात. हे नॅशनल पार्कच आमच्या पथ्यावर पडलय, बर्याचवेळा तिकडे ये जा करणारे पक्षी घटकाभर का असेना आमच्या इमारतीच्या आजूबाजूला असलेल्या झाडांवर विसावतात आणि त्यांचं दर्शन घडतं. हे पाहूणे जरी काही वेळच थांबणारे असले तरी दरवर्षी वसंत ऋतू येताच कोकीळ इमारती शेजारच्या झाडावार ठाणमांडून बसायचा तो अगदी मे महिन्या पर्यंत. भल्या पहाटे त्याचं कुहू कुहू सुरू व्हायचं आणि एरवी आनंद देणारं ते त्याचं गाणं ओरडणं वाटायला लागायचं. पहाटे पाच वाजल्यापासून उठायचं नसलं तरी त्याच्या गाण्यामुळे पर्याय नसायचा. असं असलं तरी मुंबईसारख्या शहरात असूनही कुहू कुहू ऎकायला मिळतं याचं आम्हाला कोण कौतूक वाटायचं. पण......, यावर्षी तो अजून आलाच नाही. लांबलेली थंडी, नंतर अचानक वाढलेलं तपमान या सगळ्या बदलत्या वातावरणात तो कोकीळ कुठे दडून बसलाय? एरवी तो गायचा तेव्हा अती झालं की मला वसंतराव देशपांड्यानी गायीलेलं
‘कुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा ?
रात्री तरी गाऊ नको, खुलऊ नको अपुला गळा’
हे गाणं हमखास आठवायचं, पण यंदा तो अजून आला नाही म्हणून आम्ही म्हणतोय
कुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का त्या कोकिळा ?
असा उशीर लाऊ नको, खुलऊ न ये अपुला गळा...........!
होय, माहीम-शिवाजी पार्क विभागातदेखील कोकिळाची साद अजून ऐकू आलेली नाही. कावळ्यांच्या विणीचा हंगाम पुढे सरकला असावा असे वाटते.
ReplyDelete