माळढोक हा दुर्मिळ पक्षी. एकेकाळी महाराष्ट्राच्या गवताळ भागात आढळणारा हा पक्षी बेसुमार शिकार आणि त्याच्या आधिवासावर होणार्या अतिक्रमणामुळे महाराष्टातून हद्दपारच झाला होता. सोलापूरचे प्राध्यापक बी.एस्. कुलकर्णी यांना तो १९७२ च्या दरम्यान पुन्हा आढळून आला. माळढोकचा पुन्हा शोध लागल्यावर सोलापूरपासून वीस किलोमीटर अंतरावरच्या नान्नज इथल्या माळरानाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. माळढोक पक्षांची संख्या वाढावी म्हणून प्रयत्न सुरू झाले. माळढोक हा उंच, डौलदार, देखणा पक्षी पहावा म्हणून माझे मित्र रत्नदिप पाटील यांच्या सोबत नान्नजला जायचा बेत आखला.
सोलापूर शहर सोडून बार्शीकडे जाणार्या रस्त्यालाच नान्नजला जाणारा फाटा आहे. सभोवतालचा गवताळ प्रदेश आणि रानफुलं पाहता पाहता मधूनच होणारी पक्षांची कुजबुज आपलं लक्ष वेधून घेते. आजुबाजुच्या झुडूपांवर उडणारी फुलपाखरं मन प्रसन्न करतात तरीपण माझी नजर शोधत होती ती त्या माळढोक पक्षाला. आल्या सारखा दिसला पुरे अशी रुखरुख लागून राहिलेली. वाटेत दिसणारे वेडा राघू, सातभाई, चंडोल, टिटवी, धावीक असे पक्षी आणि बागडणारी हरणं यांची नजाकत टिपत त्यांच्या हालचाली, सवयी यांची माहिती रत्नदिपकडून घेत आमचं मार्गक्रमण सुरू होतं. आता आम्ही अभयारण्याच्या गाभ्यात येऊन पोहोचलो होतो. जवळच असलेल्या गेट मधून आत गेल्यावर जंगल वाचनाच्या नियमाप्रमाणे सगळे आवाज बंद केले. जवळच असलेल्या एका उंच मचाणावर चढून अख्खा परिसर न्याहाळला. गवताळ रानमाळ असल्याने दुरवरचा विस्तीर्ण प्रदेश नजरेच्या टप्प्यात येत होता. पण इथून माळढोक दिसण्याची शक्यता नव्हती.
माळरानात चालत पुढे गेलो. तिथे एका ठिकाणी एक झोपडी होती. त्या झोपडीत बसून पक्षांचं निरिक्षण करता येईल अशी तिची रचना होती. थोड्याच वेळात दुरवर माळढोक पक्षांची हालचाल दिसू लागली. ते आमच्याच दिशेने येत होते. सुरवातीपासून वाटत असलेली चिंता क्षणात मिटली. आम्ही दुर्बिणी सरसावून बसलो. उंच पांढरी मान प्रथम दिसली. लांबूनच त्याच्या उंचीची कल्पना येत होती. थोड्याच वेळात मानेखालचा राखाडी मातकट रंग दिसू लागला. आमच्या पासून काही अंतरावर चरणार्या त्या पक्षाची ऎट पाहण्याजोगी होती. पावसाळ्यात या पक्षांचा विणीचा हंगाम असल्याने ते एवढ्या सहज दृष्टीस पडतात. आम्ही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात गेलो होतो.
हाच तो माळढोक काही वर्ष अज्ञातवासात जावून पुन्हा एकदा परतला होता. त्याने आम्हाला तर दर्शन दिलं पण तो असाच दिसत रहावा असं वाटत असेल तर त्याचं निट संवर्धन झालं पाहिजे. त्यांची कमी होत जाणारी संख्या आणि वनअधिकार्यांची अनास्था यामुळे हा पक्षी पुन्हा संकटात आहे. त्याच्या आधिवासाला पोषक असलेलं गवत समुळ नष्ट करून कृत्रिम गवत लागवड करणारे अधिकारी जोवर वनखात्यात चरताहेत तो पर्यंत माळढोक संकटात आहे हे नक्की.
दिलेला फोटो आफ्रिकन बस्टर्डचा दिसतो.
ReplyDeleteहा फोटो वनक्षेत्रपाल माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज, सोलापूर यांनी प्रकाशीत केलेला आहे.
ReplyDelete