' नेमेची येतो बघ पावसाळा, हे सृष्टीचे कौतूक जाण बाळा ' या उक्ती प्रमाणेच नेमाने येणार्या पावसाचे ते दिवस. जागतिक तपमावाढीमूळे होणार्या दुष्परीणामांच्या आधीचे. सात जुनला मृगाचा पाऊस पडणार म्हणजे पडणारच. खरोखरच कौतूक करण्यासारखा. अंग अंग पुलकीत करणारा, अंतर्बाह्य ओलंचिंब करणार. शेतकरी राजाला आनंदीत करणारा आणि आम्हा मुलांना नाचवणारा. वेड्या पक्षांची मग गडबड उडायची, कुणाची घरटी अजून बांधून व्हायचीत, तर कुणी फक्त आडोसा शोधणारा. माणसांचंही तसच, लांबलेली कामं आटोपती घेता घेता भंबेरी उडायची. पण या पावसाच मात्र सर्वत्र स्वागतच व्हायचं. हा हा म्हणता दाटून आलेले ढग कोसळायला लागायचे आणि फिरत्या रंगमंचाप्रमाणे सृष्टीचं रुप पालटून जायचं. ढोल, नगारे, ताशे सगळं एकदम बडवतच तो यायचा, सगळ्यांना खडबडून जागं करायचा. सार्या आसमंतात आता त्याचच अधिराज्य असायचं. वातावरणात मृदगंध भरून रहायचा. पहीला पाऊस..., कधी पडणार ?... त्याला मात्र काळवेळ नसायची, कधी रात्री बे रात्री, तर कधी भर दुपारी. चिंब न्हावू घालायला तो अधीर असायचा. मातीच्या नसानसात शिरून पांढुरके ओले कोंब बाहेर काढेपर्यंत त्याला उसंत नसायची. चार-आठ दिवसात हिरवागार गालीचा पसरून झाला की मग जरा दम घ्यावा तसा थांबायचा.
आम्हा मुलांची मात्र त्याच दरम्यान घाई असायची ती शाळेच्या तयारीची. नवी पुस्तकं, नव्या वह्या, कधी नवी छत्री तर कधी जुनी दुरूस्त करून घ्यायची. नवा वर्ग, नवे शिक्षक, नवीन अभ्यास. पाऊसही दरवर्षी नव्याने भेटणारा. हवा हवासा वाटणारा.वर्गाच्या बाहेर लक्ष वेधून घेणारा, खट्याळ. छत्री नसताना वाटेत गाठणारा, खोडकर आणि ध्यानीमनी नसताना ओढ्याला पुर आणणारा, अडेल. आमच्या शाळेच्या रस्त्यावर मोजून पाच ओढे होते. पावसाळ्यात मग रोजच अडथळ्यांची शर्यत पार करत शाळेत पोहोचायचं. कधी जास्त पाऊस पडला तर शाळा लवकर सुटत असे, पण आम्ही मात्र रोजच्या वेळेतच घरी पोहोचत असू. त्या आयत्या मिळालेल्या वेळेत आम्ही आत्ताच्या भाषेत परिसर अभ्यास करत फिरायचो. वाट वाकडी करून कोणत्या ओढ्याला किती पाणी आलय ते बघता बघता कधी कधी ओढा ओलांडण कठीण होत असे आणि मग मात्र रडकुंडीला येत असू. भुकेने जीव व्याकूळ व्हायचा , पण दुसर्या दिवशी पुन्हा तेच.
'क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फेरूनी ऊन पडे' या कवितेच्या ओळी शिकल्यापासून माझी खुपदा भंबेरी उडालेली आहे. श्रावणातला पाऊस हा असाच पडणार असा नियम आहे असं मानून मी छत्री नेत नसे आणि मग कधी पावसाने संततधार धरली तर मात्र पंचाईत व्हायची. नेमका त्या वेळी माझ्याशी कट्टी केलेलाच मित्र भेटायचा. छत्री तशी दप्तर भिजू नये म्हणूनच असायची. गावी उभाआडवा पडणारा पाऊस छत्रीला मित्र मानत नाही आणि म्हणून तिला जुमानतही नाही. त्या मुळे कित्येकदा वह्या-पुस्तकं चुलीच्या पट्यावर सुकवावी लागत. ज्ञानात उर्जा ही अशी निर्माण व्हायची.
नागपंचमी पासून दसर्यापर्यंत सगळे सण हे पावसाळ्यातले पण श्रावणात दर रविवारी काढावी लागणारी पत्री आणि चतुर्थीत गणपतीची माटवी या साठी रानफुलं आणि फळं कुठे मिळतात ते मला पक्क माहिती असायचं. कधी कधी मी त्यांच्या जास्त प्रेमात पडायचो, मग आईला पुजेला वेळ व्हायचा आणि मला जेवायला उशिरा मिळायचं. तरी सुध्दा नुकताच पाऊस पडून गेला आणि तृणपात्यांवर पडलेली कोवळी उन्हं पाहिली की नेहमीच तसंच व्हायचं. होणारच, कुबेराचा खजिना सगळीकडे सांडलेला असायचा. मग वरून आकाशही स्पर्धेत उतरायचं. इंद्रधनुष्याचं टोक थेट क्षितीजाला टेकायचं. एवढं मोठ्ठं चित्र चितारलं जात असताना मी घरात कसा जाऊ ?
किती पावसाळे बघितले तरी पाऊस म्हटलं की मन भरून येतं. मला गावी घेऊन जातं. वारं कानात शिरतं आणि मातीचा सुगंध नाकात. मन मोहरून जातं. पावसाचं गाणं गावू लागतं. किंबहूना मनच पाऊस होतं.
नरेंद्र प्रभू
written very nicely.. reminds me of those wonderful childhood days..
ReplyDeleteराहूल, मुंबईतल्या पावसाची तशी मजा येत नाही. पाऊस म्हटल6 की आठवतात ते बालपणातले दिवस. प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.
ReplyDeletekharach gawakadla paaus chhatrila mitr maanat nahi..
ReplyDeletewachun mst watl.. thank u..
kharach Gawakadla pauus chhatrila mitr maanat nahi..
ReplyDeletewaachun mst watl...