सतरा जुलैच्या लोकसत्ता चतुरंग पुरवणीत ‘वैपुल्य आणि वैफल्य’ हा छाया दातार यांचा फारच सुंदर लेख आला आहे. अमेरिकेतील जीवनशैली विशेषत: खाद्यशैलीवर छायाताईंनी खुपच छान प्रकाश टाकला आहे. एका कॅलरीसाठी दहा कॅलरी खर्च होणारी उर्जा, ‘ग्लोबल वॉर्मींग’, ’ल्कायमेट चेंज’सारख्या गंभीर विषयांकडे केले जाणारे दुर्लक्ष, ‘फास्ट, कनव्हिनियंट, चीप’ हा मंत्र. मासासाठी जनावरांना नेहमीचं अन्न सोडून प्रक्रिया केलेलं अन्न खायला लावणं असे अघोरी प्रकार, हेच पदार्थ नंतर माणसांच्या खाण्यात आल्याने त्यांच्यावर होणारे विपरीत परिणाम, येणारा लठ्ठपणा हे त्या लेखातले प्रमुख मुद्दे आहेत. हा लेख मुळातूनच वाचण्याजोगा आहे म्हणून इथे त्याची लिंक देत आहे. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=86398:2010-07-16-08-48-20&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194 तो लेख आपण जरुर वाचावा. पण पाश्चात्यांचे अंधानुकरण करणारे आपण शहरी भारतीय सुद्धा यात मागे नाही. प्रसार माध्यमातून हल्ली त्याची चर्चा सुद्धा होत असते. पण लक्षात कोण घेतो! आपल्या शहरात, आजुबाजुला पुढील प्रकारच्या गोष्टी नेहमी घडत असतात तिकडे खरच आता जाणीवपुर्वक बघणं आवश्यक झालं आहे.
- लहान थोरांच्या खाण्यात येणारी जंक फूडस्.
- रसायनांचा वापर करुन पिकवलेली फळफळावळ.
- कोंबडीच्या पिल्लांना हार्मोंसची मात्रा देवून बारा महिन्यां ऎवजी चार महिन्यात विक्री योग्य बनवणे.
- रंगवलेल्या भज्या.
- दुधातली भेसळ.
- मॅकडोनाल्ड, केंटूकी सारख्या अमेरिकी खाद्यपदार्थ पुरवणार्या दुकानात होणारी गर्दी.
ही यादी आणखीही वाढवता येईल पण महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण या चक्रामधून सुटणार कसे? अमेरिकेप्रमाणे आपल्या आजुबाजुलाही खाण्यामुळे आलेला लठ्ठपणा दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसतो. आणखी एक वाईट गोष्ट म्हणजे ते जंक फूड खाणं हे प्रतिष्टेचं मानलं जातं. ऑफिसच्या कॅंटीन मध्ये जर कुणी पोळी-भाजी खाणारा दिसला तर त्याच्याकडे ‘कधी सुधारणार हा’ अशा नजरेने पाहिलं जातं. पुर्वी ऑरगॅनीक म्हणजे सेंद्रीय खतं वापरलेलेच अन्न पदार्थ, फळफळावळ, भाज्या खाणारे आपण भारतीय रसायनयुक्त शेतमालाला कधी सरावलो ते आपलं आपल्यालाच समजल नाही. फळांचा राजा हापूस, त्याची ती अप्रतीम चव आता फक्त आठवायची, त्याचा स्वाद केमिकल्सनी कधीचा नाहीसा केलाय. नुकताच बोर्डीला जावून आलो तिकडे आंबे, पपई यांची चव चाखली, स्वाद घेतला मन तृप्त झालं. ती फळ संद्रीय खतांवर वाढलेल्या झाडांना लागलेली होती आणि नैसर्गीकरीत्या पिकलेली होती. अमेरिकेला हसता ह्सता तेच दु:ख आपल्या दारीही उभं ठाकलय, जरा विचार करायला हवा.
No comments:
Post a Comment