20 May, 2010

'द म्युझिशियन्स' पन्नासावा प्रयोगरसिकांना कार्यक्रम आपला वाटतो असं काही कार्यक्रमांना भाग्य लाभतं द म्युझिशियन्स हा त्या मधलाच एक प्रयोग आहे. अगदी एन्ट्री पासूनच हा उत्साह जाणवत होता. दिनानाथच्या दारातच परिचीत मंडळी भेटली. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर उत्सुकता दिसत होती. सिने-नाट्य क्षेत्रातील ओळखीचे चेहरे पाहून ती आणखी ताणली गेली. गायीन सूर सुरेल नवेच्या तालावर पडदा बाजूला झाला आणि त्या मॅजिशियन्स् नी जो रसिकांचा ताबा घेतला तो अखेर पर्यंत कायम होता. या वादकांनी प्रथम तुला वंदितो ने सुरवात केली आणि शेवटी रसिक त्यांच्या कलेला वंदन करूनच गेला. ओळख करून देताना, पुष्कर श्रोत्री या कलाकारांना संत (संगीतातले तज्ज्ञ) म्हाणाले ते मनोमन पटलं. प्रयोग जसजसा पुढे सरकत होता तसतशी त्याची ती ओळखही सार्थ ठरत होती. समोरच्या पहिल्याच रांगेत अनिल मोहीले, अशोक पत्कीं सारखे संगीतकार बसले होते आणि ते ज्या प्रकारे दाद देत ते पाहून माझ्यासारख्याला हा मणीकांचन योग जमून आल्याचा आनंद होत होता. हे दाद देणं संगीताच्या जाणकारांचं होतं, गुरूंचं होतं. सारेगमपच्या तार्‍यांच्या पर्वात आपल्या सुरेल आवाजात गाणारे आणि इतर वेळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची दाद मिळवणारे सुमित राघवन, प्रसाद ओक, सुनिल बर्वे, सिमा देशमुख ज्या तन्मयतेने ऎकत होते आणि दाद देत होते त्याला काही तोडच नाही. किमान तीन वेळा तरी या मंडळीनी उभं राहून दाद दिली. त्यांच्या बरोबर कौतुकाची टाळी द्यायला गुरू ठाकूर, अवधूत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकर सुद्धा होते. प्रदिप वेलणकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत यांच्या जोडीने अनेक प्रसिद्ध कलावंत कार्यक्रमाची मजा लुटत होते. कायदेतज्ज्ञ उज्वल निकम आणि केसरी टुर्स चे केसरीभाऊ पाटील शेवटपर्यंत प्रेक्षागृहात होते. संजू महाडीक आणि विनायक दाबकेंना भेतायला पण खुप मजा आली.

गोरी गोरी पान, मायेच्या हळव्या, पल पल दिलके पास, तु जहा जहा चलेगा, चुरालिया है तुमने जे दिलको, होटो पे ऎसी बात, सुरमयी अखियोंमे, मोगरा फुलला, कजरा मोहब्बतवाला, आभाळमाया आणि मालगुडी डेज् चं टायटल म्युझिक, नटरंग ची लावणी, निलेशची ढोलकी, सत्यजितचं अँकॉर्डीयन आणि पियानिका, महेश खानोलकरांचं व्हायोलीन,  अमर ओकच्या बासर्‍या, आर्चिस लेलेंचा तबला तीन तास कानानी तृप्ती म्हणजे काय ते अनुभवलं. व्हायोलिन, बासरी, किबोर्ड, अँकॉर्डीयन, तबला, ढोलक, ढोलकी, ड्रमसेट, ऑक्टोपॅड, घुंगरू, गिटार या वाद्यांबरोबरच  स्वरलीन, पियानिका, जेम्बे, मादल, ही नेहमी बघायला न मिळणारी वाद्य बघायला आणि ऎकायला मिळाली. तसचं बाटली (काचेची बाटली), पॉलिश पेपर यांचा वापर वाद्य म्हणून करता येतो हेही समजलं. एकूण काय हे लोक खरच स्वरांचे जादुगार आहेत. संगीतातले ज्ज्ञ म्हणजेच संत आहेत हे पुष्कर श्रोत्रींचं म्हणणं एकदम पटलं. गायक कलाकार मिलिंद इंगळे  यांची प्रतिक्रीया वाचण्यासाठी इथे क्लिक करा   या प्रत्येक कलाकारावर वेगळं पोस्ट लिहावं लागेल  तो पर्यंत सा....रे... ग... म... प...              

ता.क.: सुप्रसिद्ध छायाचित्रकार श्री. गौतम राजाध्यक्ष यांच्या चेहरे या पुस्तकाचा अनावरण सोहळा लवकरच होणार असून, त्या पुस्तकात ज्यांचे चेहरे (फोटो) आहेत त्यांच्या समोर हेच वादक कलाकार त्या चेहर्‍य़ांनी गायिलेली, पडद्यावर सादर केलेली गाणी वाजवणार आहेत. ते चेहरे आहेत: लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन, जया बच्चन, ऎश्वर्या बच्चन, रेखा इत्यादी.  
                   


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates