हिंदी मराठी मधला कोणताही महत्वाचा सगींताचा जलसा असो व्हायोलिनवर साथ द्यातला हमखास महेशदा असणार हे आता ठरून गेलं आहे. अशोक हांडे यांच्या ‘मंगल गाणी दंगल गाणी’ पासून ‘माराठी बाणा’, ‘अमृत लता’ पर्यंत सगळ्या वाद्यवृंदांचे संगीत संयोजक महेशदा आहेत. वयाच्या चौथ्या वर्षापासून पं.जीयालाल वसंत यांच्याकडे त्यांनी संगीताचे धडे गिरवले. ‘द म्युझिशियन्स’मध्ये त्यांना मास्तर म्हणून मान आहे. ‘केव्हातरी पहाटे’ या नाटकाला आणि ‘गुलमोहर’ या हिंदी चित्रपटाला त्यांनी संगीत दिल असून अनेक अल्बम्स् ना संगीत दिलं आहे. त्यांचे ‘श्रावणात घननिळा..” आणि ‘मेरा साया..” हे बोलणार्या व्हायोलिनचे अल्बम्स् रसिकांच्या पसंतीला उतरलेले आहेतच.
‘द म्युझिशियन्स’मध्ये ‘भेटी लागी जिवा..’ जेव्हा ते वाजवतात तेव्हा त्या गाण्याची आर्तता हृदयाला भिडते. रेकॉर्डेड ट्रॅक बरोबर ते जेव्हा व्हायोलिन वर बो फिरवतात तेव्हा त्यात काना मात्रेचाही फरक नसतो. ही जादू ते करतात म्हणूनच त्यांना ‘मॅजिशियन’ म्हटलं जातं. ‘गोरी गोरी पान’ या बालगीतातले ‘तिला दोन थापा, तुला साखरेचा पापा’ या ओळी वाजवतात तेव्हा थक्क व्हायला होतं. तीच गोष्ट “सावन का महिना’ मधल्या ‘अरे बाबा... शोर नही.. सोsssर’ ची. स्वरलिन या अनोख्या वाद्या वर ते तारशहनाई आणि सारंगीचे स्वर काढतात ते सुद्धा ऎकत रहावे असे. ‘मेरा साया..’ मधले ‘आपके नजरों ने समझा’ पासून ‘मेरा साया साथ होगा’ पर्यंत सगळे सूर साज ऎकत रहावे असेच.
सुप्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या ‘श्रीनिवास खळे संगीत रजनी’ या कार्यक्रमात महेशदा १९९० पासून व्हायोलिनची साथ देत आहेत. त्यांचं व्हायोलिन वादन खळेसाहेबांना एवढं आवडतं की ते महेशदाना म्हणाले माझी गाणी तू न्हायोलिनवर वाजव. ‘श्रावणात घननिळा’ हा अल्बम त्याचीच फलश्रृती आहे. खळेसाहेबांसारख्या संगीतकाराने त्याना दिलेला हा बहूमानच आहे. सद्ध्याच्या युगात अशी संगीताची साधना करणारा कलावंत विरळाच.
No comments:
Post a Comment