रसिकांना कार्यक्रम आपला वाटतो असं काही कार्यक्रमांना भाग्य लाभतं ‘द म्युझिशियन्स’ हा त्या मधलाच एक प्रयोग आहे. अगदी एन्ट्री पासूनच हा उत्साह जाणवत होता. दिनानाथच्या दारातच परिचीत मंडळी भेटली. प्रत्येकाच्या चेहर्यावर उत्सुकता दिसत होती. सिने-नाट्य क्षेत्रातील ओळखीचे चेहरे पाहून ती आणखी ताणली गेली. ‘गायीन सूर सुरेल नवे’च्या तालावर पडदा बाजूला झाला आणि त्या मॅजिशियन्स् नी जो रसिकांचा ताबा घेतला तो अखेर पर्यंत कायम होता. या वादकांनी ‘प्रथम तुला वंदितो’ ने सुरवात केली आणि शेवटी रसिक त्यांच्या कलेला वंदन करूनच गेला. ओळख करून देताना, पुष्कर श्रोत्री या कलाकारांना ‘संत’ (संगीतातले तज्ज्ञ) म्हाणाले ते मनोमन पटलं. प्रयोग जसजसा पुढे सरकत होता तसतशी त्याची ती ओळखही सार्थ ठरत होती. समोरच्या पहिल्याच रांगेत अनिल मोहीले, अशोक पत्कीं सारखे संगीतकार बसले होते आणि ते ज्या प्रकारे दाद देत ते पाहून माझ्यासारख्याला हा मणीकांचन योग जमून आल्याचा आनंद होत होता. हे दाद देणं संगीताच्या जाणकारांचं होतं, गुरूंचं होतं. सारेगमपच्या तार्यांच्या पर्वात आपल्या सुरेल आवाजात गाणारे आणि इतर वेळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची दाद मिळवणारे सुमित राघवन, प्रसाद ओक, सुनिल बर्वे, सिमा देशमुख ज्या तन्मयतेने ऎकत होते आणि दाद देत होते त्याला काही तोडच नाही. किमान तीन वेळा तरी या मंडळीनी उभं राहून दाद दिली. त्यांच्या बरोबर कौतुकाची टाळी द्यायला गुरू ठाकूर, अवधूत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकर सुद्धा होते. प्रदिप वेलणकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत यांच्या जोडीने अनेक प्रसिद्ध कलावंत कार्यक्रमाची मजा लुटत होते. कायदेतज्ज्ञ उज्वल निकम आणि केसरी टुर्स चे केसरीभाऊ पाटील शेवटपर्यंत प्रेक्षागृहात होते. संजू महाडीक आणि विनायक दाबकेंना भेतायला पण खुप मजा आली.
गोरी गोरी पान, मायेच्या हळव्या, पल पल दिलके पास, तु जहा जहा चलेगा, चुरालिया है तुमने जे दिलको, होटो पे ऎसी बात, सुरमयी अखियोंमे, मोगरा फुलला, कजरा मोहब्बतवाला, आभाळमाया आणि मालगुडी डेज् चं टायटल म्युझिक, नटरंग ची लावणी, निलेशची ढोलकी, सत्यजितचं अँकॉर्डीयन आणि पियानिका, महेश खानोलकरांचं व्हायोलीन, अमर ओकच्या बासर्या, आर्चिस लेलेंचा तबला तीन तास कानानी तृप्ती म्हणजे काय ते अनुभवलं. व्हायोलिन, बासरी, किबोर्ड, अँकॉर्डीयन, तबला, ढोलक, ढोलकी, ड्रमसेट, ऑक्टोपॅड, घुंगरू, गिटार या वाद्यांबरोबरच स्वरलीन, पियानिका, जेम्बे, मादल, ही नेहमी बघायला न मिळणारी वाद्य बघायला आणि ऎकायला मिळाली. तसचं बाटली (काचेची बाटली), पॉलिश पेपर यांचा वापर वाद्य म्हणून करता येतो हेही समजलं. एकूण काय हे लोक खरच स्वरांचे जादुगार आहेत. संगीतातले तज्ज्ञ म्हणजेच ‘संत’ आहेत हे पुष्कर श्रोत्रींचं म्हणणं एकदम पटलं. गायक कलाकार मिलिंद इंगळे यांची प्रतिक्रीया वाचण्यासाठी इथे क्लिक करा या प्रत्येक कलाकारावर वेगळं पोस्ट लिहावं लागेल तो पर्यंत सा....रे... ग... म... प...
ता.क.: सुप्रसिद्ध छायाचित्रकार श्री. गौतम राजाध्यक्ष यांच्या ‘चेहरे’ या पुस्तकाचा अनावरण सोहळा लवकरच होणार असून, त्या पुस्तकात ज्यांचे चेहरे (फोटो) आहेत त्यांच्या समोर हेच वादक कलाकार त्या ‘चेहर्य़ां’नी गायिलेली, पडद्यावर सादर केलेली गाणी वाजवणार आहेत. ते चेहरे आहेत: लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन, जया बच्चन, ऎश्वर्या बच्चन, रेखा इत्यादी.
बहुतांश नवीन कलाकारांची कला मला उथळ वाटते; एका उत्तम सतारवादकानीही माझ्याशी बोलताना आधीच्या कलाकारांची कला फार उच्च पातळीवरची होती आणि तशी विविधता आणि खोली संगीतात आणणं कठीण आहे, अशी कबुली दिली होती. अमर ओक हा एक कलाकार मात्र याला अपवाद आहे. हृदयनाथनी मागल्या वर्षी प्रसिद्ध मालिकेचा परिक्षक म्हनून अनेक खरी-खोटी मते ठोकून दिली. अमर ओकांबद्दल मात्र हृदयनाथ म्हणाला की ते दुसरे हरिप्रसादच आहेत. आणि ते खरंच आहे. त्यांच्या बासरीत जादू आहे. बासरीचा सर्वोत्कृष्ट वापर करणार्या हृदयनाथसारख्या संगीतकाराकडून ओकांना पावती मिळाली, याचा मला आनन्द झाला. मुख्य म्हणजे ओक संगीताचे तुकडे आहेत तसे वाज़वतात. स्वत:चं प्रभुत्व दाखवण्याची अनावश्यक धडपड, विचित्र कपडे, बोलताना मर्कट हातवारे वगैरे चाळे ते करत नाहीत. चौरसियांचे अत्यन्त कठीण असे एकदोन तुकडे वाज़वताना ओकांची ज़रा गडबड झाली, पण तो दोष अगदीच किरकोळ आहे. त्यांच्या कलेचं चीज़ करणारी नवीन गाणी आज़ कोणीही रचू शकत नाही हे ओकांचं दुर्दैव. सलील कुलकर्णी, इनामदार यांच्यात काहीही चमक नाही. हृदयनाथसारखा संगीतकार ओकांना मिळायला हवा होता.
ReplyDelete- नानिवडेकर
काळानुरूप बदल हे होतच असतात. तरीसुद्धा खरे कलावंत असतात त्यानाच रसिकांची दाद मिळते. ‘द म्युझिशियन्स’ चे अल्पावधीत पन्नास प्रयोग झाले यातच सगळं आलं.
ReplyDelete> तरीसुद्धा खरे कलावंत असतात त्यानाच रसिकांची दाद मिळते. ‘द म्युझिशियन्स’ चे अल्पावधीत पन्नास प्रयोग झाले यातच सगळं आलं.
ReplyDelete>----
कार्यक्रमाचा दर्जा आणि लोकप्रियता यांचा सम्बन्ध असतोच असे नाही. कॉंग्रेसचा कार्यकर्ता म्हणाला : 'लोकांसाठी काम करणाराच पक्ष यशस्वी होतो; आम्ही सगळ्या निवडणुका जिंकतो यातच सगळं आलं'; तर? प्रचंड यशस्वी चित्रपट खरंच चांगले असतात?
राजकारण आणि संगीत या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राजकारणात पैसे देऊन बोलावलं जातं इथे स्वतःच्या खिशातले पैसे देऊन लोक येतात.
ReplyDelete