16 June, 2010

स्वप्नभूमी हिमालय


मला संपूर्ण हिमालयच एखाद्या आध्यात्मीक मंदिरा सारखा भासतो. एकदा आपण तिकडे गेलो की पुन्हा पुन्हा जावस वाटत राहतं. आणि मुद्दामहून कुठची साधना न करताही जे समाधान मिळतं ते खरच उच्च पातळीचं असतं. तेरा वर्षांपूर्वी प्रथम हिमाचल प्रदेशात पाऊल ठेवल्यापासून जी हिमालयाची ओढ लागली ती प्रत्येक भेटी गणीक वाढतच चालली आहे. धरमशाला जवळून शुभ्र चांदण्यात न्हावून निघालेल्या हिमालयाच्या धवलाधर रांगा पाहिल्या तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. पर्वताचं एवढं भव्य दर्शन मी प्रथमच घेत होतो. बघता बघता मी त्याचाच एक भाग बनलो. डोळे उघडे असोत की मिटलेले दृष्टीपटलावरच ते दृष्य हालायला तयार नव्हतं. अती भव्य हिमालय आणि एखाद्या कणा एवढा मी, आपण किती नगण्य आहोत या विश्वाच्या पसार्‍यात? हिमाच्छादीत शिखरांच दर्शन लांबून अथवा जवळून कुठूनही घ्या आपण त्याच्याशी तादात्म्य पावतो.

दूर उत्तर-पुर्वेला अरूणाचलप्रदेशा मध्ये तवांगला जाताना पुन्हा हिमालयाच्या भव्यतेने मला व्यापून टाकलं. आता मी हिमालयाच्या रांगामधूनच प्रवास करत होतो. एक पर्वत ओलांडून दुसर्‍या पर्वतावर जाण्यासाठी लागणारी खिंड (से-ला पास) पार करताना लांबून उंच वाटणार्‍या पर्वतरांगांना पार करत मी जात होतो. हा अनुभवही रोमांचकारी होता. पुढे गोरीचेन शिखराजवळची तळी आणि बर्फाची पांढरी चादर मनमोहून टाकत होती. कुमाव भागात नैनिताल-रानिखेत-बिनसर फिरताना ती शिखरं जरी दूर राहिली तरी नागमोडी वळणाच्या वाटा, चीड आणि पाईनचे वृक्ष, खोल दर्‍या आणि उंचच उंच पर्वत रांगा, मधूनच वाहणारी नदी आणि निळेशार तलाव, बिनसरचं घनदाट जंगल  पाहून पुन्हा हिमालयाच्या प्रेमात पडलो. 

कुलू-मनाली हे तर हिमालयातलं नंदनवन पण ती हिरवाई पाहून रोहतांग-पास, खोकसार,  केलाँग, बारलाचला पास पार करत जेव्हा मी लेह मध्ये पोहोचलो तेव्हा त्या निष्पर्ण प्रदेशाच्याही मी प्रेमात पडलो. सियाचीन भागातलं डीस्कीट खेड आणि हुंडरचं वाळवंट तर केवळ लाजवाब..!!! छांगला पास पारकरून तिबेटच्या दिशेने गेल्यावर निळाशार खारं पाणी असलेला पँगगाँग लेक  आणि त्याच रंगाचं आभाळ, रंगछटांचा खेळ एकमेकांशी खेळताना पाहून भान हरपून जातं. लेह लडाखचा हा नितांत सुंदर भाग म्हणजे हिमालयाचा आणखी एक देखणा चेहरा.  

गढ़वाल ही तर देव भूमीच. प्रत्यक्ष शिव-शंकराच्या जटेमधून गंगा अवतरली ती इथेच. गंगोत्रीच्याही पुढे जावून गोमुखचं दर्शन मी जेव्हा घेतलं तेव्हा याला देवभूमी का म्हणतात त्याचा साक्षात्कार झाला. या अफाट सृष्टीची रचना तो विधाताच करू जाणे. गंगा नदीच्या त्या उसळत्या प्रवाहात आणि त्याच्या कलकल निनादात सारं मी पण विरून जातं. रंध्रा रंध्रातून पावन धारा वाहायला लागतात. सारे षड्-रीपू पळून जातात. म्हणूनच त्या स्वर्गिय प्रवाहात सारं पाप वाहून जात म्हणतात.

हिमालयात कोठेही जा, तो आपल्याला वेगवेगळ्या पण विलोभनीय रुपात भेट देतो. प्रथम दर्शनीच आपण त्याच्या प्रेमात पडतो आणि मग वारंवार हिमालयाची वारी करतच राहतो. हिमालय आपल्याला बोलावतच राहातो.                      
               

4 comments:

  1. Khupach Chhan, Nukatich tumachya blogla bhet dili ani tumache lekh vachale. tumache likhan avadale ani tumachya ya kalechihi mahiti zhali.

    Dinesh Dalci

    ReplyDelete
  2. दिनेश, आभारी.

    ReplyDelete
  3. तुम्ही हिमलयात खुपच भटकंती केलेली आहे. आपण 'हिमयात्री' आहात. लिखाण खुपच छान झाल आहे.

    ReplyDelete
  4. विजयजी, धन्यवाद हिमालय आहेच तसा. हिमालय असलेल्या भुमीवर आपण जन्मलो हेच खरं भाग्य आहे.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates