02 May, 2019

अखिल ऑस्ट्रेलिया मराठी सम्मेलन २०१९ऑस्ट्रेलियामधील सिडनी इथे १९ ते २१ एप्रिल २०१९ हे तीन दिवस अखिल ऑस्ट्रेलिया मराठी सम्मेलन २०१९ साजरं झालं. संपूर्ण ऑस्ट्रेलिया खंडातल्या एक हजारावर मराठी रसिकांनी यात भाग घेतला होता. यात ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड येथील मराठी बांधव तर होतेच पण ज्या महाराष्ट्रातून ही मंडळी हजारो मैलांवर जाऊन स्थाईक झाली त्या महाराष्ट्रामधून, मुंबईमधून अनेक मान्यवर या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर विचारवंत डॉ. रघुनाथ माशेलकर, तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते अच्युत गोडबोले, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू, ईशा टुर्सचे संचालक आणि या कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक श्री. आत्माराम परब, चितळे बंधू मिठाईवालेचे श्री.केदार चितळे या मान्यवरांबरोबरच 'आम्ही आणि आमचे बाप'चे निर्माता मयूर रानडे, अभिनेता अतुल पारचुरे, आनंद इंगळे, पुष्कर स्त्रोत्री, अजित परब, 'लडाख.. प्रवास अजून सुरु आहे' चे लेखक नरेंद्र प्रभू, गायक कलाकार अनिरुद्ध जोशी, विश्वजीत बोरवणकर, शरयू दाते आणि प्रसन्नजीत कोसंबी सिडनीमध्ये दाखल झाले होते.

१९ एप्रिल २०१९ रोजी दुपारी ठिक दोन वाजता दिप प्रज्वलन करून या रंगारंग सोहळ्याला टाळ्यांच्या गजरात सुरूवात झाली. त्यानंतर आत्माराम परब यांच्या पहिल्या मुंबई-लडाख-मुंबई अशा मोटरसायकलवच्या प्रवासाची चित्तथरारक कथा असलेल्या ग्रंथाली प्रकाशनाच्या 'लडाख.. प्रवास अजून सुरु आहे' या वाचकप्रिय पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचं प्रकाशन जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झालं. त्यानंतर लगेचच डॉ. रघुनाथ माशेलकर यांची प्रेरणादायी मुलाखत झाली. गिरगावतल्या गरिबांच्या शाळेत डॉ. माशेलकर यांचं शिक्षण झालं, पण त्याचे शिक्षक विचारांनी श्रीमंत होते. हळद आणि बासमतीचं पेटंट, रिलायंस Jio ची भरारी, Making impossible  possible, आयुष्यातल्या प्रयोगशाळेतलं ज्ञान, जुन्या नव्याचा संगम अशा अनेक विषयांना त्यानी आपल्या मुलाखतीत स्पर्श केला. संपूच नये असं वाटणारी ही मुलाखत जेव्हा संपली तेव्हा संपूर्ण स्त्रोतृवर्गाने उभं राहून टाळ्यांच्या प्रचंड गजरात डॉ. माशेलकरांना मनावंदना दिली.

भारलेल्या या वातावरणतच संमेलनात "आम्ही आणि आमचे बाप" या नाटकाचा प्रयोग साजरा झाला. महाराष्ट्राची दोन लाडकी व्यक्तिमत्व प्रल्हाद केशव अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांच्या अष्टपैलू जीवाप्रवासावर आणि कलाजीवनावर आधारित हा अफलातून प्रयोग फारच रंगला आणि सर्वच कलाकारांनी वाहवा मिळवली.  महाराष्ट्राचं, मराठी मातीचं हे गतवैभव न्याहाळताना आपल्या मातीपासून दूर देशात स्थाईक झालेला नाट्यागारातील प्रत्येक मराठी रसिक आपापल्या स्मृतीरंजनात न्हाऊन निघाला होता. आचार्य अत्रे आणि पुल यांच्या कलागुणांचा हा गोफ म्हणजे एक अफलातून कलाकृती आहे. मयुर रानडे निर्माता असलेल्या या नाटकाचे तरुण दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी अत्रे आणि पु.ल. या दोन्ही महान कलाकारांना थोडक्या वेळात प्रभावीपणे रंगमंचावर सादर केलं आहे.

दुसर्‍या दिवशी प्रचिती लिमये दिग्दर्शित महाराष्ट्राची गोष्ट’, वैजयंती मोने दिग्दर्शितनाटक मेरी जान’, योगेश पोफळे दिग्दर्शितप्रतिक्षा आणि फ्लाईंग क्विन’, शलाका माळगावकर दिग्दर्शितरुजवा असे मनोरंजनाचे  रंगारंग कार्यक्रम सिडनीमधल्या मराठी कलाकारांनी सादर केले. शलाका माळगावकर यांनी सादर केलेला रुजवा हा नाट्य-नृत्य-गायनाचा-वादनाचा कार्यक्रम सगळ्यांच्याच दीर्घ स्मरणात राहील असा होता. आपल्या माती, संकृती आणि माणसांपासून हजारो मैलावर येऊन स्थाईक झालेल्या अखिल ऑस्ट्रेलियातील मराठी मनाची होणारी घालमेल आणि त्यावर दिलासा देणारी फुंकर या सादरीकरणाने घातली तेव्हा नाट्यगृह सद्गदीत झालं होतं. सिडनीमधल्या हौशी कलाकारांनी सादर केलेला हा कार्यक्रम व्यावसायीक कलाकारांच्या तोडीचा होता हे नक्की. दरम्यान चितळे बंधू मिठाईवालेचे श्री. केदार चितळे यांची मुलाखत इवलेसे रोप लावीयले व्दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी या काव्य पंगतींची आठवण करून देणारी होती. मुळ सांगलीकर असलेले चितळे पुण्यात येऊन स्थाईक झाले आणि आजच्या उंचीला पोचले त्याची खुसखुशीत कहाणी खुद्द केदार चितळे यांच्या तोडून ऐकण्यात वेगळीच मजा होती.

तिसर्‍या दिवशी प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू आणि किमयागार अच्युत गोडबोले यांच्या मुलाखतींनी कार्यक्रमाची सुरूवात झाली. डॉ. मीना प्रभूंच्या भ्रमंतीची कहाणी आणि अच्युत गोडबोले यांचा जीवनाचा प्रवास यांचं कथन प्रेरणादायी होतं. अच्युत गोडबोले यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व, त्यांच्या शिक्षण, संगणक आणि लेखनाचा प्रवास स्त्रोत्यांना जीवनाकडे पहाण्याचा सखोल दृष्टीकोन देऊन गेला. एक माणूस अर्थशास्त्र, संगीत, जीवनगाथा, संगणक, विज्ञान, कलाकौशल्य, गणित, समिक्षा, वैचारिक, मानसशास्त्र, आत्मकथन         अशा विविध विषयातील तज्ज्ञ असू शकतो याचं कौतूक तर होतंच पण त्यांना जवळून ऐकता पाहाता आलं म्हणून रसिक धन्य पावले होते. त्यानंतर भांडा सौख्य भरे ही प्रांजली पळनिटकर दिग्दर्शित नाटीका आणि मनोरंजनाचे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी रंग स्वरांचे हा लोकप्रिय मराठी गीतांचा कार्यक्रम गायक कलाकार अनिरुद्ध जोशी, विश्वजीत बोरवणकर, शरयू दाते, प्रसन्नजीत कोसंबी आणि निहीरा जोशी-देशपांडे या भारतातून आलेल्या गायक कलाकारांनी सादर केला. संपूर्ण नाट्यगृहाने त्यांच्याबरोबर ताल धरला होता. लोकप्रिय गाण्यांवर थिरकताना सगळेच रसिक संमेलनाच्या रंगात न्हाऊन निघाले होते.

आपली मराठी माती, माणसं, भारत देश एवढंच नव्हे तर आशियाखंडही सोडून दूर खंडप्राय ऑस्ट्रेलियात स्थायीक झालेली सिडनी, मेलबर्न, कैर्न, गोल्डकोस्ट आदी ठिकाणची मराठी माणसं या तिन दिवसात मनानेही एकत्र नांदताना दिसली. आपली मराठी संकृती जपताना आणि ती ऑस्ट्रेलियातही वाढवताना दिसली. संमेलनातला उत्साह तर एखाद्या लग्न सोहळ्याला लाजवणारा होता. २०२२ साली मेलबर्न इथे होणार्‍या संमेलनात नक्की भेटायचं असं एकमेकांना सांगत हस्तांदोलनं झाली, निरोपाचे हात हलले आणि दूर देशातही मराठी संकृती जिवंत आहे याचा सार्थ अभिमान वाटला.                             
 
  
                 

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates