05 August, 2012

रौप्यमहोत्सवी ‘चौरंग’




अशोक हांडे हे नाव उच्चारताच जबरदस्त मनोरंजन, सादरीकरणातली श्रीमंती, उत्तम नियोजन, कसलेले कलाकार, अभ्यासातून आलेली परिपूर्णता, उत्सव आणि उत्साह अशा अनेक गोष्टींची दंगल मनात उसळते. हा हा म्हणता चौरंगला पंचवीस वर्ष पूर्ण झाली. मंगलगाणी दंगलगाणी पासून सुरू झालेल्या या संगीतमय प्रवासाचा प्रत्येक टप्पा आणि कार्यक्रम मी जवळून पाहिलाय. उत्तरोत्तर होत जाणारी प्रगती आणि प्रयोगातील सातत्य हे तर आहेच पण एक मराठी शो मॅन हे सगळं करतो आहे हे पाहून प्रत्येक नव्या कार्यक्रमाच्यावेळी उर भरून यायचा, अभिमान वाटायचा. मंगलगाणी दंगलगाणी, आवाज की दुनिया, आजादी ५०, माणिकमोती, गाने सुहाने, गंगा जमुना, अमृत लता, मधुरबाला, आपली आवड आणि अर्थातच मराठी बाणा, हे सगळे कार्यक्रम पाहाणे म्हणजे केवळ आत्मानंद होता. कार्यक्रमातून भारावून जाणारा रसिक अशोक हांडे हे नाव आपल्या हृदयावर कोरणारच अशी त्या प्रयोगांची छाप असायची, अजूनही तो सिलसिला चालू आहे. अशोक हांडेंच्या  चौरंग या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आशोक हांडे आणि चौरंगच्या संपूर्ण टिमला मझ्या मना पासून शुभेच्छा!


अशोक हांडेंनी हे मनोरंजन विश्व कसं उभं केलं याची एक झलक आजच्या लोकसत्ताच्या रविवार वृत्तांत मध्ये त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून वाचता आली  ती पूढे देत आहे.

चौरंगावर डाव मांडला!
रोहन टिल्लू, रविवार, ५ ऑगस्ट २०१२

मंगलगाणी दंगलगाणी’, ‘अमृतलता’, ‘मधुरबाला’, ‘मराठी बाणायांसारखे अनेक दर्जेदार कार्यक्रम सादर करणाऱ्या चौरंगया संस्थेला ७ ऑगस्ट रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा प्रवास अभिमानास्पद तर होताच, पण त्याचबरोबर आव्हानात्मकही होता. या आव्हानांबद्दल आणि चौरंगच्या वाटचालीबद्दल चौरंगचे सर्वेसर्वा अशोक हांडे यांच्याशी केलेली ही बातचित..

गेल्या २५ वर्षांत तुम्ही अनेक दर्जेदार कार्यक्रम दिलेत. पण या सर्व कार्यक्रमांसाठीचं सांगीतिक बाळकडू नेमकं कुठे मिळालं?

हे बाळकडू आम्हाला पाजण्यात अनेक गोष्टींचा आणि गावांचा हात आहे. माझ्या बालपणाचा सुरुवातीचा काळ हा खेडेगावात वगैरे गेला. उंब्रज तालुक्यात आमचं गाव होतं. त्यामुळे ग्रामीण जीवन, बारा बलुते वगैरे आम्ही खूप जवळून पाहिलं होतं. या ग्रामीण जीवनात संगीताला, त्यातही लोकसंगीताला खूप वरचं स्थान आहे. लग्नापासून धार्मिक उत्सवांपर्यंत सगळीकडे लोकसंगीत अगदी ठासून भरलं आहे. त्यात तमाशाची पंढरी मानलं जाणारं नारायणगाव हे आम्हाला खूप जवळ. त्यामुळे तमाशाचा नादही (चांगल्या अर्थाने) लहानपणापासूनच लागला. शेतावर राखणीला मामाबरोबर जायचो. आम्हाला तमाशाचं वेड लागलं, त्याला कारण आमचा हा मामा! आम्ही राखणीला म्हणून जायचो आणि पाच किलोमीटर लांब धावत जाऊन तमाशा बघून यायचो. तर तात्पर्य हे की, लोकसंगीताचे संस्कार आमच्यावर लहानपणापासूनच झाले.


मग मुंबईचा प्रभाव तुमच्यावर नेमका किती आणि कसा पडला?

मुंबईचा म्हणण्यापेक्षाही रंगारी बदक चाळीचा प्रभाव माझ्यावर जास्त पडला. ही चाळ म्हणजे मुंबईतला महाराष्ट्र होता. महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागातून लोक त्या चाळीत राहायला आले होते. ते आले ते त्यांची संस्कृती, लोकसंगीत वगैरेंची परंपरा घेऊनच आले. त्यामुळे रंगारी बदक चाळीत प्रत्येक सण साजरा करण्याची वेगवेगळी तऱ्हा होती. त्यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लाऊडस्पीकरवरून चालणारी गाणी. जुनी गाणी सतत वाजायची आणि आमच्या कानी पडायची. त्यामुळे त्या गाण्यांचे शब्दच नाही, तर दोन कडव्यांमधलं संगीतही अगदी मनात कोरलं गेलंय. याचा फायदा मला आवाज की दुनिया’, ‘अमृतलता’, ‘मधुरबालावगैरे कार्यक्रम करताना झाला.


हे संस्कार तुमच्या बरोबरच्या प्रत्येकावरच झाले असतील. पण मग अशोक हांडे, चौरंग आणि एकापेक्षा एक यश संपादन करणारे अनेक कार्यक्रम हा सिलसिला कसा सुरू झाला?

अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण या संस्कारांबरोबरच चिकित्सक शाळेत मी नाटकंही करायचो. रुपारेल कॉलेजमधून एकांकिका केल्या होत्या. कॉलेजच्या एनएसएस युनिटचा प्रमुख म्हणूनही मी जबाबदारी सांभाळली होती. त्या वेळी इंटरला असताना मंगल वाचनात दुर्गाबाई भागवतांचा महाराष्ट्राची दगडी शीरनावाचा धडा होता. त्याचबरोबर शि. म. परांजपे यांचा खरं सोनंहा धडाही होता. या दोन धडय़ांवरून मला पसायदान ते कसाईदानची कल्पना सुचली. त्यावेळी पु. लं.चा तीन पैशांचा तमाशाजोरात चालू होता आणि त्यात हे कसाईदान होतं. त्यातून मी ते उचललं आणि १९७७मध्ये रुपारेल कॉलेजच्या एनएसएस युनिटसाठी हा कार्यक्रम पहिल्यांदा सादर केला. तो सगळ्यांना खूपच आवडला. मग त्याच वर्षी कॉलेज डेलाही तो केला. मी १९८०मध्ये मुलुंडला राहायला आलो. तिथे आम्ही संस्था मुलुंडया संस्थेतर्फे तो मुलुंडमध्ये केला. मग विरंगुळा म्हणून गणपतीत वगैरे तो होतच राहिला. पुढे ३० एप्रिल १९८७मध्ये नाटय़दर्पण रजनीया कार्यक्रमात पसायदान ते कसाईदानआम्ही सादर केला. त्या वेळी एका वर्तमानपत्रात असं छापून आलं होतं की, यंदाच्या नाटय़दर्पण रजनीचं एकमेव फलित म्हणजे अशोक हांडे आणि त्याचा पसायदान ते कसाईदानहा कार्यक्रम. तर त्यानंतर आम्ही हा कार्यक्रम व्यावसायिक मंचावर आणण्याचं ठरवलं. त्यासाठी ७ ऑगस्ट १९८७ रोजी चौरंगनावाची संस्था स्थापन केली आणि पसायदान ते कसाईदानचा मंगलगाणी दंगलगाणीझाला.


आझादी ५०करताना भारताच्या स्वातंत्र्याची पन्नास वर्षे, हीच कल्पना डोक्यात होती का?

तसंच काही नाही. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने एखादा कार्यक्रम केला जावा, अशी इच्छा कोलकातामधील एका संस्थेने व्यक्त केली होती. त्यामुळे आम्ही तो कार्यक्रम हाती घेतला. पण या कार्यक्रमाची बीजं खूप लहानपणीच मनात रोवली गेली होती. मी चौथीत असताना आम्हाला शिंदे नावाचे सर शिकवायला होते. ते नेहमी एक कविता म्हणून दाखवायचे. 
गजनी, घोरी, गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद, लोदी
सुलतान वेशी राज्य मिळविले, दिल्लीची गादी
ही कविता मनात घर करून बसली होती. आझादी ५०करताना या कवितेची खूपच मदत झाली. 


हात घालेल त्या कार्यक्रमात चौरंगने तुफान यश मिळवलं. पण त्यामागे अशोक हांडे नावाच्या कलाकारासह त्यात दडलेला व्यावसायिक आणि व्यवस्थापकही होता. हा व्यवस्थापक कसा घडला?

याला सर्वात मुख्य कारण म्हणजे आमचा परंपरागत आंब्यांचा धंदा. या आंब्यांनी मला व्यवसायाचा रस पाजला. लहानपणापासून वडिलांबरोबर आम्ही या धंद्यात भाग घेतला होता. त्यांनीच आम्हाला धंदा कसा करावा, याचं प्राथमिक शिक्षण दिलं. मग पुढे आम्हीही अनुभवातून शिकत गेलो. तर माझ्यातला व्यावसायिक हा कदाचित त्या जीन्स्मधून घडला असावा. पण व्यवस्थापक मात्र मी स्वत: घडवला. कॉलेजमध्ये असताना माझ्या प्रत्येक एकांकिकेचं प्रॉडक्शन कंट्रोल नेहमी मीच केलं आहे. मुलुंडमधील आमच्या संस्थेचं व्यवस्थापनही मीच केलं होतं. सुरुवातीला मंगलगाणी दंगलगाणीफार चालला नाही. पण आम्ही लंडनचा दौरा करून आल्यावर इथेही तो कार्यक्रम धो धो चालायला लागला. आमचे पहिले तीनशे-चारशे प्रयोग रिकामेच गेले होते. पण माझ्यातल्या व्यवस्थापकाने आणि व्यावसायिकाने हार मानली नाही. तसंच या आंब्याच्या धंद्यामुळे मी खूप फिरलो. त्याचाही फायदा मला दौरे आखताना झाला.


तुमच्या प्रत्येक कार्यक्रमापाठी एक तरी कथा आहे. त्याबाबत काही सांगाल का?

उगाच करायचा म्हणून मी कधीच कार्यक्रम केला नाही. त्या कार्यक्रमाला काही तरी हेतू हवा. तो नसेल, तर मग त्याला काही अर्थच राहत नाही. लताजींचा अमृतमहोत्सव झाला, तेव्हा एका वाहिनीवर त्यांच्या गाण्यांचा रिमिक्स कार्यक्रम सादर झाला होता. मला तो प्रचंड खटकला आणि त्याबाबत संतापही आला. एका महान गायिकेचा अमृत महोत्सव अशा प्रकारे साजरा व्हावा, याची खंत बोचत होती. त्यातूनच अमृतलतासमोर आला. माणिक वर्मा या शास्त्रीय आणि भावगीत हे दोन्ही प्रकार गाणाऱ्या माझ्या मते एकमेव गायिका. त्यांच्या मृत्यूनंतर भारती आचरेकर यांनी माझ्याकडे माणिक वर्मावर एखादा कार्यक्रम करावा, अशी विनंती केली होती. त्यातून माणिकमोतीतयार झाला. तीच कहाणी गंगा-यमुनाया कार्यक्रमाची. आपल्याकडे रुपेरी पडद्याला पडलेलं सर्वात सुंदर स्वप्नयाच नजरेने मधुबालाकडे बघितलं जातं. पण त्या सौंदर्यवतीला आयुष्यात खूप सोसावं लागलं. ते सर्व मी मधुरबालाच्या रूपात मांडलं. यशवंतया कार्यक्रमात तर यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याची संधी मिळाली.


पण तुमचा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे मराठी बाणा’. तर हा बाणानेमका कसा तयार झाला?

आम्ही नवीन शतकाच्या स्वागतासाठी सांगलीत स्वागत-२०००हा कार्यक्रम केला होता. त्यात गेल्या शतकात सांगलीचं नाव मोठं करणाऱ्या सांगलीच्या सुपुत्रांचा आढावा घेतला होता. त्या वेळी सांस्कृतिक आणि सांगीतिक क्षेत्रात भलंमोठं योगदान देणारे अनेक कलाकार आणि त्यांची कला समोर आली. त्या निमित्ताने इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. हा कार्यक्रम नंतर २२ ऑक्टोबरला गगनगिरी महाराजांच्या आश्रमात झाला होता. त्या वेळी तर लोक अक्षरश: बेभान झाले आणि त्याच वेळी आम्ही हा कार्यक्रम एका नव्या नावाने व्यावसायिक स्वरूपात आणायचं ठरवलं. नाव ठरलं, ‘मराठी बाणा’. विचार करा, २२ ऑक्टोबरला आम्ही हा कार्यक्रम करायचं ठरवलं आणि त्याचा पहिला प्रयोग अक्षरश: दहा दिवसांत मी दीनानाथ नाटय़मंदिरात १ नोव्हेंबर रोजी केला.


या यशात कलाकारांचा आणि चौरंगशी संबंधित सर्वाचाच वाटा असेल ना? मग हे कलाकार नेमके कसे निवडलेत आणि सांभाळलेत?

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या चौरंगमध्ये पंक्तिभेद अजिबात नाही. सांगायचा मुद्दा म्हणजे, सर्वाना सारखी वागणूक मिळते. दौऱ्याच्या वेळी मी जे खातो तेच माझे कलाकारही खातात. तसंच आमच्याकडे चार बसेस आणि चार टेम्पो आहेत. सगळे कलाकार व्यवस्थित झोपून जातात आणि कपडेपट, सेट वगैरेही अगदी व्यवस्थित पोहोचतात. चौरंगसाठी काम करणं, म्हणजे जास्तीत जास्त कार्यक्रम आणि कमीत कमी त्रास, हे कलाकारांना माहीत झालं आहे. त्यामुळे कलाकार आमच्याकडे अगदी आवर्जून काम करत असतात.


पंचवीस वर्षांची यशस्वी वाटचाल आणि एकापेक्षा एक दणकेबाज कार्यक्रम यानंतर आता चौरंगकाय घेऊन येणार आहे?

सुनील गावस्कर नेहमी सेन्चुरी केली की नव्याने गार्ड घ्यायचा. त्याचप्रमाणे आम्हीही आता पुन्हा एकदा गार्ड घेणार आहोत. आमचे सध्याचे कार्यक्रमच एवढे तुफान चालू आहेत की, सध्या तरी नवीन असं काहीच करत नाही. पण लवकरच आम्ही प्रेक्षकांसाठी नवीन कल्पनेवर आधारित कार्यक्रम नक्कीच घेऊन येऊ.  



1 comment:

  1. छान माहिती मिळाली.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates