बागडोगरा विमातळ |
बागडोगरा विमातळावर
विमान उतरत होतं, खाली हिरवागार प्रदेश दृष्टीस पडत होता. चहाच्या बागा असाव्यात,पण
तो गर्द हिरवेपणा पाहाता पाहाता विमानाने धावपट्टीवर हलकेच चाकं टेकवली. वर जाताना
आकाशात भरारी घेण वैगेरे आपण म्हणतो पण जमिनीला पाय लागणं किंवा पाय जमिनीवर असणं
किती महत्वाचं असतं ते आकाशात उंच गेल्याशिवाय कळत नाही. बागडोगरा हे नाव आपण सहसा
ऎकलेलं नसतं. प. बंगाल राज्यातल्या दार्जिलिंग जिल्ह्यातला हा विमान तळ लष्कराचा
असला तरी नागरी विमान तिथे उतरू दिली जातात. पुढे हे विमान असम राज्यात गोहाटीला
जायचं होतं. मागे गोहाटीला जाताना आम्हाला प्रथम गोहाटीला उतरवून त्यावेळचं विमान नंतर
बागडोगराला गेलं होतं. एवढ्या दूरवर येवूनही विमान आणखी पुढे जाणार आणि पुन्हा ते
उतरणार ते आपल्याच देशात असा विचार मनात आला आणि आपला भारत देश खरच खंडप्राय
असल्याचा अभिमान वाटायला लागला.
आपल्या
देशातील महानगरं सोडली तर इरत ठिकाणची विमानतळं गजबजलेली नसतात. आलेल्या विमानातून
उतरलेले प्रवासी तेवढेच बाहेर विखूरले जातात आणि पुन्हा सगळा परिसर सामसूम होवून
जातो. आम्ही ताजे तवाने होईपर्यंत सहप्रवासी निघून गेले होते. आमची वाट पाहत
असलेल्या बाहेरच्या वाहनात बसून आम्हीही निघालो आणि थोड्याच वेळात शहरातली वाट संपवून मोकळ्या प्रदेशात आलो.
सभोवताली चहाच्या बागा, मार्च महिना असल्याने प्रसन्न करणारी हवा आणि हसरे सोबती
यामुळे प्रवास मजेत चालला होता. वाटेत एक
नक्षलबारीला जाणारी बस दिसली. म्हणजे नक्षलवादी चळवळीचं मुळ असलेला प्रदेश जवळच
होता तर. नक्षलवाद, त्या वरचे उपाय, आदिवासी त्यांचे प्रश्न, तळागाळातल्या लोकांना
न जुमानणारी आपल्या देशातली शासन यंत्रणा, झोटींगशाहीचं प्रतीक बनलेली प. बंगालची
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बद्दल अनेक विचार मनात येत गेले. अशावेळी आपण नजरेने
एक बघत असतो आणि मन भलतीकडेच भटकत राहातं, तसच काहीसं होत होतं. प्रवासात हे एक
बरं असतं. दुसरं काहीच करत नसलो तरी आपण स्थळकाळाचं बंधन नसलेले विचार करू शकतो.
एकाच दिशेने अखंड प्रवास सुरू असला की मग ती
विचारांची साखळीही लांब लांब होत जाते. तीन साडेतीन तासांचा प्रवास
असल्याने ती प्रक्रिया चालूच राहिली. जलपायगुडीचा मैलाचा दगड दिसला. रल्वेने आलो
असतो तर इथपर्यंत आलो असतो. रस्त्याला समांतर असे रल्वेचे रुळ दिसायला लागले. तिस्ता
नदीवरचा पूल लागला. मग जंगल सुरू झालं. वाटेत एका ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबलो,
मोठा कप भरून चहा मिळाला पण चव यथातथाच होती. तिथलो लोक पचकवणी पण भरपूर चहा
पिणारे आहेत.
सकाळपासून
हजारो कि.मी. प्रवासहोवूनही तो अजून संपला नव्हता. गाडी बाहेरचं दृष थकवा दूर करत
होतं. आता अंधारून यायला लागलं. उत्तर-पुर्वेकडचा हा भाग असल्याने तिथे लवकर काळोख
होतो. तशातच खड्डे असलेला अत्यंत खडबडीत असा रस्ता लागला. पुढचे दहा किलोमिटर हा
असाच रस्ता आहे ड्रायव्हर विनोदने पुस्ती जोडली. चला तेवढाच पाळण्यात बसल्याचा
आनंद. प्रवासात हा असा ऍटीट्युड ठेवावाच लागतो. नाहीतर तो प्रवास आणखी कंटाळवाणा
होतो. काही लोक तर या आधीचे कष्टप्रद झालेले प्रवास पुन्हा पुन्हा आठवून दु:खात भर
घालून घेतात.
कितपर्यंत
पोहोचलात? ड्रायव्हरला पुन्हा पुन्हा फोन येत होता. आत्मा आणि आणखी काही मंडळी
भूतानच्या प्रवेशद्वारवरच्या फुन्तशोलींग या गावात आधीच पोहोचली होती. थोड्याच
वेळात आम्हीही पोहोचलो. प्रवेश प्रक्रिया पुर्ण करून ‘नामग्ये’ या हॉटेल मध्ये पोहोचलो. आपल्यापेक्षा त्यांची घड्याळं
अर्धा तास पुढे होती. तेवढा एक फरक सोडला
तर अजून आपला देश सोडल्याची जाणीव होत नव्हती. नामग्ये हॉटेल मधली ती संध्याकाळ
मात्र उत्साहवर्धक होती. माझा मित्र आत्मा सलीम या आमच्या तिथल्या
व्यवस्थापकाबरोबर मराठीत बोलत होता ते ऎकून मी चक्रावलो होतो. या माणसाकडे अशी
माणसं कशीबुवा आकर्शीत होतात? सहलीला अशा गोड धक्क्याने सुरूवात झाली होती.
No comments:
Post a Comment