29 September, 2009

गावचा दसरा




दसरा म्हणजे उत्साह, आनंद, जल्लोष. मुंबईतला दसरा म्हटला म्हणजे गरबा, दांडीया आणि रामलीला पण मला दसरा आठवतो तो गावचा. नवरात्रात रोज एक माळ या प्रमाणे नऊ माळा देवघरात, देवळात बांधल्या जायच्या. ललीतापंचमीचा उत्सव तर आमच्या घरातच होतो, माझ्या लहानपणी ललीतापंच्या दिवशी रात्र जागवली जायची. भजनं, किर्तन, लळीत व्हायचं. अष्टमी पासून तर धमाल असायची. अष्टमीला शाळेत सरस्वती पुजन, खंडेनवमीला शस्त्रांची पुजा म्हणून खोरं,कुदळ,पाटी या सर्वांचीच पुजा व्हायची. विजयादशमीला गावच्या देवळात सगळा गाव जमायचा. तरंग आणले जायचे. ते गावातील वेगवेगळ्या देवळात फिरवून मग रवळनाथाच्या देवळात ठेवले जायचे.

हे तरंग मला खुप आवडतात. नवनवीन साड्या नेसवून त्यांची मिरवणूक निघायची तेव्हा ती पाहाण्यासारखी असायची. एक एक खांब खांद्यावर घेवून जाणारे त्या दिवशी हिरो असायचे. ढोल वाजवत ही मिरवणूक जायची तेव्हा गावातल्या प्रत्येक देवळाजवळ थांबायची. थांबली असताना त्यातल्या एकावर देवाचं वारं यायचं. हू.. हू.. करून तो घुमू लागला की सगळेजण गोल उभे राहून ते पहात असत. काहीजण त्याला आपल्या अडीअडचणी विचारत आणि अंगात आलेला माणूस त्याची उत्तरं द्यायचा. लोक त्याला देव समजूनच प्रश्न विचारायचे. अजूनही विचारतात. ह्ल्ली बरीच वर्षं दसर्‍याला गावी जाणं झालं नाही. तरी पण दसरा म्हटला की नजरे समोर तेच दृष्य येतं.

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates