29 April, 2010

घर चिमणीचं


आम्ही जेव्हा सांताकृझला राहायला आलो तेव्हा पहाटे जाग यायची ती चिमण्यांच्या चिवचिवाटाने आणि पक्षांच्या किलबिलाटाने. गेल्या दहा-अकरा वर्षात तो आवाज हळूहळू कमी-कमी होत गेला आणि आता चिमणी शोधूनही सापडत नाही. कावळे आणि कबुतरं तेवढी आहेत. मधूनच दिसणारा एखादा पक्षी सोडला तर समस्त पक्षीगणांनी आमच्याकडे पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षापर्यंत कलकलाट करणार्‍या मैनासुद्धा आता दिशेनाश्या झाल्या आहेत. समोरच्या झाडावर बसून आपल्या उच्चरवाने लक्ष वेधून घेणारे पोपटही आता अभावानेच दिसतात. या सगळ्यांच्या सहवासाने आम्ही खरच आनंदीत व्हायचो, ते सगळे पक्षी आम्हाला सोडून कुठे गेले? का गेले? मोबाईलच्या जाळ्यामुळे त्यांची संख्या रोडावली की वाढत्या प्रदुषणामुळे? या सगळ्यावर उपाय काय? वृत्तपत्रात चिमणीच्या घरट्याविषयी वाचलं होतं, नुकतच महेंद्र कुलकर्णींनी आपल्या ब्लॉगवर चिमणीच्या घराविषयी चांगलं पोस्ट लिहीलय. म्हटलं चला आपण प्रयत्न करून बघूया.


ऋचाची परिक्षा संपली आणि आता सुट्टी सुरू झाली ती संधी साधून आम्ही दोघांनी चिऊताईसाठी घर बनवायला घेतलं. साधनांची जमवाजमव केली. ऋचाला वाटलं आता झटक्यात घर बनवून होईल. पण कसचं काय. प्लाय कापता कापताच नाकी नऊ आले. पण आम्ही हट्टालाच पेटलो (बरं झालं त्या धर्माने ऋचाला श्रमाचं मोल कळलं. मी असले धंदे बर्‍याच वेळा केले असल्याने मला ते आधीच माहीत होतं.) शेवटी एकदाच ते घर आकाराला आलं. गॅलरीत त्याची स्थापना झाली. समोर पाणी ठेवलं, आता बघूया चिमणी कधी प्रसन्न होते ते.

चिमण्यांचा निवारा आपण माणसांनीच उध्वस्त केला आहे. आता त्यांच्यासाठी घर बांधलं तर त्या परत येतील अशी आशा करूया.              
         


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates