पहिल्या लडाख सफरीत लडाखला पोचल्यावर दुसर्याच दिवशी आत्माराम परब हे वेगळंच रसायन आहे हे आम्हा मित्रांच्या लक्षात आलं. बरोबर आलेल्या प्रत्येकाला सहलीचा पुरेपूर आनंद घेता आला पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. सहलीत कबूल केलेली ठिकाणं सोडून कितीतरी जास्त देण्याचा त्यांचा प्रयत्न पाहून आम्ही चकीत झालो होतो. बोलता बोलता आम्ही सांगून टाकलं की “आम्ही दिलेले पैसे फिटले, आता आमच्याकडून तुम्ही हवं ते काम करून घ्या.” मग शेवटच्या दिवसापर्यंत ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असंच सगळं चालू होतं. श्रीनगरला शेवटच्या दिवशी आता ही सफर संपणार आणि आपले पाय पुन्हा जमिनीवर येणार म्हणून मन खट्टू झालं. पण माझ्या बाबतीत असं व्हायचं नव्हतं, त्या सहलीच्या शेवटालाच माझी एक अनोखी सफर सुरू व्हायची होती.
लडाखहून परत आलो आणि चार-दोन दिवसातच आत्माराम परबांचा फोन आला. काहीतरी कारण काढून त्यानी भेटूया म्हणून सांगितलं, भेटलो. जबरदस्त इच्छाशक्ती आणि अपार उत्साह असलेला हा माणूस अगदी प्रत्येक भेटीत मनाला भिडत गेला. कुठलीही गोष्ट ‘केली’ न म्हणता ‘झाली’ म्हणणारा, मैत्रीला जागणारा, नफा-नुकसानाचा विचार न करता झोकून देणारा, कुणालाही अगदी कुणालाही; बिनधास्त भेटणारा असा हा ‘आत्मा’ आत्तापर्यंत माझ्यासाठी आत्मारम परब होता. पण एका दिवशी बोलता बोलता त्याने “मला माझे सगळे मित्र ‘आत्मा’म्हणून हाक मारतात, तेव्हा तुम्हीही आत्माच म्हणा” असं म्हणाला. मी ऐकून न ऐकल्यासारखं केलं पण त्याने हट्ट सोडला नाही आणि मग तो माझ्यासाठीही ‘आत्मा’ झाला. अशी माणसं नशीबात असावी लागतात. आत्माशी मैत्रं जुळलं आणि जीवनातल्या एका नव्या अध्यायाला सुरूवात झाली. त्याच्या पोतडीतून कधी काय बाहेर येईल याचा नेम नाही. कोरोना काळातही लडाख, अजंठा-वेरूळ-औरंगाबाद, बारा मोटेची विहिर, दोनदा कोकण या ठिकाणी त्याने उचलून नेलंच. पण त्याधी अनेक सहलींवर अनेकदा नेलं. घासून घासून टूर लिडर बनवलं. गेल्या पंधरा वर्षात माझ्या परिघाच्याबाहेर नेवून त्या बाहेरची दुनिया दाखवली.
या आधीच्या पोस्टमध्ये त्याचा आत्माराम परब असा उल्लेख केला त्याकर फेसबूक वर त्याने अभिप्राय दिला तो असा:
प्रत्येक
क्षण डोळ्यासमोरुन जात आहे. किती तरी वेगळी आव्हान होती त्यावेळी पण खूप मजा
यायची. कारण सोबतचे पर्यटक सुद्धा त्या आव्हानं कडे एक अनुभव म्हणूनच बघत होते
त्यामुळे सर्वच काही सोपं वाटायचं. 2003 मध्ये इशा टुर्स केल्यापासून साधारण 2009
पर्यंत इशा टुर्स मध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची थेट संपर्क होता. आणि
तोपर्यंत सहलीला येणारी मंडळी मला "आत्मा" या नावाने हाक देत होती. पुढे
त्याचं आत्माजी, आत्मारामजी, सर अशी
बरीच विशेषण लागली जी मला आवडत नाहीत.
Narendra Prabhu च्या या लिखाणामुळे ते पुन्हा
अनुभवण्याचा आनंद घेतो आहे
आणखी एक प्रसंग: एकदा असेच आम्ही लडाखची दमछाक करणारी टूर संपवून मुंबईत परतलो. मी घरी आलो आंघोळ केली आणि मोबाईल पहातो तर हा घरी न जाता विमानतळावरून थेट मित्रांना भेटायला गेला होता, निमित्त होतं ‘मैत्री’ दिवसाचं. कसं जमतं हे याला. त्याचे ते फोटो पाहून मी चक्रावून गेलो. मनाला काही भिडलं, भावलं की कविता सुचते तशी ती तेव्हाही सुचली:
नरेंद्र प्रभू०२/०८/२०१५
एकदा असेच आम्ही पुण्याला जायला निघालो, वाटेत मला पिकअप करून गाडी सुरू करताना आत्मा काही तरी शोधायला लागला. फोन करून एक रिंग दिली आणि चला... म्हणून गाडी सुरू केली. मग मी विचारलं काय झालं? तर म्हणाला मोबाईला हरवला बहुतेक. लोणावळ्याला फुड मॉलवर मी म्हटलं, अरे मोबाईल हरवला आणि तू एवढा शांत कसा? तर म्हणाला वैतागून तो कसा मिळणार? मिळायचा असेल तर मिळेलही.
अनेक अतर्क्य, अशक्य वाटणार्या कितीतरी गोष्टी या माणसाने लिलया केल्या आहेत, त्यातल्या अनेक ‘लडाख प्रवास अजून सुरू आहे...’ आणि ‘हे प्रवासी गीत माझे‘ या दोन पुस्तकात लिहिल्या आहेत, ती पुस्तकं जरूर वाचावीत अशी विनंती आहे.
भाग
१: मुक्काम तर येणारच
भाग २: ‘क्यामेरा’ क्या तेरा
भाग ३: जागेपणीचं स्वप्न
भाग ४: स्वर्गारोहण
भाग ५: पचेल तेच खावं
भाग ६: ब्रो
भाग ७: सीमा रक्षक
भाग ८: युटी (Union Territory) अच्छा है?
भाग ९: ‘आत्मा’ रंगी रंगलो
No comments:
Post a Comment