द्रास युद्ध स्मारक |
द्रास येथील युद्ध स्मारकाला पहिली भेट |
लडाखच्या मॉलरोडवर गप्पा करत चालत असताना दोन सैनिकांनी आम्हाला थांबवलं आणि कुठून आलात अशी चौकशी केली. मुंबई असं सांगितलं तेव्हा त्यानी हात मिळवून बोलायला सुरूवात केली. ते नाशिक आणि सांगलीचे होते. पाचेक मिनिटांचा तो संवाद कायम आठवत राहातो. आपल्या कुटूंबापासून हजारो मैल दूरवर सीमेवर पहारा देणार्या सैनिकांना आपल्या घराची तर आठवण येतेच पण मातृभाषेत बोलाणारा भेटला की किती बोलू आणि किती नको असं होतं. २००७ साली लडाखमधून फोन लावणं हे एक दिव्य असायचं. एक तर समोरच्याला बोलणं उशीरा ऐकू यायचं किंवा पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसरा विचारल्यावर मिळायचं. अशा परिस्थितीत सैनिक आपल्या माणसाशी बोलायला फार आसावलेले असायचे. त्या चार-पाच वर्षात ईशा टूर्सने सैनिकांना भेटण्याचे अनेक कार्यक्रम आखले आणि तो सिलसिला आजपर्यंत कायम आहे. मग कारगील विजय दिन, रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन सोहळा अशा दिवसांचं औचित्य साधून सहली नेणं, सैनिकांशी संवाद साधणं असे कार्यक्रम सुरू झाले.
लडाख सहलीत द्रास येथील युद्ध स्मारकाला भेट देणं हा एक भावूक क्षण असतो. तोलोलींग टेकड्याच्या पार्श्वभूमीवर डौलाने फडकणारा तिरंगा, शहीद स्मारक, कॅप्टन मनोज पांडे गॅलरी, विजय स्मारकाचा परिसर, दूरवर दिसणारी टायगर हिल, कॅप्टन विक्रम बात्रा पॉईंट हे सर्व पहाताना मन हेलावून जातं आणि अभिमानाने उर भरून येतो. द्रास युद्ध स्मारकाला दिलेली प्रत्येक भेट वेगळी असते. खास नमूद करण्यासारख्या दोन भेटी म्हणजे जुलै २००७ आणि ऑगष्ट २०१० ची. २६ जुलै २००७ ला आम्ही लेह-कारगील असं करत द्रास येथील युद्ध स्मारकाजवळ पोहोचलो तेव्हा तिथे मिलिटरी पोलिसांनी गाडी उभी करायलाही मनाई केली. नाइलाजाने आम्हाला निघावं लागलं, स्मारकापासून दोन किलोमिटरवर शे-दिडशे जवान दिसले म्हणून गाडी थांबवली तर ते ही त्या दिवशीच्या सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी म्हणून श्रीनगरहून अधिकृतरीत्या आले होते, पण त्यानाही थोडा उशीर झाला म्हणून पुढे जायला मज्जाव करण्यात आला होता. मग आम्ही तिथेच सैनिकांची भेट घेतली. साधारण आर्ध्या-पाऊण तासाने वॉर मेमोरीयलवरून निरोप आला आणि ते तिकडे जायला निघाले, त्यांच्या मागोमाग आम्ही पुन्हा मागे गेलो, आता मात्र आम्हाला प्रवेश देण्यात आला आणि फळांचा रस देऊन स्वागतही केलं गेलं.
ऑगष्ट २०१० मध्ये वॉर मेमोरीयलजवळ पोचायलाच रात्रीचे १० वाजून गेले होते. त्या काळोखातही आम्ही तिथे गाड्या थांबवल्या आणि फक्त दर्शन घेवून निघतो म्हटलं. तिथल्या प्रमूख लष्करी अधिकार्यापर्यंत निरोप पोचला आणि आम्हाला पाच मिनीटं थांबायाला सांगण्यात आलं. संपूर्ण वॉर मेमोरीयलला वीज पुरवठा करणारे जनरेटर सुरू करण्यात आले. सगळा परीसर प्रकाशला आणि मग सर्वांनी मनसोक्त पहाणी केली.
भाग
१: मुक्काम तर येणारच
भाग २: ‘क्यामेरा’ क्या तेरा
भाग ३: जागेपणीचं स्वप्न
भाग ४: स्वर्गारोहण
भाग ५: पचेल तेच खावं
भाग ६: ब्रो
भाग ७: सीमा रक्षक
No comments:
Post a Comment