14 July, 2021

जागेपणीचं स्वप्न




कितीही अंधार दाटला तरी उजाडायचं रहात नाही. एका खळाळत्या प्रवाहाच्या बाजूला आमची बस थांबली होती. डोळ्यावर झोप आरूढ असल्याने मंडळी अजून पेंगतच होती. “चला चहाला उतरणार का?” आत्माराम परबांचा आग्रहाचा प्रश्न आला आणि डोळे किलकिले करून पाहिलं पण बाहेर पावसाळी वातावरण असल्याने किती वाजले असतील याचा अंदाज येत नव्हता. वेग कमी झाला आणि थांबावं लागलं तर आपण हालचाल केली पाहिजे; म्हणून आळोखेपिळोखे देत उठलो. हळू हळू सगळेच खाली उतरले. झोंबणारी पावसाळी थंडी आणि हवेतला ताजेपणा मरगळ दूर करता झाला, चहाची चुसकी अधिकच बहार आणून गेली. निर्झर, झाडं आणि झुडूपं हे मला नवीन नसलं तरी इथला नजारा वेगळाच होता. हिमालयाची मजा काही औरच आहे. सुचीपर्णी वृक्षांची गर्दी पाहिली आणि देवभूमीत आल्याचा आनंद वाटायला लागला.

कालच्या त्या वयोवृद्ध बाई एकट्याच उभ्या दिसल्या. आता मात्र यांना कुठेतरी पाहिल्याचा भास झाला. मग लक्षात आलं की याना प्रदर्शनातच पाहिलं होतं. इतर टूर कंपन्यांनी त्याना वयाचा विचार करून लडाखला न्यायला नकार दिला होता आणि “तुम्ही मला न्याल का? माझ्या एका पायाला चालताना त्रास होतो.” असं त्या तिथे आत्मारामना विचारत होत्या, हे ही आठवलं. जोखिम पत्करून आत्मारामनी त्याना टूरवर आणलं होतं आणि त्याही जिद्दीने एकट्याच आल्या होत्या. एवढं असून कालच्या त्या प्रसंगाने त्याना एकटं पाडलं होतं. “चहा झाला का? हवं तर आणखी एक घ्या” मी त्याना बोलतं करण्याचा प्रयत्न म्हणून म्हटलं. “नको चहा आणखी नको, किती छान आहे ना सगळं?” त्यांनी सभोवार पाहात म्हटलं. एक निर्मळ हास्य केलं. एवढंच पुरे असं मनात म्हणून मी दूर झालो. चाहाचा मुक्काम हलला आणि गाडीने पुन्हा वेग घेतला.

थोड्याच वेळात कुल्लूला आलो आता तासाभरात मनालीला पोचणार असं वाटलं. वेडीवाकड्या वळाणांचा रस्ता, एका बाजूला पहाड, दुसर्‍या बाजूला रोरावत जाणारी व्यास नदी आणि पावसाळी कुंद, थंड हवा, रस्त्याच्या दुतर्फा सफरचंदांनी लगडलेली झाडं, अनेकरंगी टपोरी फुलं झेलत डोलणारी फुलझाडं, पावसात आसरा शोधणारी चिमणी पाखरं, दोन डोळे किती पहाणार? आत्मारामनी बसच्या केबिनमध्ये बोलावलं मग पुढचा प्रवास तिथे बसूनच केला. पुढे झालेल्या लाडाची ही सुरूवात होती. वेळेचं भान विसरून निसर्गात रमून गेलो होतो, तोंडातून अवाक्षर न काढता न्याहाळणं चालू होतं. मनाली यायची तेव्हा आलीच. 

न्याहारी आणि थोड्या विश्रांतीनंतर मनालीच्या मॉल रोडवर आत्माराम आम्हाला घेवून गेले. पावसाची रिपरीप चालूच होती, इथेच एवढी थंडी तर वर काय असेल? म्हणून सगळ्यानीच गरम कपड्यांची खरेदी केली. मध्येच कोडॅकचं दुकान लागलं तिकडे आत्माराम दिसले. 

हॉटेलमध्ये आल्यावर पाहिलं तर आत्माराम त्या बाबांना Kodak KB 10 नवा कोरा कॅमेरा देताना दिसले. आत्मारामनी त्या बाबांचा विरस आणि बाईंचं ओशाळलेपण दोघावरही स्वत:चा  खिसा हलका करून उपाय केला होता. त्याची चर्चाही वेगवेगळ्या प्रकारे होत राहिली. 

हिडींबा मंदीर, मनू मंदीर, वशिष्ट मंदीर आणि गरम पाण्याचं कुंड हे पावसातच केलं आणि सोलॉन्ग व्हाली पावसात सो... लॉन्ग असल्याने तिकडे ना फिरकताही तो दिवसा साजरा झाला. दुसर्‍या दिवशीची सकाळ लख्ख उन्हात न्हावून निघाला होती आणि काल दुरून पाहिलेला रोहतांग पास आता जवळ येणार होता. खरं तर त्याही पलिकडे आपण जाणार आहोत म्हणून आम्ही खुप उत्सूक झालो होतो. विधीवत नारळ वाढवून प्रवासाला सुरूवात झाली. तेव्हा माहित नव्हतं ही वाट सरावाची होणार आहे. आयुष्यात एखाद्या वाटेवर पाऊल पडतं आणि मग तीच वाट कधी कधी पायाखालची होवून जाते. हिमालयात फिरण्यासारखं दुसरं सुख नाही. क्रमशा...


कसे जुळाले बंध कळेना 
तुरा एकेक सफरीचा 
कुणास ठावूक कुठल्या वाटा
वेध घेती हृदयाचा 











1 comment:

  1. मस्त लेख, मनालीच्या आठवणी ताज्या झाल्या.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates