‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी म्हण आहे. खरं तर ती रोज रडगाणं गाणार्याकडे कुणी लक्ष देत नाही अशाअर्थी आहे. पण आपल्या मुंबईत लोकलखाली रोजच कुणी ना क़ुणी येत असतं आणि वर्दीतल्या माणसांच्या बेफिकीरीमुळे त्यातल्या बहुतेकजणांचे प्राण जातात. नुकताच असाच एक तरूण छत्रपती शिवाजी टर्मिनसवर अपघातग्रस्त स्थितीत पडून होता. आजूबाजूची गर्दी त्याला पाहून हळहळत होती पण त्याच्या मदतीला नेहमीप्रमाणे कुणीच येत नव्हतं. वर्दीवाले आले नाहीत पण त्या गर्दीत असलेल्या चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्याच्या मदतीसाठी धाव घेतली आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं. त्या तरूणाचे वडील येईपर्यंत थांबून त्या जखमी तरूणाला धीर तर दिलाच पण आपल्या मुलाला पाहून मूर्च्छित पडलेल्या वडीलांना आधाराचा हात दिला.
काळाचौकी तेथे रहाणारा अनिकेष कदम हा तरूण त्या दिवशी धावत्या लोकलमधून धक्कालागून पडला होता आणि त्याला तत्काळ मदत करणारे युवक होते जे.जे. कला महाविद्यालयात शिकणारे सुशांत वायदांडे, कुणाल पाटील, चेतन नेहते, मयूर गुलदगड आणि धवल मंगरूळकर. या सर्व युवकांचं अभिनंदन आणि त्यांच्या संवेदनशीलतेला सलाम ! तसच अशी सकारात्मक बातमी देणार्या लोकसत्ताच्या कैलास कोरडे यांना धन्यवाद.
खरंच! हल्ली रस्त्यात कोणी पडलं असेल तर कोणीही ढुंकून सुद्धा बघत नाही. जो तो आपल्याच घाईत असतो. पूर्वी जरा काही झालं तर गर्दी गोळा व्हायची व लोक मदत करायला पुढे यायचे. पण हल्ली लोक ’मला काय त्याचे’ असे म्हणून सहज पुढे जातात. या चार मुलांनी त्याला मदत केली ही अजूनही माणुसकी शिल्लक आहे ह्याचेच द्योतक आहे. त्यांनी जर त्याला मदत केली नसती तर तो किती वेळ तसाच पडून राहिला असता. एखादे वेळेस हे जिवावरही बेतू शकते. ही ’मला काय त्याचे’ ही वृत्ती वाढीस लागली आहे. तरीही वरील घटनेवरून सगळेच असे कोरडे नाहीत हे बघून खूप बरे वाटते.
ReplyDelete