मराठी, हिंदी, इंग्रजी आशा भाषा (लॅंग्वेज) बोलल्यावर
कित्येकवेळा समोरच्याला त्याचा अर्थबोध होतोच असं नाही, पण सद्ध्या माझ्याशी ज्या
भाषेत हा माणूस बोलतोय ती भाषा कुणाही भाषीक इसमाला (किंवा इसमीला) सहज समजेल यात शंकाच
नाही. या माणसाच्या शरिरात किती नटबोल्ट किंवा खटके असतील देव जाणे. सारखा आपला
वेगवेगळ्या तर्हेवाईक मुद्रा करून हा आपलं म्हणणं मांडत असतो. दरवाजा उघडला हे
दाखवताना प्रत्यंचा ओढल्याचा अविर्भाव असतो तर, वायर सोडली हे सांगताना तो धनुष्यातून जणू बाणच सोडतो. ड्रॉवरमध्ये हात
अडकेल हे सांगताना तो कासाराने बांगड्या भरल्याचा देखावा उभा करतो, तर मागे जायला
होईल असं म्हणताना रंगमंचावरचा पडदा ओढल्यासारखा मागे वाकतो. हा खरंच तिथे
रंगमंचावरच हवा होता. त्या सोफ्यावर बसून बघा किती रिलॅक्स वाटतं हे पटवताना याने
सुखीमाणसाचा सदरा घालून आल्याचा भास होतो.
गेल्या कित्येक वर्षात असा कलाकार रंगमंचाविना पहायला
मिळाला नाव्हता. त्या दिवशी अगदी तळाचा ड्राव्हर असा उघडला जाईल हे दाखवताना तो
असा काय वाकला आणि मागे सरला कि मला वाटलं एखादा हत्ती नदीकाठी हळूवार पाय रोवून
प्रवाहातलं पाणी पितोय. ....इथे ग्रानाईटवर आरामात पडून संगीत ऎकता येईल असं
म्हणता म्हणता तो चक्क आडवा झाला. डुलकी लागली
तर आपटायला होईल असं म्हणत असताना त्याने एक हिसका मारला आणि मग म्हणाला
इथे मोल्डींगपट्टी लावतो. रस्त्याने
चालताना असे काही हावभाव असतात की बाबुराव जणू दिवाणखान्यात उभे राहून गप्पा हाणताहेत. अंगावर पडेल असं दाखवताना हा जणू अदनान सामी
बनतो, अहो कुणालाही बघून वाटेल की ‘हमको
भी लिप्ट करादो’ म्हणतोय. वस्तू इथून उचलली, इथे ठेवली असं त्याने म्हटल्यावर मला
बापू वाणी भजी अलगद तेलात सोडयचा त्याची आठवण झाली. एखादा कसलेला नर्तकही एवढी
सफाईदार हालचाल करू शकेल की नाही अशी शंका यावी. मोबाईलवरचं बोलणं संपवताना तो
एवढ्यावेळा बाय.. बाय अशा अर्थाचं पुटपुटतो की मला शंका यायला लागते.... हा मोबाईल
कंपनीचा एजंट आहे की काय, थांबता थांबत नाही तो; आता मी सावध असतो; पटकन फोन कट
करतो, काय सांगाव उद्या बाय.. बाय नंतर बाबू.. बाबू म्हणेल.
टिव्हीच्याखाली बसायची बैठक नको असं सांगताना त्याने हवेतच
अशी काय माकडबैठक मारली की मी लोटपोट होता होता वाचलो. (वाचलो म्हणजे, जर माझं हसू
बाहेर फुटलं असतं तर त्याने हे काम सोडून द्यायला मागे पुढे पाहिलं नसतं.) मात्र
समोरच्या नियोजित बैठक व्यवस्थेवर तो बेहद्द खुश होता, “इथे कसं छान वाटेल” असं
म्हणत त्याने शेषशायी विष्णूचं रुप धारण केलं. त्याच्या त्या रुपाला मी मनोमन
साष्टांग प्रणीपात केला. हे वर केलं, ते खाली केलं असं म्हणत असताना तो जणू
वेटलिप्टींग करतोय की काय असं वाटत रहातं.
कामाला थोडा उशीरच होतो आहे अशी नाराजी मी प्रगट केल्यावर
त्याचं रुप पार पालटून गेलं. कितीतरी वेळ फक्त हातवारे करीत घालवल्यावर मग म्हणाला
“आपलं चालेंज आहे, एवढं फास्ट काम कुणी करून दिलं तर” आणि मग हातवार्यांबरोबर
पायवारेही सुरू झाले.
स्टडी टेबलला कि बोर्डचा ड्राव्हर लावला की काय होणार हे
सांगताना तो हवेतल्या खुर्चीवर बसला आणि त्याने सफाईदारपणे बाजाची पेटी वाजवली,
जणू काय डबलबारीचं भजनच चाललय. कि बोर्डवर असा कुणाचाच हात चालला नसेल महाराजा!
कार्य स्थळावरचा त्याचा पदन्यास तर हा एव्हाना माझ्यासाठी
खरोखर न चुकवण्यासारखा भाग झालाय, इतका की हा निघून गेल्यावर मी कुणाकडे बघू असं
होवून जाईल.
पण एवढ्या सढळ हालचाली करणारा हा विरार लोकल मध्ये कसा उभा
राहू शकतो? तिथे त्याला बॉडी हालवायलासुद्धा मिळत नसणार, मग तीची 'लॅंग्वेज' ही दूर की बार. तो तिथे काय करत असेल? खरच कोडं आहे.
No comments:
Post a Comment