बोरीवलीच्या वन विहारमध्ये पोहोचल्यावर आनंदाची अनुभूती
घेण्यासाठी जमलेल्या अनेकजणात मी ही सामील झालो. बोरीवली सांस्कृतीक केंद्राने संस्कार
भारती आणि पोट्रेट आर्ट ग्रुपच्या सहयोगाने आयोजित केलेल्या आर्ट फेस्टिवलचा हा
जंगी कार्यक्रम होता. माजी महापौर विनोद घेडीया यांच्या कल्पक नेतृत्वाखाली साकार
झालेल्या वन विहारात अनेक चित्रकार चित्र काढण्याचा आनंद घेत होते आणि माझ्यासारखे
अनेक त्याच्या फुकट आस्वाद घेत होते.
एखादी कलाकृती साकार होताना पहाण्यात जी मजा आहे त्याला
उपमा नाही. कोर्या कागदावर हळूहळू साकार होत जाणारं समोरचच दृष्य पाहताना त्या
चित्रकाराची त्याच्या कुंचल्यावर असलेली हुकमत जाणवत होती. चित्रकला ही
सादरीकरणाचीही कला आहे, चित्र तयार होत असताना पाहिलं म्हणजे त्या कलाकाराची त्या
मागची तपस्या लक्षात येते. चित्रकार शरद तावडे
नारळाचं छोटं झाड साकार करताना वापरत असलेले ब्रश, रंग, त्यांचे फटकारे हे सगळं
चित्राच्या वेगळ्याच दुनियेची सफर घडवत होतं.
वीस-पंचवीस चित्रकार चित्रकारीतेचं सादरीकरण करीत होते आणि
त्यांच्याबाजूला घोळका करून कलारसिक त्याचा आस्वाद घेत होते. दुपारी सुप्रसिद्ध
चित्रकार विजय आचरेकर यांनी ‘पोर्ट्रेट पेंटीगचं’ प्रात्यक्षिक सादर केलं आणि
सगळेच हरखुन गेले. चौथ्या-पाचव्याच फटकार्याला समोर बसलेल्या मॉडेलचा चेहरा कागदावर
बोलका झाला. हळूहळू त्यात रंग भरत गेले आणि ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ म्हणजे
काय याचा अनुभव
आला. दरम्यान चित्रकार वासुदेव कामत चित्र, चित्रकार आचरेकर
यांच्या विषयी बोलत होते. सगळं कसं अनौपचारीक होतं आणि मनमोहकही. पोर्ट्रेट साकार
झालं आणि मग चित्रकाराशी गप्पाही रंगल्या. त्या समारंभाचं आणखी एक वैशिष्ट्य
म्हणजे सगळेच जमिनीवर होते, श्रोते तर असणारच पण कलाकारही होते, हे विशेष !
अजून त्या सोहळ्याचा कळसाध्याय बाकी होता. सुप्रसिद्ध
चित्रकार आणि संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री. वासुदेव कामत त्यांच्या ‘मोगरा
फुलला’ या चित्रमालिकेवरचा ‘स्लाईड शो’ दाखवणार होते. पारल्याच्या लोकमान्य सेवा
संघात दहा मिनीटं ते चित्रांवर बोलले होते तेव्हापासून मला त्याना ऎकायचं होतं. आज
तो योग जुळून येणार होता. वासुदेवजींनी दाखवलेली पहिली स्लाईड पाहिली आणि मन भरून
आलं आणि त्या सगळ्या स्लाईड आणि त्याबरोबर चाललेलं वासुदेव कामतांचं निरुपण म्हणजे
मणीकांचन योग होता. एखादा कलाकार बहुआयामी असतो म्हणजे काय ते तेव्हा कळलं. चित्रकलेत
अगाठलेली उंची त्याना जगमान्यता द्यायला पुरेशी आहे, पण ते तेवढेच चांगले निरुपण
करू शकतात हे तेव्हा समजलं. सारंच वातावरण भारून टाकल्यासारखं झालं होतं.
भारतातील संतांवर वासुदेव कामतानी केलेल्या ‘मोगरा फुलला’ या
चित्रमालिकेत संत ज्ञानदेव ते संत विनोबा भावे यांच्या जीवनातील उत्कट प्रसंगाना
कॅनव्हासवर चित्रबध्द केलं आहे. शेवटच्या चित्रातली “देवाचा तुमच्यावर विश्वास
आहे, काही हरकत?” हे लिहिलेली पाटी तर षटकार मारून गेली. अनेक
संत रचनांचा नव्याने अर्थ लागत होता. चित्रांमागचा भाव कळत होता. त्यासाठी चित्रकाराने केलेल्या अभ्यासाची व्याप्ती दिसून
येत होती. एक कलाकार किती तन्मयतेने चित्रं काढतो आणि तेवढ्याच लिनतेने त्याचं
सादरीकरण करतो. सगळेजण मंत्रमुग्ध होवून ऎकत होते, पहात होते. नंतर दाखवलेल्या
चित्रफितीत वासुदेव कामतानी वाजवलेली बासरी त्यांच ‘वासुदेव’ हे नाव किती सार्थ
आहे त्याच द्योतक होत. एकूण काय त्या जवळजवळ बारा तासात आत्मानंदी टाळी लागली होती
खरी.
No comments:
Post a Comment