23 February, 2019

प्रेरणास्रोत आप्पा परब



आज आप्पा परबांच्या लग्नाला ५० वर्षं झाली. सह्य मित्रांनी नेटका सोहळा आयोजित केला. आप्पा परब..., कोकणच्या भूमीचा हा पुत्र आपल्या कर्मभूमी मुंबईत कार्यरत असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि सह्याद्रीला विसरला नाहीच पण त्या महर्षीने हजारो तरुणांना सह्यकड्याचं वेड लावलं. मी आणि माझं एवढ्यापूरतं संकुचीत झालेलं तरूणमन आभाळाएवढं झालं पाहिजे तर त्याने आपल्या इतिहासाबरोबरच सह्याद्री पालथा घातला पाहिजे. आप्पानी तो वसा आयुष्यभर सांभाळला आणि आता शेकडो सह्यमित्र तो पुढे चालवत आहेत.


असाच सह्याद्रीच्या कुशीत रमणारा आत्माराम परब हा जिप्सी आता वेगाने जगभर भ्रमंती करतो आहे. सुनिल, उषा, स्वप्नील, सागर सारखी मित्रमंडळी आपापल्या क्षेत्रात व्यग्र असूनही शनीवारी रात्री शेवटची लोकल पकडून कर्जतला जातात आणि पहाटे-पहाटे गड-किल्ल्यांची वाट धरतात. मुंबईत राहून नोकरी, व्यवसाय, घर सांभाळून आठवड्याचा एकच सुट्टीचा दिवस दर्‍या-डोंगरात व्यतीत करणं सोप काम नाही. येड्यागबाळ्याचे काम नाही. हे करण्यासाठी जी एक प्रेरणा हवी असते ती मला वाटतं आप्पा परबांनी त्यांच्याठायी निर्माण केली.

आप्पांचा एक चेला आत्माराम परब मी जवळून अनुभवला आहे. निधडी छाती, निर्णय घेण्याची धडाडी, उपजत परोपकाराची वृत्ती, माणसं जोडण्याची हातोटी आणि स्वछंदीपणा हे त्याचे गुण या सह्यप्रवासातच जोपासले गेले असावेत. इतरांच्या जीवनाचा प्रवास सुगंधीत करणारी आप्पांसारखी माणसं हा आपल्या समाजाचा ठेवा आहे. आई-आप्पांना दिर्घायुरोग्य लाभो अशी इश्वर चरणी प्रार्थना. सह्यमित्रांनी हा समयोचीत सोहळा आयोजित केला म्हणून त्यांचं अभिनंदन.  

नरेंद्र प्रभू             



No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates