वसंतात येते फुलांना झळाळी
तुझी याद ही दाटली रे उरी
जरी मोगर्याचा उल्हास आहे
कशी सांज मी ही करू साजरी?
ग्रीष्मात शोधू कुठे मी विसावा
कसा ताप सोसू तू नसता असा?
असा रंध्ररंध्रातूनी घाम बरसे
रीता घट पाण्याहूनी ना पसा
विसरून गेलास पाऊस सारा
दिसेना किनारा मला पारखा
तुझ्या रुपगंधात न्हावू कशी रे
कुठे हात शोधू तुझ्यासारखा?
वैरीण झाली अशी रात्र का रे
शिंपून जातो शरद चांदणे
आकाश सारे तुला वाहिले मी
नसे चंद्र माझा असे वागणे
तशी साथ हेमंत आता न देई
सुके वैखरी गीत गाता तुझे
धुके दाटले रे असे हे सभोवती
खरे होऊदे भास हे रे तुझे
पानात पाऊल माझेच वाजे
शिशिरासवे गान गाऊ कसे?
वार्यात थंडी असे दाटलेली
उबदार मिठी तुझी ती नसे
२७/०४/२०१६
नरेंद्र प्रभू
No comments:
Post a Comment