27 April, 2016

ई-भटक्यांच्या जगात



आज दि. २७ एप्रिल २०१६ च्या लोकसत्ता दैनिकात लोकभ्रमंतीमध्ये माझा ई-भटक्यांच्या जगात हा लेख प्रसिद्ध झाला आहे.     

प्रवासवर्णनाच्या पुस्तकांची मराठीत खूप मोठी परंपरा आहे. पण आठ-दहा वर्षांत ब्लॉगच्या माध्यमातून अनेकविध प्रवासवर्णनं इंटरनेटवर, तीदेखील मराठीतून उपलब्ध झाली आहेत. या ई-भटकंतीचा हा थोडक्यात धांडोळा..



साचलेपणा घालवण्यासाठी फिरणं जरुरीचं आहेच, पण पुन:प्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी मात्र त्या आठवणींची साठवण करणंही क्रमप्राप्त आहे. सफरीवर जाऊन आल्यानंतर पूर्वी त्या सहलीच्या फोटोंचे अल्बम बनवले जात असत. हे अल्बममधले फोटो मग आठवणींना उजाळा देत राहण्याचं काम करतात. क्वचितप्रसंगी त्या प्रसंगाची नोंद डायरीमध्ये व्हायची. कधी कधी त्याला पुस्तकाचं रूप मिळत असे. मात्र हा सगळा ठेवा हातासरशी असणं खूप महत्त्वाचं असतं. इंटरनेटमुळे मात्र ते एकदमच सोयीचं झालंय असं म्हणावं लागेल. युनिकोडच्या सुविधेमुळे हे सारं मराठीतून मिळायला लागून आठ नऊ र्वष होऊनही गेली.

माहितीचं महाजाल याही बाबतीत आपली मदत करायला हजर झालं. गुगलड्राइव्हवर आता आपल्याला हवी ती माहिती साठवून ठेवता येते. त्यामध्ये फोटो, फाइल्स, गाणी असे अनेक प्रकार अगदी सहजच साठवता येतात. पण ही माहिती फक्त आपणास किंवा आपण ज्यांना अधिकृत केलं आहे अशांनाच वापरता येते. आपण काढलेले फोटो किंवा लिहिलेला मजकूर इतर कुणालाही वाचण्या, ऐकण्यासाठी उपलब्ध करून द्यायचा तर त्याकरिता महाजालावर ब्लॉगची सोय उपलब्ध आहेच. गुगल किंवा याहूने ब्लॉगस्पॉट किंवा वर्डप्रेसच्या माध्यमामधून अगदी फुकट म्हणावी, अशी ही सोय उपलब्ध करून दिली आणि जगातल्या सर्व भाषांमधले नेटिझन्स या माध्यमाचा वापर करू लागले. आपली मराठीही त्या बाबतीत पुढे आहेच. अनेक विषयांबरोबरच पर्यटन किंवा प्रवास वर्णन या सदराखाली लेख आणि छायाचित्रांची नोंद माहितीच्या महाजालात होऊ लागली आणि संपूर्ण जगातले मराठी बांधव त्याचा घरबसल्या आस्वाद घेऊ लागले. अनेक प्रवासवेडय़ा भटक्यांची सफरीची दैनंदिनी छायाचित्रांसहित वाचल्यावर अनेकांना सफरीवर जाण्याचे वेध लागू लागले. अनेक साहसी सफरींचा लेखाजोखा मग नेमाने येऊ लागला आणि तत्परतेने त्याचं स्वागतही होऊ लागलं. एखाद्या ठिकाणी कसं जावं, कधी जावं, काय काय अडचणी येऊ शकतात, जाण्यायेण्याचा मार्ग याचं छायाचित्रांसहित वर्णन ब्लॉगवर उपलब्ध झालं आणि ब्लॉगर आणि पर्यटक यांच्यामध्ये एक सेतू बांधला गेला.

रोहन चौधरी हा असाच एक भटक्या. त्याच्या ब्लॉगवर त्यानेच म्हटल्याप्रमाणे स्वत:च्या देशाच्या इतिहासाप्रमाणे त्याच्या भूगोलावरही उदंड प्रेम करणाऱ्या एका सामान्य भटक्याची भ्रमणगाथात्याने सादर केली आहे. सिक्कीम या देशाच्या ईशान्येकडील राज्यात भटकंतीला जायच्या तयारीपासून ती सफर पूर्ण होईपर्यंतचा सगळा वृतांत या ब्लॉगवर मिळतो. रोहनने ब्लॉगवर लिहिलेला लडाखचा सफरनामाही वाचनीय आहे आणि त्या संपूर्ण सफरीचा व्हिडीओ वृत्तांतही त्याने यूटय़ुबवर ठेवला आहे. रोहनच्याच माझी सह्य़भ्रमंतीया ब्लॉगवर सह्य़ाद्रीत काय करावं लागतं तरहे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा महाबळेश्वर नव्हे. नुसतं डोंगर चढणं आहे. रान तुडवणं आहे. स्वत:चं अंथरूण-पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडावं लागतं. तिथं असतो भराट वारा. असतं कळा कळा तापणारं ऊन. असतात मोकाट डोंगरदरे. पण हे आव्हान असतं जिद्दीला. पुरुषार्थाला..!’’ गोनिदांच्या शब्दातला हा थरार ज्या वेडय़ांनी अनुभवलाय त्यांचंच हे स्वानुभव कथन आहे.

संकेत पाटेकर या सह्य़वेडय़ानेही त्याच्या ब्लॉगवर सह्य़ाद्रीच्या कडेकपारी धुंडाळताना त्यांचा घेतलेला आढावा स्तिमित करणारा आहे. सह्य़ाद्रीचा सचित्र असा आढवाच यातून हाती लागतो. तर सरदेसाईज या ब्लॉगवर पिर्ड रॉक्सची अप्रतिम छायाचित्रं पाहायला मिळतात. मॅकिनॉव आयलंड, सूलॉक्स, टकमिनॉव फॉल्स व पिर्ड रॉक्स या सफरीविषयीची माहिती आणि मुख्यत्वाने छायाचित्रं इथे पाहता येतात. सहजच या ब्लॉगवर खाडी देशातील भटकंती, तिथले लोक, इमारती याची महिती आणि छायाचित्रं पाहता येतात. भुंगा या ब्लॉगवर महाराष्ट्रातील विविध ठिकाणांचा धांडोळा घेतलेला दिसते. धुवाधार पावसात झिम्माड होताना टिपलेली छायाचित्रं ही या ब्लॉगची आणखी एक जमेची बाजू आहे.

पंकज झरेकर या छायाचित्रकाराचा ब्लॉग म्हणजे छायाचित्रांची मेजवानी आहे. स्वर्गीय साल्हेर, मुळशी धरण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर, ताम्हणी घाट, रतन गड, धुक्यातले अप्रतिम फोटो हे या ब्लॉगचं खास वैशिष्टय़ आहे. त्याचजोडीला लडाखची रमणीय अशी भटकंती आपणास वाचायला मिळते. तर अमित कुलकर्णीच्या ब्लॉगवरदेखील अशीच छायाचित्रत्रिय भटकंती करता येते. मिसळपावच्या एका खास धागा भटकंतीला वाहिलेला आहे. नुकताच त्यांनी महिला दिन २०१६ निमित्त अनाहिता भटकंती विशेषांकही सादर केला आहे. या ब्लॉगवर लंडन, अमेरिका, जपान ते थेट रत्नागिरी अशा देश-विदेशातील अनेक पर्यटनस्थळांविषयी महत्त्वपूर्ण माहितीचा खजिना रिता केला आहे.

प्रभुनरेंद्र या ब्लॉगवर अंदमान, भूतान, लेह-लडाख, अरुणाचल आसाम, मेघालय, काल्पा, कैलास-मानसरोवर, गोवा, दादरा नगर-हवेली, नारकांडा, नुब्रा व्हॅली, सराहन, सांगला, नारकांडा, हॉर्नबिल फेस्टिव्हल नागालॅण्ड अशा अनेक अनवटवाटांवरचे गेल्या सात-आठ वर्षांत लिहिलेले ११५ हून अधिक लेख आणि छायाचित्रं पाहता येतील.

भटकंती करतानाची खाद्ययात्रा हा आणखी एक आवडीचा विषय. काही भटके ठिकठिकाणची खाद्यपरंपरा नेमकी टिपतात. त्यापैकी एक म्हणजे महेंद्र कुलकर्णी यांचा काय वाट्टेल तेहा ब्लॉग. या ब्लॉगवर खाद्ययात्रा या गटात महाराष्ट्रातील काही शहरांतील खाद्ययात्रेचा अनुभव घेता येतो. भटकंती करताना हे असं निवडक काही खायचं असेल तर जरूर भेट द्यायला हवी. याच ब्लॉगवर प्रवासवर्णन या गटात महाराष्ट्र, गोवा, गुजरात भटकंतीची वर्णन तर आहेतच पण जोडीला प्रवासातील अडचणींवरील काही अनुभव मार्गदर्शक ठरणारे आहेत.

गेल्या काही वर्षांत मात्र या ब्लॉगर भटकंतीला काहीशी ओहोटी लागली असं म्हणावं लागले. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर त्वरित अपलोड केलेले फोटो आणि चार ओळींची माहिती असं स्वरूप याला येत गेलं आहे. फेसबुकवर पटापट मिळणारे लाइक्स जरी तुमचा उत्साह वाढवत असले तरी त्यातून दस्तावेजीकरण कमीच होतं असं म्हणावं लागेल. मुख्यत: गुगलच्या माध्यमातून तुम्ही जर एखाद्या ठिकाणाची माहिती शोधायचा प्रयत्न करत असाल तर तुलनेने फेसबुकवरील माहिती हाती लागणं जरा अवघडच असतं. पण ब्लॉगवर संबंधित लेखांना टॅगिंग केलेले असल्यामुळे ते सहज सापडतात. त्यामुळे किमान आपली फेसबुकवरची माहिती ब्लॉगवर टाकली तरी इतरांसाठी ती फायदेशीर ठरू शकते.


नरेंद्र प्रभू – enpee2004@gmail.com

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates