16 September, 2009

देवाचा हप्ता


अगं आज परिक्षा ना ? १०० मार्कांचा पेपर आहे देवाला नमस्कार कर..सकाळच्या घाईत धावपळ करणार्‍या एका आईची मुलीला सुचना. मुलीने देवाला राम राम केला.

देवा पुढे क्षणभर शांत उभं राहून त्याला मनोभावे नमस्कार करायला आजकाल कोणालाच वेळ नाही. पण त्याच बरोबर देवाचे आशिर्वाद मात्र पाहिजे असतात. मग काय कशासाठीना कशासाठी धावत आसलेले आपण तो उपचार आटोपून घेतो. त्याच्या तर्‍हा तरी किती. जाता जाता साईबाबाची मुर्ती दिसली की गंधाची टिकली लावल्या सारखं मधलं बोट डोक्यावर लावून दुसर्‍याच क्षणी नजर फिरवून चालू लागणं, किंवा अदाब केल्या सारखं करून त्याला दाखवून द्यायचं बघ, हा तुझ्याकडे माझं लक्ष आहे. काहीजण तर फुटपाथवर ठेवलेल्या दान पेटीत टेलिफोन बिलाचा धनादेश टाकल्या सारखे एक-दोन रूपयाचं नाणं टाकत निघून जातात. फोर्टला सी.टी.ओ. समोरच्या फुटपाथवर एका छोट्या देव्हार्‍यात साईबाबाची मुर्ती ठेवून तो देव्हारा झाडाला टांगलेला आहे. तिथे भर गर्दीत काही जण चप्पल काढल्यासारखं करून डोकं टेकून उभे असतात. त्याना धक्के देत इतर जात असतात. एक शिवी हासडून पुन्हा मन एकाग्र करण्याच्या प्रयत्नात मस्टर चुकतं. नमस्कार करणार्‍याना देऊळ सदृश काहीही दिसलं तरी ते नतमस्तक होतात. चर्चगेट जवळच्या पारशी बावडी समोरही कैकजण सिग्नल पडेपर्यंत वाकलेले मी पाहिले आहेत. शनिवारच्या दिवशी मारूतीचा वार असल्याने त्याच्या पोटावरचा शेंदुर बोटाला आणि मग डोक्याला लावणारे मारूतीरायाला आपादमस्तक न्याहाळायला विसरून गेलेले असतात.

तात्पर्य काय ‘ देव अंतरात आहे ‘ हेच आपण विसरून गेलो आहोत. ते विसरलेल्यांसाठी देऊळ निर्माण केलं गेलं, जिथे जाऊन क्षणभर शांत व्हायला आपल्याला आता वेळ नाही. कोप नको म्हणून हप्ता देणं चालू आहे. चला मला सुद्धा नेटवर virtual पुजा करूदे.


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates