प्रज्ञा क्रिएशनच्या ‘शोध तथागत बुध्दांच्या पदचिन्हांचा......’
या माहितीपटाचा
प्रकाशन सोहळा संपन्न
डॉ. प्रेमानंद रामाणी यांचं स्वागत करताना निर्माता-दिग्दर्शक विजय मुडशिंगीकर |
प्रज्ञा क्रिएशनच्या ‘शोध
तथागत बुध्दांच्या पदचिन्हांचा’ या माहितीपटाचा प्रकाशन सोहळा नुकताच सुप्रसिद्ध
न्युरो-स्पायनल तज्ज्ञ डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या हस्ते झाला. यावेळी सिद्धार्थ
कांबळे (अध्यक्ष मुंबई जिल्हा सहकारी बॅंक) आणि जेष्ठ साहित्यिक वामण होवाळ हे
प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
देशभर फिरून आपल्या
छायाचित्रांच्या माध्यमातून गंगा नदीच्या प्रदुषणाचा मुद्दा मांडणारे सुप्रसिद्ध
छायाचित्रकार विजय मुडशिंगीकर यानी भारत, नेपाळ आणि श्रीलंका असा बुद्धभुमीचा
प्रवास करून हा माहितीपट दिग्दर्शित केला असून निर्मिती ‘प्रज्ञा
क्रिएशन’ ने केली आहे. स्वप्निल शेटे या तरुण कलाकाराने
चित्रिकरण आणि सहदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. एकाच वेळी मराठी, हिंदी आणि
इंग्रजी या तीन भाषांमध्ये सादर माहितीपटाचं प्रकाशन या प्रसंगी करण्यात आलं.
तुडूंब भरलेल्या थिएटरमध्ये अतिशय
भावपुर्ण वातावरणात हा सोहळा साजरा झाला. उपस्थितांच स्वागत आणि हा माहितीपट
पुर्णत्वाला नेणार्या चमूचं अभिनंदन केल्यानंतर डॉ. प्रेमानंद रामाणी यांचं मोलाचं
मार्गदर्शन या प्रसंगी लाभलं. समाजातील समस्यांवर नेमकं बोट ठेवताना आज गौतम
बुध्दाच्या शांती आणि प्रज्ञा या मार्गाचं किती महत्व आहे हे त्यानी विषद केलं. भारतिय
संकृती आणि विचार हे जगाला मार्गदर्शक ठरत असताना आपण मात्र त्यापासून दूर जात
आहोत आणि नेमक्या याच वेळी विजय मुडशिंगीकर यांनी बुद्धाचा जीवन प्रवास ज्या ज्या
भागातून झाला तो मार्ग जनसामान्यासमोर आणला आहे हे फार महत्वाचं आहे असे
गौरवोत्गार या प्रसंगी डॉक्टर रामाणी साहेबांनी काढले. या वेळी बोलताना मुंबई जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सिद्धार्थ
कांबळे म्हणाले की हा महितीपट उत्तम तर आहेच पण स्वत:चं राहतं घर गहाण ठेऊन विजय मुडशिंगीकरांनी हा उपक्रम तडीस नेला,
त्यासाठी बॅंकेने त्याना कर्ज दीलं. पुढील वाटचालीसाठी आता बॅंक त्यांच्यावर घर
गहाण ठेवायची पाळी येवू देणार नाही असं निसंदिग्ध आश्वासनही कांबळेसाहेबांनी दिलं.
मुडशिंगीकरांची सर्व धडपड प्रथम पासून पाहाणारे जेष्ठ साहित्यिक वामण होवाळ यांनी
हा चित्रपट तयार करतांना मुडशिंगीकर कुटूंबीयानी किती जिद्दीने साथ दिली त्याचे
दाखले दिले. सर्वच वक्त्यांनी या उपक्रमाचं कौतूक केलं आणि परिश्रमपुर्वक मनापासून
केलेल्या कामाचं आज चिज झाल्याची भावना व्यक्त केली. माझं कामच बोलतं मी काय बोलू आपण
हा माहितीपट पहा आणि कायते ठरवा असं म्हणताना स्वत: मुडशिंगीकर सदगदीत झाले तेव्हा संपुर्ण
सभागृहाने टाळ्यांच्या गजरात त्यांचं कौतूक केलं.
तथागत गौतम बुध्दांचा जन्म ते
महापरिनिर्वाणापर्यंतचा प्रवास ज्या ज्या ठिकाणी झाला त्या पैकी बहुतांश भागांचं
चित्रिकरण या महितीपटात करण्यात आलं आहे. नेपाळ मधील लुम्बिनी या बुद्धाच्या जन्मठिकाणापासून
सुरुवात झालेली ही यात्रा पुढे सारनाथ, राजगीर, नालंदा, श्रावस्ती, वैशाली,
संकिया, लेह-लडाख, कुशीनगर, सांची, अजिंठा
ही भारतातील ठिकाणं करून नंतर अनुराधापूर या श्रीलंकेतल्या ठिकाणापर्यंत
जाते. गेली सहा वर्ष अथक परिश्रम करून बौद्ध धम्माच्या विस्मयचकीत करणार्या प्रदीर्घ
प्रवासातील धम्म स्थळांचा नयनरम्य देखावा आणि माहिती या माहितीपटाव्दारे प्रज्ञा
किएशनने रसिकांसमोर आणली आहे. या सर्व ठिकाणांची अभ्यासपुर्ण माहिती सर्वांसमोर
यावी हा या माहितीपताचा उद्देश आहे.
पटकथेसाठी डॉ. आ. ह. साळूंके यांचं
तर स्थिर चित्रीकरणासाठी प्रकाश शेट्टी यांच मोलाचं सहकार्य लाभलं असून मधुकर
कांबळे, नरेन्द्र प्रभू आणि करुणा पंडीत यांचही योगदान या माहितीपटाला लाभलं आहे. प्रकाशनानंतर
लगेचच या माहितीपटाचं सादरीकरण करण्यात आलं. माहितीपट पाहिल्यानंतर सभागृहाने
मुडशिंगीकरांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आणि एक उत्तम कलाकृती सादर केल्याबद्दल
कृतज्ञता व्यक्त केली.
संपुर्ण मुडशिंगीकर कुटूंबीयानी
आणि मित्रपरिवाराने हा कार्यक्रम पारपाडण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं. दोन
डिव्हीडी स्वरुपात हा संच उपलब्ध असून अधिक माहिती करिता रोहन मुडशिंगीकर
२५७७५०७०/९४२२२१४३६८ यांच्याशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment