आपली समाजात किती इज्जत आहे,
किंबहुना असावी यासाठी सगळेचजण सजग असतात. आपल्या इज्जतीला धक्का लागू नये म्हणून
प्रयत्न करतात. जर एखद्याने सर्वांसमोर आपली अक्कल काढली किंवा घालूनपाडून बोलला
तर आपल्याला आपल्या इज्जतीचा फालूदा होतोय असं वाटून समोरच्याचा खिमा करण्याची
तिव्र इच्छा होते. घराण्याची इज्जत, मुलीची इज्जत, स्त्रीची इज्जत, हल्ली
लग्नाच्या बाजारात मुलाची इज्जत असे इज्जतीचे अनेक प्रकार आहेत. जो तो आपापल्या परीने
ती सांभाळण्याचा प्रयत्न करतो. एकूण काय प्रत्येकजण आपल्या समजानुसार आपल्या
इज्जतीला जपण्याचा प्रयत्न करतोच करतो.
अगदी लहानपणापासून घरी आई आणि
शाळेत शिक्षक आपल्याला कसं वागावं याचे धडे देत असतात आणि मुलं सर्वाथाने शहाणी
होवून आपला आणि आपल्या घराण्याचा पर्यायाने समाजाचा उत्कर्ष कसा होईल यासाठी प्रयत्न करीत असतात. मित्रहो...
नमनाला घडाभर पाणी ओतल्यावर मी आता इज्जतीवर येतो. त्याचं काय झालं आज पार्ल्यात
लोकमान्य सेवा संघाच्या पु.वि. भागवत गुंतवणूक
प्रबोधन केंद्रातर्फे श्रीमती हर्षला चांदोरकर (Sr. Vice President, CIBIL)
यांचं वैयक्तिक पत मानांकन (Credit Rating) या विषयावर व्याख्यान
होतं. फार आधीपासूनच तुमचं क्रेडीट किती आहे यावर तुमची इज्जत अवलंबून असते.
वाहन, घर कर्ज, क्रेडीट कार्ड इ.
कारणासाठी प्रत्येक व्यक्तीचं ‘पत मानांकन’
बॅंका किंवा संबंधीत संस्था तपासत असतात. तुम्हाला कर्ज किती मिळू शकतं हे
तपासताना बॅंक तुमचं क्रेडीट रेटींग किती आहे याचा दाखला मिळवते आणि नंतरच
कर्ज मंजूर करायच का? किती रक्कम द्यायची ? की कर्ज द्यायचंच नाही हे त्या
दाखल्यावरून ठरतं. कोण देतो हा दाखला?

सिबिलकडे पाचशे रुपये भरून तुम्ही
तुमचं मानांकन तपासू शकता. नोकरीला लागताना किंवा लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी असा
दाखला समोरच्याने मागितला तर आता नवल वाटायला नको. तेव्हा मित्रहो..., यह इज्जत का मामला है। सिबिल सगळं बघतंय, तेव्हा
इज्जतीला धक्का लागू देवू नका.
No comments:
Post a Comment