जगविख्यात चित्रकार
वासुदेव कामत यांचं ‘मर्यादा
पुरूषोत्तम’ हे चित्रप्रदर्शन १६१ बी, एम, जी रोड, जहांगीर आर्ट गॅलरी, काळा
घोडा, मुंबई ४०० ०२३ येथे माडलं जाणार आहे. हे प्रदर्शन दि. २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर
२०१४ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं
राहील.
‘रामायण’ हा सर्वच मानव जातीचा
श्रद्धेचा विषय राहीला आहे. याच रामायणातील काही प्रसंग कॅनव्हासवर चित्रीत करताना
त्यातील भाव आत्मसात करण्याचा प्रयत्न चित्रकाराने केला आहे. या विषयी बोलताना
चित्रकार वासुदेव कामत म्हणतात “परिस स्पर्शाने लोखंडाचं सोन होतं असं म्हणतात पण
मुळात परिस आहे का? हा जसा प्रश्न पडतो तसंच रामकथा हे वास्तव की कविकल्पना असा
विचार करीत बसण्यापेक्षा या कथेचं सार लक्षात घेवून त्यातून होणारे संस्कार खुप
महत्वाचे आहेत. रामलीला आणि ग.दि.मांचं ‘गीतरामायण’ यांनी बालपणापासून माझ्यावर
चांगले संस्कार केले आहेत आणि ती पुंजी आयुष्यभर पुरण्यासारखी आहे. त्यापासूनच
प्रेरणा घेवून ‘मर्यादा पुरूषोत्तम’ ही चित्रमाला रंगविण्याचा संकल्प
सिद्धिस नेला.”
आजवर अनेक
माध्यमातून रामायण सर्वांसमोर आलं आहे. यात आणखी काय भर घालणार असं वाटत असतानाच रामसेतू
उभारताना चिमुकल्या खारूताईचं जे योगदान होतं ते पाहून मला प्रेरणा मिळाली असं सांगताना
कामत म्हणतात की त्या खारीएवढंच योगदान देवून मी पूर्वसुरींच्या
साहित्य आणि कलाकृतींना जोडला जावू इछितो.
या प्रदर्शनात चित्रकार
वासुदेव कामत यांनी प्रेम, मैत्री, वचन, त्याग आणि दृढता अशा अनेक भावना व्यक्त
होणारी ‘रामदास हनुमान’, ‘राम-चंद्र दर्शन’, ‘जनक सूता सीता’, ‘अहल्या उद्धार’, ‘भरत
मिलाप’, ‘कपिसे उऋण हम नही’, ‘गुंफिते बदरी बिजांची तपमाला’, ‘भरत राज’ अशा अनेक
चित्रांची गुंफण केली आहे.
आज रावणालाही
लाजवेल अशा दुष्ट प्रवृत्ती माजल्या असून त्याचं निर्दालन करणारा राम आपल्या मनात
जागृत झाला तर तेच या प्रदर्शनाचं फलित असेल.
पौराणिक कथा
कॅनव्हासवर जिवंत होताना पाहण्याचा हा ऎतिहासिक क्षण रसिकांनी अनुभवण्यासारखा आहे.
No comments:
Post a Comment