संजय, महाभारतामुळे हा सगळ्यानाच माहित आहे. युद्धभूमीवर
काय चाललय याचं धावतं समालोचन हा करायचा आणि आंधळ्या दृतराष्ट्राच्या मन:चक्षूसमोर
युद्धाचे प्रसंग हुबेहूब उभे करायचा. मला वाटतं संजय या नावातच हा गुण असावा. आता
महाभारताच्या वेळची तपस्या या काळात कुणी करित नसल्याने त्याला दिव्य दृष्टी असणं
शक्य नसलं तरी झालेले प्रसंग हुबेहुब समोर उभं करण्यात या भारतातल्या संजयला
नक्कीच जमलं आहे.
या भारतातला हा संजय आमच्या मालवणचा. नेमकंच सांगायचं झालं तर
देवबागचा. हो देवांच्या बागेतलं हे फळ. हा माणूस तसा महाप्रतापी. त्याच्या एका
नसलेल्या हातावर जावू नका. एकदा असाच भेटला असताना त्याने नुसत्या छतीने जी धडक
मला दिलीय ती बापजन्मात विसरणं शक्य नाही. काय जोर होता महाराजा. मी पडता पडता
वाचलो.
देवबाग मध्ये थोडी सामंतांची घरं आणि बहुतांशी गाबीत,
म्हणजे मच्छीमार. कोकणात समुद्र किनारी सुशेगात असलेलं हे अप्रतिम गाव शाळेत
असताना मी पाहिलय. आता तुम्ही पाहता ते इथल्या पर्यटनामुळे. मच्छीमारी करून
उरलेल्या वेळात मोलमजुरी करणारा इथला कोळी समाज आपला उदरनिर्वाह करण्याएवढंच पदरी बाळगून
होता. अशीच कामाची घाई असताना एकदा संजयच्या हातातली लोखंडी शिग विजेच्या तारेला
लागली आणि क्षणार्धात तो आणि आणखी तीघेजण जखमी झाले. त्या तीघांना पणजीच्या
इस्पितळात दाखल केलं गेलं पण संजय पैशाअभावी घरीच राहिला. त्याला उपचाराअभावी
त्याचा उजवा हात गमवावा लागला तशी पायाची तीन बोटंही. या जबर धक्क्यानेच एखादा गळपटून
गेला असता. पण संजय उठून उभा राहिला. एक हात आणि अधू पायचीच साथ असतानाच त्याने
दर्यात होडी ढकलली आणि कामाला सुरूवात केली.
पर्यटकांना डॉल्फिनची सफर करवण्यासाठी आपली होडी बिनदिक्कत
समुद्रात घेवून जाणार्या या पठ्याला पाहात असताना आपल्याला जाणवतच नाही की याला
एकच हात आहे, एवढ्या सफायीदारपणे हा होडी हाकत असतो. तोंडाचा पट्टा चालू असतो आणि
रुबाब बघाल तर ‘समिंदराचा राजा’ असल्या सारखा.
दोन खोल्यांचा पर्यटकांसाठीचा निवास त्याने आपल्या घराशेजारी
बांधला होता. या पावसाळ्यात त्या खोल्या वाळूने भरून गेल्या, समुद्राचं पाणी खोल्यात
शिरलं. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला “तो आपली करामत करतलो,
आपण आपला काम करीत र्हव्हाक व्हया. समुद्रार रवाचा आसा मा मग ह्या होतालाच. काम
करुकच व्हया. फुकट गावाचा नाय. फुकट देणारे एकच आवस-बापूस. बाकी हो (समोरच्या
गणपतीकडे बोट दाखवून) सुद्धा म्हणता कष्ट कर; मगच गावतला. ”
संजाच्या डोळ्यात चमक आहे, विश्वास आहे, धमक आहे. तो पुर्ण
साकारात्मक विचाराचा आहे. देवबागची इतंभूत माहिती त्याच्याकडे आहे. कुठली जमिन
कुणी विकत घेतली आणि कुठे कुणाचं हॉटेल होतय, सगळं त्याला माहित आहे. काल-आज आणि उद्याचं
भान असलं तरी कोकणी स्वभावामुळे तो पण असाच भणंग राहिला आहे. हॉटेलवाले आणि
जमिनदार यांच्याशी त्याचे संबंध आहेत म्हणण्यापेक्षा त्यांनी आपल्या स्वार्थाकरीता
त्याच्याशी संबंध ठेवले आहेत. “भायली माणसा” देवबागात जमिनी घेतात म्हणून त्याचा
जीव तुटतो, “बंगाली सुद्धा इले” म्हणताना तो व्याकुळ होतो.
पण जमिनीवर त्याच काय? त्याचं साम्राज्य तिकडे दर्यावर, उसळत्या
लाटांवर स्वार होण्यासाठी प्रत्येक सकाळची वाट तो पहात असतो. त्याच्या नसलेल्या
हाताला आधार आहे तो त्या दर्याचा. प्रचंड उर्जा असलेला हा माणूस म्हणजे संजय मोंडकर (9421236398, 3823062231). देवबागला गेलात
की एकदा आजमावून पहा, कायमचा लक्षात राहिल.
नरेंद्रजी, जो माणूस परिस्थितीला शरण जात नाही त्या माणसाला परिस्थिती शरण जाते. आपण आशा माणसाची दखल घेतलीत हा आपला मोठेपणा. तिकडे आलो तर नक्की भेटेन.
ReplyDeleteखरं आहे.
ReplyDelete