30 September, 2014

अंगामी योध्ये



ईशान्य वार्ता या मासिकात आलेला माझा लेख :  

आसाम-मणिपुरमध्ये चहाच्या बागांमधल्या उत्पादनाकडे तत्कालीन ब्रिटीश सरकारचं लक्ष गेलं तेव्हा त्यानी तो भाग आपल्या अधिपत्याखाली घेण्याचं ठरवलं. सुनियोजित आराखडा आणि सैनिकी बळ यांचा वापर करून तो भाग आपल्या अधिकारात येईल आणि स्थानिक जनतेला चहाच्या मळ्यात कामगार म्हणून राबवता येईल हा ब्रिटीशांचा मानस मात्र इथे सहज यशस्वी झाला नाही. या सर्वाला कारण होते ते तिथले नागा योध्ये. वृत्तीने अत्यंत साधे असले तरी आपल्यावर परकी शासक अंमल करणार ही गोष्टच त्यांना मान्य नव्हती. ब्रिटीशांना मात्र हा भाग येणकेणप्रकारेण पादाक्रांत करायचाच होता.

आज आसाममधल्या गुवाहाटीपासून 340 कि.मी. अंतरावर असलेल्या अंगामीला जायला तेव्हा रस्ता नव्हता. एकदा का रस्ता तयार झाला म्हणजे या भागावर अधिपत्य गाजवता येईल हे ब्रिटीशाना माहित होतं. 1832 साली शेकडो शिपाई बरोबर घेवून जेव्हा ब्रिटीश अधिकारी मणिपूरला जायला निघाले तेव्हा तिथल्या प्रत्येक नागा खेड्यात त्यांना कमालीच्या आणि चिवट संघर्षाला तोंड द्यावं लागलं. पहिला प्रयत्न व्यर्थ गेल्यावर मणिपुरचे राजे गंभिर सिंह यांच्या मदतीने ब्रिटीशानी पुन्हा एकदा वर्चस्व स्थापित करण्याचे प्रयत्न केले. बरीच ताकद खर्च केल्यावर पोलिसचौकी स्थापित करण्यात ब्रिटीश यशस्वी झाले. परंतू काही महिन्यातच मिझोमा आणि खोनोमा जमातींनी त्या चौक्या जाळून टाकल्या. 1950 पर्यंत ब्रिटीशांनी अशा दहा मोहिमा राबवल्या. 1850 च्या हिवाळ्यात ब्रिटीशांनी पुन्हा एकदा पाचशे शिपायांसह नागा टेकड्यांवर हल्ला केला त्या वेळीही सोळा तास तीव्र संघर्ष करीत नागा विरांनी ब्रिटीशांना रोखून धरलं पण एका बाजूला बंदुका आणि दुसर्‍या बाजूला बाण आणि भाले यांच्या विषम लढाईत नागांना गाव सोडून माघार घ्यावी लागली. ब्रिटीशांनी मोकळ्या झालेल्या गांवामध्ये प्रवेश करून नागां लोकांच्या वस्त्या जाळून टाकल्या. मणिपुरच्या खिक्रूमा गावापर्यंत हा संघर्ष जेव्हा पोहोचला तेव्हा तिथल्या रहिवाशांनी जोरदार विरोध केला आणि सुमारे शंभरच्यावर गावकरी कामी आले. कोहीमापर्यंत हा सिलसिला सुरू होता. शेकडो नागा योध्ये कामी आले आणि ब्रिटीशांवरचे हल्ले सुरूच राहिले. शेवटी गव्हर्नर लॉर्ड डलहौसीने ही मोहीम थांबवण्याचं ठरवलं आणि तिथल्या पोलिस चौक्यांमधून शिपायी माघारी बोलावले.

स्थानिक नागा ज्या लोकांना ‘कंपनी मॅन’ म्हणून ओळखत त्या ब्रिटीशांना त्यानी आपल्या भूमीवर थारा दिला नाही. 1879 पुन्हा एकदा ब्रिटीशानी दिमंत या राजकीय अधिकार्‍याला सैनिकी सौरक्षणात नागा भूमीवर पाठवलं. अंगामी योध्यांनी त्या अधिकार्‍य़ा बरोबरच त्याच्या सोबत असलेल्या 39 सैनिकांना कंठस्नान घातलं आणि बाकिचे सैनिक जंगलात पळून गेले. पण याच सुमारास तिथे ख्रिश्चन मिशनर्‍यांनी यायला सुरूवात केली होती. नागा लोकांपैकी काहींना त्यांनी आपल्या धर्माची दिक्षा दिली होती तेच लोक मग ब्रिटीशांना हेरगिरीसाठी वापरता आले. असं असलं तरी शूर नागा लोकांनी संघर्ष सुरू ठेवला ब्रिटीशांनी पुन्हा माघार घेतली.

1880 मध्ये पुन्हा एकदा मोठ्या फौजफाट्यासह ब्रिगेडीयर जनरल जे.एल. नॅशनच्या नेतृत्वाखाली मणिपुरवर हल्ला केला गेला. नागा जनतेने दर्‍याखोर्‍यांचा आसरा घेवून गनिमी युद्ध चालू ठेवलं. ब्रिटीश सैनिकांनी कोहीमा गावाला आग लावून ते भस्मसात केलं. पण नागांचा संघर्ष चालूच होता. त्यानी ब्रिटीशांच्या ताब्यातील चहाच्या मळ्यांवर हल्ला चढवला आणि सोळा कामगारांसह मॅनेजरला ठार केलं. पण परतीच्या रस्त्यावर नॅशनने त्यांची कोंडी केली आणि अन्न पाण्याविना नागा लढवैयाना प्राण गमावण्याची पाळी आली. शेवटी नागांनी शस्त्र खाली ठेवली. नागांना जबर दंड ठोठावण्यात आला. सर्व शस्त्रात्रं काढून घेण्यात आली. त्याची शेतं आणि गावं जप्त करण्यात आली तसंच चहामळ्यांवर गुलाम म्हणून नेण्यात आलं. ब्रिटीशांनी विजय महोत्सव साजरा केला आणि गव्हर्नरला सगळा वृतांत तारेने कळवण्यात आला.

एवढ्या सगळ्या मोहिमानंतरही नागांचा संघर्ष सुरूच राहिला. आपल्या शेतात, दर्‍याखोर्‍यात वास्तव्य करून ते ब्रिटीशांना सळोकीपळो करून सोडत होते. या वेळी मात्र मिशनरी ब्रिटीशांना सहाय्यकारी झाले. हळूहळू बदल होत होता. पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ‘आझाद हिंद सेना’ कोहिमाला पोहोचली तेव्हा याच नागावीरांनी त्यांना मदत केली, नेताजींच्या आझाद हिंद सेनेने तिथे ब्रिटीशांचा पराभव केला. 

हेच नागा धर्मांतरानंतर मात्र बदलले. स्वातत्र्यानंतर तिथे आपल्याच देशाविरुद्ध हिंसाचाराच्या घटना घडू लागल्या. आपल्या स्वातंत्र्याचं प्राणपणाने रक्षण करणारे आणि ब्रिटीशांना सळोकीपळो करून सोडणारे  नागा आता मात्र आपल्याच नागरीकांचे आणि जवानांचे शत्रू झाले आहेत, हत्या करीत आहेत.     
                                                                     

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates