Showing posts sorted by relevance for query आत्मारम परब. Sort by date Show all posts
Showing posts sorted by relevance for query आत्मारम परब. Sort by date Show all posts

20 July, 2021

‘आत्मा’ रंगी रंगलो


 

पहिल्या लडाख सफरीत लडाखला पोचल्यावर दुसर्‍याच दिवशी आत्माराम परब हे वेगळंच रसायन आहे हे आम्हा मित्रांच्या लक्षात आलं. बरोबर आलेल्या प्रत्येकाला सहलीचा पुरेपूर आनंद घेता आला पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. सहलीत कबूल केलेली ठिकाणं सोडून कितीतरी जास्त देण्याचा त्यांचा प्रयत्न पाहून आम्ही चकीत झालो होतो. बोलता बोलता आम्ही सांगून टाकलं की “आम्ही दिलेले पैसे फिटले, आता आमच्याकडून तुम्ही हवं ते काम करून घ्या.” मग शेवटच्या दिवसापर्यंत ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असंच सगळं चालू होतं. श्रीनगरला शेवटच्या दिवशी आता ही सफर संपणार आणि आपले पाय पुन्हा जमिनीवर येणार म्हणून मन खट्टू झालं. पण माझ्या बाबतीत असं व्हायचं नव्हतं, त्या सहलीच्या शेवटालाच माझी एक अनोखी सफर सुरू व्हायची होती.

लडाखहून परत आलो आणि चार-दोन दिवसातच आत्माराम परबांचा फोन आला. काहीतरी कारण काढून त्यानी भेटूया म्हणून सांगितलं, भेटलो. जबरदस्त इच्छाशक्ती आणि अपार उत्साह असलेला हा माणूस अगदी प्रत्येक भेटीत मनाला भिडत गेला. कुठलीही गोष्ट ‘केली’ न म्हणता ‘झाली’ म्हणणारा, मैत्रीला जागणारा, नफा-नुकसानाचा विचार न करता झोकून देणारा, कुणालाही अगदी कुणालाही; बिनधास्त भेटणारा असा हा ‘आत्मा’ आत्तापर्यंत माझ्यासाठी आत्मारम परब होता. पण एका दिवशी बोलता बोलता त्याने “मला माझे सगळे मित्र ‘आत्मा’म्हणून हाक मारतात, तेव्हा तुम्हीही आत्माच म्हणा” असं म्हणाला. मी ऐकून न ऐकल्यासारखं केलं पण त्याने हट्ट सोडला नाही आणि मग तो माझ्यासाठीही ‘आत्मा’ झाला. अशी माणसं नशीबात असावी लागतात. आत्माशी मैत्रं जुळलं आणि जीवनातल्या एका नव्या अध्यायाला सुरूवात झाली. त्याच्या पोतडीतून कधी काय बाहेर येईल याचा नेम नाही. कोरोना काळातही लडाख, अजंठा-वेरूळ-औरंगाबाद, बारा मोटेची विहिर, दोनदा कोकण या ठिकाणी त्याने उचलून नेलंच. पण त्याधी अनेक सहलींवर अनेकदा नेलं. घासून घासून टूर लिडर बनवलं. गेल्या पंधरा वर्षात माझ्या परिघाच्याबाहेर नेवून त्या बाहेरची दुनिया दाखवली. 

या आधीच्या पोस्टमध्ये त्याचा आत्माराम परब असा उल्लेख केला त्याकर फेसबूक वर त्याने अभिप्राय दिला तो असा: 

Atmaram Parab

प्रत्येक क्षण डोळ्यासमोरुन जात आहे. किती तरी वेगळी आव्हान होती त्यावेळी पण खूप मजा यायची. कारण सोबतचे पर्यटक सुद्धा त्या आव्हानं कडे एक अनुभव म्हणूनच बघत होते त्यामुळे सर्वच काही सोपं वाटायचं. 2003 मध्ये इशा टुर्स केल्यापासून साधारण 2009 पर्यंत इशा टुर्स मध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची थेट संपर्क होता. आणि तोपर्यंत सहलीला येणारी मंडळी मला "आत्मा" या नावाने हाक देत होती. पुढे त्याचं आत्माजी, आत्मारामजी, सर अशी बरीच विशेषण लागली जी मला आवडत नाहीत.

Narendra Prabhu च्या या लिखाणामुळे ते पुन्हा अनुभवण्याचा आनंद घेतो आहे

त्याच्या बरोबरच्या कितीतरी गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पहिल्याच सफरीत लेहहून कारगीलला जाताना कडा कोसळल्याने वाट अडली होती, दुपारची वेळ, सगळेच सकाळपासूनच्या प्रवासाने दमले होते. गाड्या थांबल्या, याने नेहमीप्रमाणे जाऊन पाहिलं तर काही दगड धोंडे बाजूला केले तर आमच्या गाड्या निघतील एवढी वाट तयार होवू शकेल असं वाटलं. मग काय आत्माने दगड बाजूला करायला सुरूवात केली, तो करतोय ते हे पाहून ड्रायव्हर पुढे झाले आणि दगड बाजूला करू लागले, मग आम्हीही उरतलो, दहा मिनीटात वाट मोकळी झाली आणि गाड्या पुन्हा मार्गस्थ झाल्या. नेतृत्वाचे गुण त्याच्या अंगी भरले आहेत. मी कसं करू? असा प्रश्न त्याला पडत नाही.            

आणखी एक प्रसंग: एकदा असेच आम्ही लडाखची दमछाक करणारी टूर संपवून मुंबईत परतलो. मी घरी आलो आंघोळ केली आणि मोबाईल पहातो तर हा घरी न जाता विमानतळावरून थेट मित्रांना भेटायला गेला होता, निमित्त होतं ‘मैत्री’ दिवसाचं. कसं जमतं हे याला. त्याचे ते फोटो पाहून मी चक्रावून गेलो. मनाला काही भिडलं, भावलं की कविता सुचते तशी ती तेव्हाही सुचली: 

जीवन सुंदर बनवायला तुझ्यासारखा एकच मित्र पुरे
आयुष्यातले थोडेच क्षण तुझ्यासोबत जगलो खरे
त्या क्षणांचा सोबती मित्रा तुच होतास
थोडा कमी किंवा थोडा जास्तही नव्हतास

जगता जगता एक दिवस तू मला भेटलास
कसा कोणजाणे पण माझ्या हृदयात बसलास
आता हळूहळू कळतय तू म्हणजे नक्की काय आहेस
कधी भाबडा तर कधी नुसता यार आहेस

मतलबी मिठ्यांची दोस्ती मला कधी जमली नाही रे
पण तू समोर आल्यावर आवेगही आवरता आला नाही रे
म्हणूनच म्हणतो, जीवन सुंदर बनवायला फक्त तुच पुरे
शंभर दोस्तांच्या गरड्यापेक्षा तुझा एकच हात दे रे
नरेंद्र प्रभू
०२/०८/२०१५


एकदा असेच आम्ही पुण्याला जायला निघालो, वाटेत मला पिकअप करून गाडी सुरू करताना आत्मा काही तरी शोधायला लागला. फोन करून एक रिंग दिली आणि चला... म्हणून गाडी सुरू केली. मग मी विचारलं काय झालं? तर म्हणाला मोबाईला हरवला बहुतेक. लोणावळ्याला फुड मॉलवर मी म्हटलं, अरे मोबाईल हरवला आणि तू एवढा शांत कसा? तर म्हणाला वैतागून तो कसा मिळणार? मिळायचा असेल तर मिळेलही. 


मित्रांना भेटायचं तर काळवेळ ना पहाता भेटायचंच हा याचा बाणा असतो. अतूल चुंबळे यांना ते अमेरीकेला जायला दुसर्‍या दिवशी निघणार होते तेव्हा रात्री साडेबाराला आम्ही त्याना भेटायला पुण्याला पोचलो होतो. पावसात मुंबईहून निघून गावी पोचताना वाट वाकडी करून वैभवाडीजवळच्या रानातल्या आडगावात, जोरदार पाऊस व रात्रीच्या काळोखात जावून त्या मित्राचं घर शोधून काढलं आणि ‘गावी आलो की येतो’ हे शब्द खरे केले होते. बेभान पावसात देवबागला जावून संजय मोंडकरला भेटणे हे मी विसरू शकत नाही, तसंच त्याचं राज्यपालाना भेटणं, दलाई लामांची भेट या गोष्टीही वेड लावणार्‍याच. जे आत्माला भेटलेत त्यांचेही असेच अनुभव असतील आणि जे अजून भेटलेले नाहीत त्यांनी एकदा भेटून बघाच, या माणसात (आत्म्यात) आपण हरवून जाल हे नक्की. गेली चौदा वर्षं मी त्याचा अनुभव घेतोय. सहली, प्रदर्शन, मेळावे, फोटोग्राफी, ट्रेकिंगपासून गावी एकत्र जाणं, अनेक उपक्रम राबवणं यात आत्माचा सतत सहवास लाभणं ही भाग्याची गोष्ट आहे.

अनेक अतर्क्य, अशक्य वाटणार्‍या कितीतरी गोष्टी या माणसाने लिलया केल्या आहेत, त्यातल्या अनेक ‘लडाख प्रवास  अजून सुरू आहे...’ आणि ‘हे प्रवासी गीत माझे‘ या दोन पुस्तकात लिहिल्या आहेत, ती पुस्तकं जरूर वाचावीत अशी विनंती आहे. 

भाग १: मुक्काम तर येणारच

भाग २: ‘क्यामेरा’ क्या तेरा

भाग ३: जागेपणीचं स्वप्न

भाग ४: स्वर्गारोहण

भाग ५: पचेल तेच खावं

भाग ६: ब्रो

भाग ७: सीमा रक्षक

भाग ८: युटी (Union Territory) अच्छा है?

भाग ९: ‘आत्मा’ रंगी रंगलो

'लडाख प्रवास  अजून सुरू आहे...' या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचं प्रकाशन (ऑस्ट्रेलिया)

लडाखचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांच्यासोबत टीम ईशा 









31 March, 2013

'लडाख प्रवास अजून सुरू आहे' - पुस्तक प्रकाशीत



आत्माराम परब आणि नरेन्द्र प्रभू यांनी लिहिलेल्या ‘लडाख प्रवास अजून सुरू आहे’ या नवचैतन्य प्रकाशनाच्या  पुस्तकाचं प्रकाशन सुप्रसिद्ध समाजसेविका आणि लेखिका रेणूताई गावस्कर आणि न्युरोस्पायनल सर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या शुभहस्ते करण्यात आलं. दादर मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.

या प्रसंगी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रीया अशा व्यक्त केल्या.

आत्मारामला लडाखची अलौकीकता अशीच साद घालतांना मी पाहिली आहे, अनुभवली आहे, त्याच्या आयुष्यातल्या ऎन उमेदीच्या वर्षांमध्ये तो ‘लडाखमय’ होऊन गेला होता. त्याचं श्रेयस, प्रेयस सारं काही लडाख होतं. त्या आंतरीक हुंकाराचे अनेक पडसाद या पुस्तकातून वाचकापर्यंत सहज पोचतील याची मला खात्री वाटते.

या पुस्तकाचं पान आणि पान अतिशय वाचनीय झालं आहे. आत्माराम आणि त्याच्या सहकार्‍यांनी अक्षरश: मृत्युचं तांडव पाहिलं. तेही एक दोन दिवस नव्हे तर सतत पंचवीस दिवस.

‘लडाख... प्रवास अजून सुरू आहे’ या पुस्तकाचं पान आणि पान अतिशय वाचनीय झालं आहे. आत्माराम आणि त्याच्या सहकार्‍यांनी अक्षरश: मृत्युचं तांडव पाहिलं. तेही एक दोन दिवस नव्हे तर सतत पंचवीस दिवस. पाराकोटीची भूक, ढासळणारं मनोधैर्य, घरच्यांची आठवण आणि आसपास पसरलेली प्रेतं. चांगल्या घरातली, खात्यापित्या कुटुंबातली ही मुलं चहाच्या एका घोटाला महाग झाली. ज्या मुलांनी आयुष्यात क्वचितच मृत्युचं दर्शन घेतलं त्यांच्या वाट्याला प्रेतच प्रेतं बघणं आलं. हे सगळे अनुभव विलक्षण आहेत. लाखातील एखाद्याच्याच वाट्याला येतील असे आहेत. आत्मारामनं ते प्रभावीपणे कथन केले आहेत व श्री. नरेन्द्र प्रभू यांनी त्या कथनाला तितक्याच उत्कटपणे शब्दात पकडलं आहे.

आत्माराम व श्री. प्रभू ही जोडगोळी म्हणजे दोन देह व एक ‘आत्मा’ त्यांचं हे अव्दैत मी गेली कितीतरी वर्ष बघते आहे. म्हणूनच पुस्तकाला एवढी परिणामकारकता लाभली आहे.


सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका
रेणू गावस्कर

पुस्तकाचं प्रकाशन करताना डॉ. प्रेमानंद रामाणी, रेणूताई गावस्कर, प्रवीण आम्रे, शरद मराठे आणि लेखकद्वय आत्माराम परब आणि नरेन्द्र प्रभू 
मला हायकींगची फारच आवड आहे. हायकींग प्रमाणे लडाखला जायची माझी फार इच्छा होती. मला लडाखला जायचं होतं तेव्हा आत्माराम परब यांचं नाव सुचवलं गेलं. मला फार कुतूहल वाटलं आणि मी लगेच लडाखला जायचं नक्की केलं. माझ्या मनातली ही इच्छा वयाच्या चौराहत्तराव्या वर्षी पुर्ण झाली. या सहलीत आम्हाला घरगुती वातावरणात वावरल्याचा आनंद मिळाला, आत्मारम बरोबर केलेली ती सफर अविस्मरणीय अशीच होती. नंतर मी ईशा टुर्स बरोबर सहकुटुंब भुतानलाही जाऊन आलो. आणखी बर्‍याच देशात मला आत्माराम बरोबर जायचं आहे.

आंतरराष्ट्रीय किर्तीचे न्युरो-स्पायनल तज्ज्ञ
डॉ. प्रेमानंद रामाणी


या प्रसंगी ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी पाठवलेल्या शुभेच्छा पत्रात म्हटलं आहे की:

आकर्षणाचे प्रत्यक्ष जीवनानुभवात रुपांतर करण्यासाठी लागते अफाट जिद्द, असीमीत कुतुहल, धाडस आणि निर्भीड वृत्ती. आत्माराम परब यांच्याकडे ती अमाप आहे. त्यांनी केलेल्या लडाख शोधाच्या साहसी आणि विहंगम प्रवासाचे हे वर्णन. लडाखच्या निमित्ताने हा अजून सुरू असलेला प्रवास आहे निसर्गशोधाचा, निसर्गप्रेमाचा, खर्‍या आनंदाचा, ऎहीकतेतून आध्यात्मिकतेचा.

आत्माराम परब आणि नरेंद्र प्रभू लौकीक अर्थाने समाजशास्त्रज्ञही नाहीत वा पत्रकारही नाहीत इतिहासकार नाहीत वा भुगोलतज्ज्ञही नाहीत. पण त्यानी केलेले माणसांचे समाजाचे, स्थानीक जीवनशैलीचे, तेथील संकृतीचे, ऎतिहासीक संदर्भांचे केलेले वर्णन स्वयंभू पत्रकारांनाही संकोच वाटायला लावेल असे आहे.

ज्येष्ठ संपादक 
कुमार केतकर


प्रसिद्ध क्रिकेटपटू प्रविण आम्रे यावेळी प्रमूख पाहूणे म्हणून उपस्थित होते. सौ. हर्षदा प्रभू यांनी कार्यकमाचं सुत्र संचालन केलं. 

01 May, 2019

‘लडाख... प्रवास अजून सुरु आहे’च्या, चौथ्या आवृत्तीचं प्रकाशन



ग्रंथाली प्रकाशनाच्या  'लडाख.. प्रवास अजून सुरु आहे' या नरेंद्र प्रभू लिखित वाचकप्रिय पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचं प्रकाशन जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते नुकतंच सिडनी; ऑस्ट्रेलिया इथे थाटात पार पडलं.


ऑस्ट्रेलियामधील सिडनी इथे १९ ते २१ एप्रिल २०१९ हे तीन दिवस अखिल ऑस्ट्रेलिया मराठी सम्मेलन २०१९ साजरं झालं. संपूर्ण ऑस्ट्रेलिया खंडातल्या एक हजारावर मराठी रसिकांनी यात भाग घेतलेल्या संमेलनात आत्माराम परब यांच्या पहिल्या मुंबई-लडाख-मुंबई अशा मोटरसायकलवरच्या प्रवासाची चित्तथरारक कथा असलेल्या सदर पुस्तकाचं प्रकाशन जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर विचारवंत डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या शुभहस्ते झालं. या मंगल प्रसंगी मराठीतील लेखक आणि वक्ते अच्युत गोडबोले, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू, ईशा टुर्सचे संचालक श्री. आत्माराम परब, चितळे बंधू मिठाईवालेचे श्री.केदार चितळे, ‘वसंत’ मासिकाचे संपादक श्री. दिलीपा देशपांडे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.    

‘लडाख... प्रवास अजून सुरू आहे...’ ही आत्माराम परब यांच्या लडाखच्या अथक चाललेल्या प्रवासातील पहिली कथा. मुंबई-लडाख-मुंबई असा मोटारसायकलने प्रवास करायचा असं ठरऊन आत्माराम परब यांच्यासोबत आणखी सहा साहसीवीर मुंबईहून निघाले. पुढे अहमदाबाद-उदयपूर-चंदीगढ-दिल्ली करीत मनाली गाठली आणि इथूनच खरी मोहिमेला सुरूवात झाली. मनालीहून निघून रोहतांगपासची चढायी करतानाच हिमालयातल्या उंचच उंच पर्वत रांगा जशा सामोर्‍या येत होत्या तशी संकटाची चढती रांगही त्यांच्या समोर उभी ठाकली होती.

सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यात हिंडताना आणि तिथला झोडपून कढणारा पाऊस अंगावर घेताना आत्मारामला कधी नको झाला नाही, पण इथे हिमालयाच्या रौद्र रुपाशी दोन हात करताना त्यांच्या नाकी नऊ आले. आत्मारम आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अक्षरश: मृत्युचं तांडव पाहिलं. तेही एक दोन दिवस नहे तर सतत पंचवीस दिवस. हाय अ‍ॅल्टिट्यड, बेफाम बर्फवृष्टी, अनोळखा प्रदेश आणि माणसं, पराकोटीची भूक, ढासळणारं मनोधैर्य, घरच्यांसाठी कालवाकालव होणारं मन आणि आसपास पसरलेली प्रेतं. चांगल्या घरातली, खात्यापित्या कुटंबातली ही मुलं चाहाच्या एका घोटाला महाग झाली. हे सगळं विलक्षण आहे.

लडाख, प्रवास अजून सुरू आहे... या पुस्तकाची अनुक्रमणिका जरी वाचली तरी याचा प्रत्यय येतो. हे सगळं झालं तरी आत्मारामनी लडाखची वाट काही सोडली नाही. दुर्दम्य आशावाद आणि जिद्दीच्या जोरावर आत्माराम लडाखला जातच राहिले. हजारो पर्यटकांना बरोबर नेताना आजवर सव्वाशेच्यावर लडाखवार्‍या त्यानी केल्या आहेत. उघडे पर्वत असले तरी रांगोळीचे रंग कमी वाटावेत असे मातीचे रंग, असंख्य छटा आणि आकार. निसर्गाची मनोहारी शिल्पं, बर्फाच्छादीत शिखरं, आकाशाशी स्पर्धा करणारे पासेस, खळाळत्या नद्या, गोठलेले प्रवाह, आथीत्यशील माणसं आणि खडा पहारा देणारे पराक्रमी सैनिक, पॅंगॉंग लेक, नुब्राव्हाली या सर्वाचं  चलत चित्रासारखं वर्णन करणारं हे पुस्तक नरेंद्र प्रभू यांनी लिहिलं आहे. वाचक प्रिय झालेल्या या पुस्तकाची चौथी आवृत्ती सिडनी; ऑस्ट्रेलिया इथे साजर्‍या झालेल्या अखिल ऑस्ट्रेलिया मराठी सम्मेलन २०१९ मध्ये प्रकाशीत झाली.                              

04 August, 2020

वनात येता


कोकणाकडे नेणारा रस्ता आणि आत्माने (Atmaram Parab) काढलेले फोटो पहाता पाहाता त्याची कविता बनून गेली...

आठवणीने शहारले मन कधी जावे त्या गावात

धरला रस्ता धावतसे मन गातो मी आनंदात


हलके झाले गात्र गात्र हे सोपी वाटे ही वाट

वार्‍यावर मग स्वार होऊनी इंद्राचा हो हा थाट  

 

विहंग दर्शन दूर दिसे मज हिरवे तळ कोकण माझे

आतुरले मन कधीच गेले निसटून हो हे तन माझे 

 

पाचूने हा हार घातला की घाटामधली ही वाट?

जलदांनी बघ धाव घेतली गर्दी केली हो दाट

 

चितारला हा कुणी देखावा कुणी ओतली बघ रास

कितीक वळणे जरी घेतली तरीही वाटे ती खास

 

इथे थाबूंनी आकाशाने रूप अपुले पाहिले जरी

जळही पाहे रूप कालचे भेटे त्याला उरोउरी


मनातले वन वनात येता उसळे ते कवितेतून

किती पाहिले तरीही उरते त्याचे हे निज दर्शन   



सर्व छायाचित्रे: आत्मारम परब


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates